‘तानसा’ अभयारण्यातील जैवविविधतेचे संवर्धन करुन तिथल्या पक्षीजगताची माहिती जगासमोर आणणारे पक्षीनिरीक्षक रोहिदास नामदेव डगळे यांच्याविषयी...
‘तानसा’ अभयारण्याच्या कुवार रानवाटांचा हा वाटाड्या. पश्चिम घाटात प्रथमच ‘वनपिंगळा’ या दुर्मीळ संकटग्रस्त पक्ष्याचा शोध घेणारा, अभ्यासकांना या पक्ष्याची ओळख करुन देणारा, त्याच्या संवर्धनासाठी झटणारा. बेताची आर्थिक परिस्थिती असतानाही या माणसाने आपल्याला लागलेले पक्ष्यांचे वेड जपले. त्यामध्ये ज्ञानमय माहितीची भर घालत आपले आयुष्य पक्षीमय करणारा हा माणूस म्हणजे रोहिदास डगळे.
रोहिदास यांचा जन्म दि. २४ नोव्हेंबर, १९९३ साली अकोल्यामध्ये आपल्या आजोळी कळसूबाई शिखराच्या रांगेतील महाकाळ डोंगराच्या कुशीत झाला. मात्र, त्यांचे बालपण हे शहापूर तालुक्यात गेले. त्यांच्या पणजोबांना आयुर्वेदिक औषधांमध्ये विशेष ज्ञान होते. त्यामुळे अगदी लहान वयातच रोहिदास यांचा परिचय वनस्पतींशी झाला. एकाअर्थी त्यांची निसर्गाशी नाळ जोडण्याची ती पहिली पायरी ठरली. आजीकडून सांगण्यात येणार्या पक्ष्यांविषयीच्या रंजक गोष्टी आणि मिथक कथा ऐकून रोहिदास यांच्यावर निसर्गाचे संस्कार होत गेले. वडील नामदेव डगळे शहापूरनजीकच्या जंगलात त्यांना फिरण्यास घेऊन जायचे. तिथल्या माळरानावर भटकंती करताना अनेक पक्ष्यांचे आवाज आणि त्यांची तोंडओळख रोहिदास यांना झाली.
दरम्यानच्या काळात रोहिदास यांच्या हाती सुरेशचंद्र वारघडे यांचे ’पक्षीवेडा डॉ. सलीम अली’ हे पुस्तक लागले. यामुळे पक्ष्यांच्या अभ्यास छंदाबद्दल आणि पक्ष्यांच्या सामान्य नावांची माहिती मिळाली. त्या पुस्तकात पक्ष्यांविषयी सखोल शास्त्रीय अभ्यास करणार्या ’बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ची (बीएनएचएस) माहिती आणि त्यांचा पत्ता दिला होता. आर्थिक परिस्थितीमुळे शहापूरवरून विनातिकीट रेल्वेने मुंबईपर्यंत प्रवास केला. फोर्ट परिसरातील ’बीएनएचएस’ कार्यालय गाठले. ’बीएनएचएस’चे विद्यार्थी सदस्यत्व घेऊन रोहिदास यांनी आपला पक्षीप्रवास सुरू केला. ’बीएनएचएस’ला भेट देऊन पक्ष्यांविषयीच्या ज्ञानामध्ये भर पाडण्याचे काम त्यांनी केले.
