विंचूच्या नव्या प्रजातीचा जळगावातून शोध; 'ही' आहेत वैशिष्ट्य
"ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन"च्या संशोधकांचे संशोधन
Total Views |
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - जळगाव जिल्ह्यातून विंचूच्या (scorpion) नवीन प्रजातीचा शोध लावण्यात महाराष्ट्रातील तरुण संशोधाकांना यश मिळाले आहे. त्याचे नामकरण 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस' (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आले असून 'कॉमसोबुथस' या जातीमधील महाराष्ट्रात आढळलेली ही पहिलीच प्रजात आहे. या संशोधनामुळे संशोधनाच्या दृष्टीने दुर्लक्षित राहिलेल्या विंचवासारख्या जीवाचे महत्व अधोरेखित झाले आहे.
पर्यावरणीय परिसंस्थेत विंचू हे किटकनियंत्रक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत असतात. यामधील काही प्रजाती या जहाल विषारी असतात, तर काही प्रजीतींचे विष हे सौम्य प्रकारचे असते. अशाच विषारी असणाऱ्या विंचूच्या नव्या प्रजातीचा शोध जळगाव जिल्ह्यातील सातपुडा डोंगररांगांमधून लावण्यात आला आहे. 'ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन'चे संशोधक विवेक वाघे, सत्पाल गंगलमाले आणि अक्षय खांडेकर यांनी या प्रजातीचा उलगडा केला. नवीन प्रजात ही 'बुथीडी' कुळातल्या 'कॉमसोबुथस' या जातीमधील आहे. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातील वाघझीरा आणि खिरोदा या गावात ही प्रजाती आढळून आली आहे. ऑक्टोबर, २०२० मधील सर्वेक्षणादरम्यान संशोधकांना पहिल्यांदा ही प्रजाती आढळून आली होती. साधारण वर्षभर त्यावर संशोधन केल्यानंतर ही प्रजात विज्ञानासाठी वेगळी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
तज्ज्ञांकडून या प्रजातीच्या नाविन्याची पुष्टी केल्यानंतर हा शोधनिबंध अमेरिकेतून प्रकाशित होणाऱ्या 'युस्कोर्पिअस' या संशोधन पत्रिकेतून गुरुवारी प्रकाशित करण्यात आला. या संधोधनात महाराष्ट्रातील विवेक वाघे (जळगाव), सत्पाल गंगलमाले (सोलापुर), अक्षय खांडेकर (सांगली) या संशोधकांचा समावेश आहे. या शोधामुळे भारतात अजूनही विंचू आणि एकूणच पर्यावरणीय संशोधनाच्या दृष्टीने फारसे काम झालेले नाही, हे अधोरेखित होते. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी ही आढळली म्हणून तिचे नामकरण 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस' (Compsobuthus satpuraensis) असे करण्यात आल्याची माहिती विवेक वाघे यांनी दिली. जगभरात 'कॉमसोबुथस' या जातीच्या ५० प्रजाती आढळून येत असून भारतीय उपखंडातील ही सहावी, भारतातली चौथी तर महाराष्ट्रातील पहीली प्रजाती असल्याचे सांगितले.
प्रजातीमधील वैविध्य
रंग, शेपटीरावरील वैशिष्ट्यपूर्ण दानेदार रचना, पेक्टीनल टीथची संख्या, लांबी व रुंदी यांचे गुणोत्तर, शरीरावरील उठाव यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह 'कॉमसोबुथस सातपुराएनसीस' ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती माळराने, झुडपी जंगले, व पानगळीच्या जंगलांमध्ये दगडांच्या आडोश्याने आढळून येते.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
https://www.mahamtb.com/authors/Akshay_Mandavkar.html
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.