लखनऊ - राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तरप्रदेश निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आता त्याठिकाणी प्रचार सभा घेतली. उत्तरप्रदेशातील डुमरियागंज आणि कोरांव येथे त्यांनी जाहीरसभा घेतील. यावेळी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज येथील प्रचारसभेत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
प्रचारसभेत भाषण करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, उत्तरप्रदेशात बदल घडणार आहे, परिवर्तन होणार आहे आणि तशी लहर आहे. २०१७ मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा तुम्ही पर्याय म्हणून भाजपला निवडलं. पण जे काही त्यांनी स्वप्न दाखवली ती पूर्ण झाली का? नाही ना? मग परिवर्तन व्हायला पाहिजे की नाही? स्वप्नांचा जमला झाला. केवळ द्वेषाचं राजकारण झालं. दंगलीच्या गोष्टी झाल्या. आता पाच वर्षांनंतरही उत्तरप्रदेशात भाजप केवळ घाबरवण्याचं काम करत आहे. हे असं होईल आणि तसं होईल, हे धोक्यात आहे ते धोक्यात आहे. पण कुणालाही काहीही धोका नाही कारण ही श्री रामाची भूमी आहे.
उत्तरप्रदेशात विकास झाला आहे की नाही हे तुम्ही मला सांगा? नाही झाला. इथले मुख्यमंत्री जेव्हा मुंबईत येतात तेव्हा आमच्या इथल्या वृत्तपत्रात जाहिराती येतात उत्तरप्रदेशात इतकी गुंतवणूक झाली, इतकी विकासकामे झाले. पण तसं आहे का? उत्तरप्रदेशात बेरोजगारी वाढली, महिलांवरील अत्याचार वाढले, अन्याय वाढत आहे, सामाजिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत अशाने सरकार कसं चालेल. परिवर्तनाची लाट इथेही आली पाहिजे, तुम्ही परिवर्तनासाठी तयार आहात का? परिवर्तनाचं प्रतिक इथले शिवसेना उमेदवार आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
उत्तरभारतीयांची जबाबदारी आमची
उत्तरप्रदेशातील अनेक नागरिक महाराष्ट्रात, मुंबईत राहत आहेत. हे सर्व नागरिक महाराष्ट्रीय आणि मुंबईकर बनून राहत आहेत. या उत्तरभारतीयांची जबाबदारी आमची आहे. त्यांना पुढे घेऊ जात आहोत आणि जाणार असंही आदित्य ठाकरे म्हणाले.