’बीएनएचएस’मुळेच रोहिदास यांची ओळख डॉ. सुजित नरवडे, सुनील लाड आणि डॉ. गिरीष जठार या तज्ज्ञ पक्षी अभ्यासकांशी झाली. त्यांच्यासमेवत पक्षीनिरीक्षण केल्याने किंवा त्यांच्या सहवासात राहिल्याने रोहिदास यांना पक्ष्यांविषयीचा वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाला. पक्ष्यांसोबतचा आपला जिव्हाळा कायम राहावा म्हणून ’महाराष्ट्र पक्षी मित्र’ या संस्थेचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. त्या माध्यमातून अनेक पक्षीगणना मोहिमांमध्ये सहभागी झाले. २००९ पासून रोहिदास हे ‘तानसा’ अभयारण्याच्या आसपासच्या क्षेत्राचे पक्षीनिरीक्षण करतच होते. मात्र, ‘तानसा’ अभयारण्याच्या दुर्गम क्षेत्रात पक्षीनिरीक्षण करता यावे, यासाठी त्यांनी थेट शहापूरमधील ‘तानसा’ अभयारण्याचे साहाय्यक वनसंरक्षक यांचे कार्यालय गाठले. त्याठिकाणी सैफुन शेख नामक वनाधिकार्यांची भेट झाली. शेख यांनीदेखील रोहिदास यांची पक्षीनिरीक्षणाची ओढ लक्षात घेऊन त्यांना अभयारण्यात पक्षीनिरीक्षण करण्याची परवानगी दिली.
ही परवानगी मिळाल्यानंतर रोहिदास यांना पक्षीनिरीक्षणाचा स्वर्गच खुला झाला. २०१४ सालच्या दिवाळीत अशाच पद्धतीने रोहिदास आणि सुनील लाड हे अभयारण्यामध्ये पक्षीनिरीक्षणाकरिता गेले होते. त्यावेळी त्यांना घुबडसदृश्य पक्षी दिसला. प्रथमदर्शनी तो वेगळा दिसल्याने त्यांनी लागलीच त्याचे छायाचित्र टिपून डॉ. गिरीश जठार यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. डॉ. जठार यांनी हा पक्षी दुर्मीळ संकटग्रस्त ‘वनपिंगळा’ (ऋेीशीीं जुश्रशीं) नामक पक्षी असल्याचे सांगितले. ‘तानसा’ आणि पश्चिम घाटामधील या पक्ष्याची ही पहिलीच नोंद होती. या नोंदीविषयीची शास्त्रीय माहिती त्यांनी ’बीएनएचएस’च्या अंकात प्रसिद्ध केली. त्यानंतर रोहिदास यांनी ‘तानसा’ अभयारण्यातील पक्षी प्रजातींची सविस्तर नोंद केली. पुढच्या काळात अभयारण्यामध्ये गिधाडांचा अधिवास असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांना मृत जनावरे खायला घालण्यासारखे संवर्धनाचे काम केले. या सर्व कामांमुळे त्यांची निवड ‘तानसा’ अभयारण्य ‘वन्यजीव सल्लागार समिती’ आणि अतिसंवेदनशील वन्यजीव अधिवास समितीमध्ये झाली.
रोहिदास यांनी ‘तानसा’ वन्यजीव अभयारण्याच्या सर्वांगीण विकासाकरिता वन विभागाची मदत केली आहे. २०१७ पासून २४ ऑक्टोबर हा ‘वन पिंगळा संवर्धन दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये स्थानिक वनवासी, वननिवासी आणि वनविभाग यांच्या सहकार्याने आणि या दिवसाला पर्यावरण मंत्रालय, भारत सरकार यांनी देखील सहकार्य केले आहे. तसेच, शहापूरच्या वनप्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणार्या प्रशिक्षणार्थींना ते पक्षीनिरीक्षण, निसर्ग वाचन आणि मानव वन्यजीव संघर्ष संदर्भात मार्गदर्शन करतात. सेंद्रीय शेती करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. स्थानिक लोकांमध्ये जनजागृतीचे कामही ते करत आहेत. ‘तानसा’वन्यजीव अभयारण्याचा वर्धापन दिन साजरा करण्यामध्येही त्यांनी पुढाकार घेतला आहे. नुकतीच त्यांची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या ’राज्य वन्यजीव मंडळा’च्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. हे सर्व काम आई-वडिलांचे आशीर्वाद आणि वनाधिकारी व समविचारी मित्रमंडळींच्या पाठिंब्यामुळे शक्य झाल्याचे ते सांगतात. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!