ठाणे : राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपने त्यांच्याच `होमग्राऊंड'वर पुन्हा एकदा जोरदार दणका दिला आहे. सोमवार, दि. २१ फेब्रुवारी रोजी शिवसेनेच्या आणखी काही पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी भाजप मध्ये प्रवेश केला आहे. यादरम्यान आयोजित केलेल्या 'भव्य पक्षप्रवेश आणि नियुक्ती प्रदान समारंभात' विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ हे उपस्थित होते.
वर्तकनगर-भीमनगर भागातले शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख तुकाराम माळकर, संगिता माळकर, उपशाखाप्रमुख लक्ष्मण गुरव, नारायण सावंत, राजेश शेलार, ललित पाटील आदींसह अनेक पदाधिकारी व शिवसैनिकांनी भाजपामध्ये प्रवेश केला. "शिवसेनेचे शक्तीस्थान हे तळागाळातील शिवसैनिक आहेत. मात्र शिवसेनेचे `स्पिरीट' आता संपले आहे. महाविकास आघाडीचे सरकार आले असूनही इथला शिवसैनिक समाधानी नाही. गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख सर्वजण नाराज आहेत.", असे प्रविण दरेकर यावेळी म्हणाले.
"मुख्यमंत्री शिवसेनेचे असूनही राज्याच्या अर्थसंकल्पातील ५० टक्के रक्कम राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या खात्यात वळविली गेली. सत्ता शिवसेनेची पण फळं दुसऱ्यांनाच; अशी सध्याची स्थिती आहे. शिवसेनेच्या साध्या आमदारांनाही निधी मिळत नाही, त्यांच्या सुचना ऐकल्या जात नाहीत. मग शिवसैनिकांना कोण विचारणार? राज्याच्या मंत्रिमंडळात ठाण्याचे दोन मंत्री असूनही ठाणेकरांना योग्य पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे वैभवाचे दिवस आणण्यासाठी भाजप हाच एकमेव पर्याय आहे.", असेही ते पुढे म्हणाले. यावेळी कार्यक्रमात आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांसमवेत भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.
ठाण्यात कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यावर बोटे गमावण्याची वेळ
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुन्हेगार सर्रास फिरत आहेत. तर भाजपच्या नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल होत आहेत. महिला अत्याचाराच्या घटनाही घडत आहेत. ठाण्यात कर्तव्यदक्ष महिला अधिकाऱ्यावर बोटे गमावण्याची वेळ आली, ही अत्यंत दुर्देवी बाब आहे.
- चित्रा वाघ, प्रदेश उपाध्यक्षा, भाजप
ये तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है!
भाजपमध्ये प्रवेश केलेले शाखाप्रमुख हे किरकोळ असल्याचं काहींनी म्हटले आहे. मात्र याच शिवसैनिकांनी रक्त सांडून व घाम गाळून शिवसेनेला सत्ता मिळवून दिली होती. एकेकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे शाखाप्रमुख होते, याचा कदाचित त्यांना विसर पडला आहे. विशेष म्हणजे आगामी काळात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून आणखी काही पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. `ये तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है,'
- निरंजन डावखरे, आमदार, भाजप