रामानुजस्य चरणौ शरणं प्रपद्ये!

    20-Feb-2022   
Total Views |

Ramanujacharya
 
 
 
आपले प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान सुवर्णसमृद्ध आहे. त्यातील वेदान्तशास्त्र तर शिरोभूषणच! याच वेदान्तशास्त्रातील एक विशिष्टाद्वैत संप्रदाय. दि. ५ फेब्रुवारी रोजी हैदराबाद येथे विशिष्टाद्वैत संप्रदायाचे संस्थापक श्री रामानुजाचार्यांच्या भव्य मूर्तीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त श्रीरामानुजाचार्यांच्या जीवन तथा तत्त्वज्ञानाचा आढावा घेणार्‍या लेखमालिकेतील आज दुसरा व शेवटचा लेख...
 
  
 
मानुजाचार्यांचे विशिष्टाद्वैताचे तत्त्वज्ञान जाणून घेताना त्यांनी मांडलेला यथार्थख्यातीवाद महत्त्वाचा ठरतो. खरंतर यथार्थख्यातीचा सिद्धांत मांडण्यातून रामानुजांना शंकराचार्यांच्या वेदान्तात महायान बौद्ध तत्त्वज्ञानामुळे शिरलेला मायावाद उखडून टाकून भारतीय तत्त्वज्ञानाला एका निराळ्या शास्त्रीय व वास्तववादी भूमिकेवर आणून ठेवायचे होते. या बाबतीत त्याची तुलना आधुनिक पाश्चात्य वास्तववादाशी करता येईल. परंतु, वास्तववादातील संशय जसा त्यांच्या तत्त्वज्ञानाला शिवला नाही, तसा फलप्रामाण्यवादातील केवळ उपयुक्ततावादही त्यांच्या तत्त्वज्ञानापासून दूर राहिला. या सार्‍या चैतन्याचा नियामक म्हणजे ईश्वर. रामानुजांच्या मते, तीन गोष्टी अंतिम सत्य मानायला हव्यात : आत्मतत्त्व किंवा चित्, जड पदार्थ किंवा अचित् आणि ईश्वर. ही तिन्ही तत्वे अंतिम सत्ये असली, तरी पहिली दोन ईश्वरावर अवलंबून आहेत. रामानुजांनी त्यांना ईश्वराचे शरीर मानले आहे. आपला आत्मा जरी आपल्या शरीराच्या संबंधात असला, तरी परमेश्वराच्या संबंधात शरीरे ठरत असतात. शरीर आणि शरीरी यांच्यात अपृथकत्व आहे. द्रव्य आणि गुण यांच्यातही हाच संबंध आहे. म्हणूनच चित् आणि अचित् यांचा ईश्वराशी असलेला संबंध समजविताना ही भाषा वापरावी लागते.
 
 
 
रामानुजांनी आपल्या या तत्त्वत्रयीचे विवरण करताना उपनिषदांचा आधार घेतला आहे. रामानुजांच्या एकंदर तत्त्वज्ञानाचा आढावा घेताना हे मान्य करावे लागते की, शंकराचार्यांना तत्त्वज्ञान आणि भक्तिमार्ग यांची जी गुंफण साधली नाही, ती रामानुजांनी कौशल्याने करून दाखविली. हे करण्यात शंकराचार्यांचे ‘थिजलेल्या डोळ्यांनी आपल्याला अनिमेषपणे न्याहाळणारे स्थिर अचल’ ब्रह्म त्यांनी साकार, सगुण बनवून ते माणसाळवले. प्रिंगल-पॅटिसनसारख्या युरोपीय तत्त्वज्ञांप्रमाणे त्यांनी ब्रह्माला वैयक्तिक ईश्वर बनविले. परंतु, जीव आणि जगत ही ईश्वराधिष्ठित आहेत आणि तरीदेखील ईश्वर, जगत आणि जीव ही तिन्ही स्वतंत्रपणे सत्य आहेत, असे एक तात्त्वज्ञानिक कूट त्यांनी निर्माण केले, असा त्यांच्यावर नंतरच्या तत्त्वज्ञांनी आरोप केला आहे. उपनिषदातल्या ब्रह्माला ‘पांचरात्रा’तील सगुण देवाच्या लीलांमध्ये रामानुजांनी एवढे गुंतवून ठेवले की, कोणाला असे वाटावे, ‘रामानुज स्वतः या सृष्टिनिर्मितीच्या वेळी जातीने हजर राहून देवाला मदत करीत होते’ असे उद्गार डॉ. राधाकृष्णन यांनी काढले आहेत. जैनांप्रमाणे रामानुजांना जीव बंधनात का पडतो याचे कारण नीटसे समजविता आले नाही, असे डॉ. शर्मांचे मत आहे. जड पदार्थ आणि जीव ही ईश्वराची शरीरे मानण्यातही रामानुज तर्कापेक्षा कल्पनाशक्तीवर विसंबून राहिले आहेत, असे वाटते.
 
