
रंगा रेड्डी जिल्हा न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : तेलंगाणामधील रंगा रेड्डी जिल्हा न्यायालयाने ‘द वायर’ या न्यूज पोर्टलला कोविड - १९ लस उत्पादक, भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड विरुद्ध त्यांच्या वेबसाइटवर प्रकाशित केलेले चौदा लेख काढून टाकण्याचे निर्देश दिले बुधवारी दिले.
‘द वायर’ या न्यूज पोर्टलने भारत बायोटेक निर्मिती कोव्हॅक्सिन या करोनावरील लसीची अधिकृतता आणि त्याच्या मंजुरीविषयी सपशेल खोटा दावा करणारे लेख आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित केले होते. भारत बायोटेकने ‘द वायर’ आणि फाउंडेशन फॉर इंडिपेंडंट जर्नालिझम, त्याचे संपादक सिद्धार्थ वरदराजन, सिद्धार्थ रोशनलाल भाटिया आणि एमके वेणू आणि भारत बायोटेकसह कोव्हॅक्सिन विरोधात लेख लिहिणाऱ्या नऊ जणांविरोधात १०० कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे.
भारत बायोटेकने प्रकाशनाच्या विरोधात दाखल केलेल्या १०० कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यात रंगा रेड्डी जिल्हा न्यायालयातील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी ‘द वायर’ ला ते सर्व लेख संकेतस्थळावरून ४८ तासांच्या आत काढून टाकण्याचा आदेश दिला आहे. त्याचप्रमाणे यापुढे अशा प्रकारचे लेख प्रकाशित करण्यास मनाई आदेश जारी केला आहे.
भारत बायोटेकतर्फे वरिष्ठ वकील के. विवेक रेड्डी यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, ‘द वायर’ने भारत बायोटेकची प्रतिष्ठ मलिन करण्याच्या हेतूने कंपनी आणि कोव्हॅक्सिनविरोधात खोटे आरोप असलेले लेख प्रकाशित केले होते. भारत बायोटेकने यापूर्वी क्षयरोग, झिका रोटाव्हायरस, चिकुनगुनिया आणि टायफॉइडसाठी लस विकसित केल्या होत्या आणि त्यांना राष्ट्रीय आणि जागतिक मान्यता मिळाली होती आणि आता लस विकसित करण्यासाठी भारत सरकारच्या आघाडीच्या संस्थांशी सहकार्य केले आहे.
केंद्र सरकारने भारत बायोटेकच्या लशीला मान्यता दिल्यानंतरही ‘द वायर’ ने खोटी माहिती असणारे लेख प्रकाशित केल्याची दखल न्यायालयाने घेतली. त्याचप्रमाणे वय वर्षे १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी लस तयार करण्यासाठी भारत बायोटेक हा एकमेव उमेदवार आहे. ‘द वायर’ने प्रकाशित केलेल्या लेखांमुळे लसीविषयी जनतेच्या मनात संशय निर्माण झाल्याचेही न्यायालयाने अधोरेखित केले.