रशिया-युक्रेन संघर्ष थोपविण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेण्याची युक्रेनची मागणी मान्य करुन, मोदींनीही हिंसाचाराऐवजी चर्चेतून हा प्रश्न सोडविण्याचे पुतीन यांना आवाहन केले. त्यामुळे संकटसमयी युक्रेनने पाश्चिमात्त्य देश, ‘नाटो’ सदस्यांपेक्षा भारतीय नेतृत्वावर, लोकशाहीप्रती व्यक्त केलेला हा विश्वास विश्वगुरु भारताची प्रतिमाच वृद्धिंगत करणारा म्हणावा लागेल.
स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, “भारताचे विश्वगुरु बनणे हे केवळ भारताच्या हिताचे नाही, तर समस्त विश्वाच्या हिताचे आहे.” विवेकानंदांची हीच भविष्यवाणी आज ‘एकविसाव्या शतकातील नरेंद्र’च्या माध्यमातून प्रत्यक्ष रुप धारण करताना दिसते. खरंतर २०१४ पासून ते आजतागायत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचे जे दिशादिग्दर्शन केले, जागतिक नेत्यांसोबत जी मानवी संबंधांची पायाभरणी केली, त्या ‘मोदीप्लोमसी’ची ही गोमटी रसाळ फळे म्हणावी लागतील. याचा पुनश्च प्रत्यय सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धसंघर्षादरम्यानही आला. युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्सकी यांच्यात चर्चा घडवून आणणण्यासाठी प्रयत्न करावेत, म्हणून थेट मोदींनाच साकडे घातले. एवढेच नाही तर भारताने या संघर्षादरम्यान जागतिक भूमिका बजावायला हवी आणि आम्ही भारतीय नेतृत्वाच्या सक्रिय पाठिंब्याच्या प्रतीक्षेत असल्याचे सांगत युक्रेनने मदतीसाठी याचना केली. मोदींनीही युक्रेनच्या कळकळीच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुतीन यांच्याशी संवाद साधला. “आपापसातील मतभेद प्रामाणिक संवादानेच सोडवले जाऊ शकतात. राजनयिक वाटाघाटी संवादाच्या मार्गावर परत येण्यासाठी सर्व बाजूंनी एकत्रित प्रयत्न करायला हवे,” असे सांगत मोदींनी पुतीन यांना त्वरित हिंसाचार थांबवण्याचे आवाहनही केले. यावरुन आंतरराष्ट्रीय राजकारणातील भारताचे स्थान आणि भारताच्या भूमिकांना प्राप्त झालेले महत्त्वच पुनश्च अधोरेखित झाले, तर दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी युद्धप्रसंगी मॉस्कोला भेट देताना आनंद होत असल्याचे अजब विधान केल्यामुळे ते जागतिक टीकेचे धनी ठरले.
मागील काही महिन्यांपासून रशिया-युक्रेन संघर्षाची ठिणगी पडू नये, म्हणून अमेरिकेसह पाश्चिमात्त्य देशांनीही रशियाची समजूत काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला. खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यापासून ते फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनीही यावर तोडगा निघेल, यासाठी पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. पण, सगळे प्रयत्न व्यर्थच! पुतीन यांनी पाश्चिमात्त्य राष्ट्रांच्या आवाहनाला अजिबात भीक न घालता, युक्रेनमधील दोन प्रदेशांना स्वतंत्र देशांची मान्यता देत, युक्रेनवरही अखेरीस चढाई केली. या संघर्षात संयुक्त राष्ट्र, अमेरिका असेल अथवा ‘नाटो’ सदस्य देशांनी आधी रशियाला ताकीद देणे आणि आता रशियावर निर्बंधांचा वर्षाव करण्यापलीकडे, युक्रेनला सैन्यशक्तीच्या मदतीपासून मात्र वंचित ठेवले. पण, या संकटसमयी युक्रेनने भारताकडून मध्यस्थीची व्यक्त केलेली अपेक्षा आणि मोदींनी त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद पाहता, या विश्वगुरु भारताच्या विश्वनेत्याच्या विलक्षण शक्तीचा प्रत्यय यावा.
‘नवीन भारत’ आणि नेहरु-गांधींच्या घराणेशाहीच्या नेतृत्वातील भारताच्या परराष्ट्र धोरणातील हेच स्थित्यंतर बोलके ठरावे. रशियाशी भारताचे तसे पूर्वापार व्यापारी आणि सामरिक संबंध. एवढेच नाही तर १९७१च्या भारत-पाक युद्धादरम्यानही पाकसमर्थक अमेरिका-ब्रिटनच्या भारताकडे रवाना झालेल्या युद्धनौकांना रोखण्यासाठी सोव्हिएत नौसेना पुढे सरसावली होती. त्यामुळे भारत-रशिया संबंध मैत्रिपूर्ण होते आणि आजही आहेत. परंतु, त्याहीपलीकडे पंडित जवाहरलाल नेहरु आणि नंतर इंदिरा गांधींच्या काळात सोव्हिएत गुप्तचर यंत्रणांचे गुप्तहेर भारतात अक्षरश: मोकाट होते. तसेच इंदिरा गांधी, त्यांचे मंत्रिमंडळ, काँग्रेस पक्ष आणि सोव्हिएत युनियनमधील ‘अर्थपूर्ण’ संबंधांचे ‘मित्रोकिन आर्काईव्हज’मधून धक्कादायक खुलासेही कालांतराने जगासमोर आले. त्यामुळे सोव्हिएत संघातील रक्तरंजित समाजवादी-कम्युनिस्ट क्रांतीचे गोडवे गाणार्या नेहरु-गांधी परिवाराने अख्खा भारतच सोव्हिएत संघाच्या दावणीला बांधला होता. भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामींनीही आपल्या कित्येक मुलाखतींमधून नेहरुंपासून ते सोनिया गांधींपर्यंतचे ‘सोव्हिएत कनेक्शन’ बरेचदा उघडे पाडले आहेच. त्यामुळे तत्कालीन भारतीय नेतृत्व रशियाच्या इशार्यांवर नाचणारे होते आणि आजचे भारतीय नेतृत्व हे रशियाला या युद्धप्रसंगी सबुरीचा सल्ला देण्याच्या भूमिकेत दिसते. म्हणजेच आजचा भारत हा रशिया असेल अथवा अमेरिका, कोणत्याच जागतिक शक्तीसमोर झुकणारा नसून, या महासत्तांच्या खांद्याला खांदा लावून वैश्विक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारा आहे, हेच खरे!
