कोकणातील कासवांचे पहिले रहस्य उलगडले; ट्रान्समीटर लावलेल्या 'सावनी'ने दुसऱ्यांदा घातली अंडी

    25-Feb-2022   
Total Views |
velas



मुंबई (विशेष प्रतिनिधी) - गेल्या महिन्यात वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थानअंतर्गत (डब्लूआयआय) आंजर्ले किनाऱ्यावर ( konkan sea turtle ) सॅटलाईट ट्रान्समीटर लावलेल्या 'सावनी' नामक मादी कासवाने पुन्हा एकदा विण केली आहे. शुक्रवारी पहाटे केळशीच्या किनाऱ्यावर 'सावनी' अंडी घालताना आढळून आली. भारताच्या किनाऱ्यापट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा विण करत असल्याचा हा पहिलाचा पुरावा आहे. ( konkan sea turtle )

दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील या कासवांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांना 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावण्याचा निर्णय 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ने घेतला होता. याअंतर्गत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वेळास, आंजर्ले आणि गुहागर किनाऱ्यावर मिळून एकूण पाच मादी कासवांना 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावून त्यांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या माद्यांच्या समुद्रातील हालचालींवर 'डब्लूआयआय' आणि 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'मधील संशोधक लक्ष ठेवून होते. अशातच शुक्रवारी पहाटे केळशीच्या किनाऱ्यावर 'सॅटलाईट ट्रान्समीटर' लावलेली एक मादी अंडी घालताना कासवमित्र राकेश धोपावकर आणि लहू धोपावकर यांना आढळून आली. त्यांनी लागलीच यासंबंधीची माहिती 'मॅंग्रोव्ह फाऊंडेशन'ला दिली.


'सावनी'ला कसे लावले सॅटेलाईट ट्रान्समीटर ? ( पाहा व्हिडीओ) 



यासंदर्भात 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना सांगितले की, " २५ जानेवारी रोजी आंजर्ले समुद्रकिनाऱ्यावरती एका मादी कासवाने ८७ अंडी घातली होती. तिला सॅटॅलाइट ट्रान्समीटर बसवून तिचे नामकरण 'सावनी' असे करण्यात आले. गेल्या महिनाभर समुद्रात वावर केल्यानंतर तिने २५ फेब्रुवारी रोजी केळशी येथे पहाटे चार वाजता ७६ अंडी घातली आहे. यामुळे घटनेमुळे कोकण किनारपट्टीवर 'ऑलिव्ह रिडले प्रजाती'च्या माद्या विणीच्या हंगामात एकाहून अधिक वेळा अंडी घालण्यासाठी येतात हे पुराव्यानीशी समजले आहे." 'सावनी'ला टॅग करणारे 'डब्लूआयआय'चे संंशोधक डाॅ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, " गेल्या महिन्याभरात 'सावनी'चा वावर किनारपट्टीपासून १० किमी अंतरादरम्यान होता. ती सावित्री नदीच्या मुखाशी गेली होती. त्यानंतर ती वेळास ते आंजर्ले दरम्यानच्या सागरी परिक्षेत्राच वावरत होती. सरतेशेवटी तिने शुक्रवारी केळशीच्या किनाऱ्यावर दुसऱ्यांदा अंडी घातली. भारताच्या किनाऱ्यापट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा विण करत असल्याचा हा पहिलाचा पुरावा आहे."


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.