 
 
यामुळेच विशिष्टाद्वैत तत्त्वज्ञानाचे एकंदर मूल्यमापन करताना त्यातील लहानसहान तत्त्वांचा सुमेळ किती साधला होता, हे तपासण्यापेक्षा त्याची मूलभूत भूमिका ही केवळ शब्दच्छलातून निर्माण झालेली होती की खरोखरच परोक्ष अशा वास्तवातील कुठल्या तरी प्रश्नातून निर्माण झाली होती, हे शोधणे आवश्यक आहे. रामानुजांनी शंकराचार्यांच्या मायावादाविरुद्ध ज्या सात अनुपपत्ती मांडल्या, त्यांवरून त्यांची प्रखर विचारशक्ती प्रकट होते इतकेच नाही, तर त्यांच्या नंतरच्या विचारवंतांना या वादाविरूद्ध मते मांडण्याचा मार्ग त्यांनी दाखवून दिला, असेही होते. ‘माया किंवा अविद्या ही सत्यही नाही किंवा असत्यही नाही’ किंवा ‘ब्रह्म हे अनिर्वचनीय आहे कारण ते बुद्धीने ग्रहण करता येण्यासारखे नाही’ ही विधाने आजच्या तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने ‘बंद’ विधाने आहेत. त्यांच्याविषयी काही बोलणे खुंटते. शंकराचार्यांच्या तत्त्वज्ञानामुळे माया आणि ब्रह्म या तत्त्वांशिवाय तत्त्वज्ञानाला पुढे सरकविणे शक्य नव्हते आणि त्यांच्याविषयी काही वेगळे बोलणे, हेही शक्य नव्हते. अशा प्रसंगी रामानुजांनी भक्तिमार्गाच्या लौकिक परंपरेचा आवेग ध्यानात घेऊन वेदान्ताला कलाटणी देण्याचा जो प्रयत्न केला तो जीवनातल्या नव्या समस्या उकलण्यासाठी होता. रामानुजांच्या विशिष्टाद्वैत तत्त्वज्ञानातील लहानसहान वैगुण्ये मान्य करावी लागली तरी शेवटी असे म्हणावे लागते की, शंकराचार्यांचे वेदान्त तत्त्वज्ञान हे कुंठित बनून त्यावर शेवाळ साचण्यापूर्वी त्याला ढवळून त्यातून जीवंत झरे निर्माण करण्याचे काम रामानुजाचार्यांनी केले.
 