‘कोविड’ महामारीच्या काळात भारताने जगभरातील देशांना औषधांपासून ते लसींपर्यंत केलेले मदतकार्य असेल किंवा नरेंद्र मोदी यांनी विविध जागतिक नेत्यांच्या क्रमवारीत पटकाविलेले अव्वल स्थान, युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठीचे प्रयत्न, यावरुन मोदींच्या परराष्ट्र धोरणाचे, त्यांच्या दूरदृष्टीचे सार्वत्रिक यशच अधोरेखित होते. पण, त्याचबरोबर मोदींनी संयुक्त राष्ट्र, जागतिक आरोग्य संघटना, ‘क्वाड’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरुन जगाला विविध विषयांवर वेळोवेळी डोळ्यात अंजन घालणारे केलेले वैश्विक मार्गदर्शन, भारतीय संस्कृती-मूल्यांचा जगाच्या पाठीवर केलेला जागर, योगाला मिळवून दिलेली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा ही त्यांच्या भारतकेंद्री परराष्ट्र धोरणाची व्याप्ती स्पष्ट करते. त्याचबरोबर चीनबरोबरचा ‘एलएसी’वरील संघर्ष असेल किंवा पाकिस्तानला धोबीपछाड देत ‘एलओसी’ पार करुन दहशतवाद्यांवर केलेला ‘सर्जिकल स्ट्राईक’, मोदींनी कोणत्याही देशाच्या मदतीची प्रतीक्षा न करता धाडसी सैन्यबळावर भारताची संरक्षणसिद्धता सिद्ध केली. नेहरुंनी काश्मीर प्रश्न संयुक्त राष्ट्रात नेऊन त्याला जागतिक गुंतागुंतीचे रुप दिले, तर मोदींनी ‘कलम ३७०’ हद्दपार करुन भारतीय संविधानानुसारच हा देशांतर्गत ७० वर्षांपासून खितपत पडलेला प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावला. त्यामुळे ‘राष्ट्र प्रथम’ या नीतीला ‘वसुधैव कुटुम्बकम्’च्या भारतीय मूल्याची जोड देऊन मोदींनी भारताची ‘विश्वगुरु’ ही प्रतिमा सर्वार्थाने सार्थ ठरवली आहे.
भारताच्या याच ‘विश्वगुरु’ प्रतिमेच्या वलयामुळे आज भारताकडे युक्रेनला मदतीची याचना करावी लागली. पण, यानिमित्ताने हेही विशेषत्वाने अधोरेखित करावे लागेल की, अटलजींनी १९९८ साली पोखरणमध्ये केलेल्या अणुचाचणीला विरोध करणार्या देशांच्या यादीत युक्रेनचाही समावेश होताच. पण, आज तरीही भारताने याविषयी कोणतीही कटुता न बाळगता, त्याच युक्रेनला युद्धछायेतून वाचवण्यासाठी रशियाला शांततेचे आवाहन केले. खरं म्हणजे आज जी परिस्थिती युक्रेनवर ओढवली, ती कदाचित टळलीही असती. पण, रशिया आणि पाश्चात्त्य देशांच्या रेट्यामुळे आर्थिक फायद्यासाठी, अण्वस्त्रांच्या बाबतीत जगात तिसर्या क्रमांकावर असलेल्या युक्रेनने १९९६ पर्यंत अण्वस्त्रांचा त्याग केला. कदाचित आज युक्रेन अण्वस्त्रसज्ज असता, तर रशियाशी चर्चा, करार अथवा संघर्ष करताना त्याची स्थिती अधिक मजबूत असती. त्यामुळे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनाचे स्मरण करुन त्यांनी त्यावेळी मांडलेले सैनिकीकरणाचे विचार किती शाश्वत होते, हे यानिमित्ताने लक्षात घ्यावे. सावरकर १९५३ मध्ये पुण्याच्या नारद मंदिरात केलेल्या एका भाषणात म्हणालेही होते की, “वेद हे आपल्या राष्ट्राचे पहिले स्वातंत्र्यगीत आहे.” म्हणजेच काय तर राष्ट्राचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल, राष्ट्राच्या शत्रूंपासून, समाजकंटकांपासून समाजाचे रक्षण करायचे असेल, तर शक्तीची उपासना आणि शस्त्रबळाला पर्याय नाही, असे आपले वेदही सांगतात. आजचा नवीन भारत याच वेदविचारांवर आरुढ असल्यामुळेच, त्याची ‘विश्वगुरु’ म्हणून होणारी ही देदिप्यमान वाटचाल भारताच्या उज्ज्वल भविष्याची साक्ष देणारी ठरेल, यात शंका नाही!