 
 
रामानुजाचार्यांचे समानतेचे कार्य
रामानुजाचार्यांच्या जीवनाचेच प्रयोजन पूर्णत: समाजकार्य करण्याचे होते. आपल्या सुलभ तत्त्वज्ञानाने आणि वैष्णव धर्माच्या तळागाळातील लोकांपर्यंत केलेल्या प्रचारामुळे रामानुजाचार्य प्रसिद्ध पावले. रामानुजाचार्यांच्या जीवनातील काही प्रसंग त्यांनी लोकोद्धारासाठी केलेले कार्य दर्शवतात. रामानुजाचार्यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाने त्यांच्या अज्ञानाचा पडदा क्षणार्धात नाहिसा झाला. एकेदिवशी रामानुजाचार्य सत्संग संपवून निघाले असता वाटेत एक चांडाळ आला. अचानक मध्ये आल्याने आचार्य भयंकर चिडले आणि कोणालाही अपवित्र न करता वाटेतून दूर होण्याची आज्ञा केली. चांडाळ परत फिरला आणि म्हणाला, “आचार्य, मी तुमच्या वाटेतून जाण्यास तयार आहे. परंतु, सर्वत्र पवित्र लोक आहेत. मी अपवित्र आहे, तर मी कुठे जाऊ एवढे सांगा.” त्याचे उद्गार ऐकून एक चांडाळ व्यक्ती सर्वत्र पवित्रता पाहत आहे आणि मी मात्र पवित्र-अपवित्र या भेदात अडकलो आहे, याचे ज्ञान रामानुजाचार्यांना झाले. त्यांनी त्या चांडाळाला नमस्कार करून झालेल्या चुकीची क्षमा मागितली.
 
 
 
वैष्णव संप्रदायातील काही मंत्रांचा अर्थ जाणण्यासाठी रामानुजाचार्य यमुनाचार्यांचे शिष्य गोष्ठीपूर्ण स्वामी यांच्याकडे गेले. रामानुजाचार्यांनी १८ वेळा प्रार्थना केली. शेवटी १९व्या वेळी ‘अधिकारी व्यक्तीशिवाय कोणालाही या मंत्रांचा अर्थ सांगू नये’ या अटीवरती त्यांनी रामानुजाचार्यांना मंत्रांचा अर्थ सांगितला. गोष्ठीपूर्ण स्वामींकडून दीक्षा घेऊन आपल्या निवासस्थानी ते परत आले. वाटेत असणार्‍या नृसिंह मंदिरात त्यांना प्रचंड जनसमुदाय दिसला. तो पाहून त्यांनी त्या सर्वसामान्य जनतेला ‘त्या’ मंत्रांचे रहस्य सांगून कृतार्थ केले. परंतु, या घटनेमुळे गोष्ठीपूर्ण स्वामी नाराज झाले. त्यांनी रामानुजाचार्यांना तत्काळ बोलवून घेऊन गुरुआज्ञा मोडण्याची शिक्षा तू जाणतोस का, असे विचारले. यावर रामानुजाचार्य म्हणाले, “हो. दहा हजार वर्षे नरकवास भोगावा लागतो. पण, ही आज्ञा मोडल्यामुळे असंख्य सामान्य जन स्वर्गप्राप्तीचे मानकरी झाले आहेत. त्या सर्वांसाठी मी नरक स्वीकारण्यास तयार आहे.” हे उत्तर ऐकून समाधानतेने गोष्ठीपूर्ण स्वामींनीच रामानुजाचार्यांचे शिष्यत्व स्वीकारले.
 
 
 
रामानुजाचार्यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, ते वृद्धावस्थेत अंघोळीसाठी नदीवर जातेवेळी ब्राह्मण व्यक्तीचा आधार घेत आणि अंघोळ करून परतताना तत्कालीन शुद्र समजल्या जाणार्‍या व्यक्तीचा आधार घेत. या कृतीविषयी ते सांगत, ईश्वराच्या दारात सर्व समानच आहेत. माझ्यावरती कोणाही श्रेष्ठत्वाचा अहंकार चढू नये यासाठी मी शुद्र समजल्या जाणार्‍या व्यक्तीचा आधार घेतो, त्यामुळे मला माझ्या कमीपणाची सदैव जाणीव राहते. रामानुजाचार्यांनी जगत सत्य तर मनुष्य बुद्धिमान आहे, असे मानले. त्यांनी मनुष्याच्या आध्यात्मिक, बौद्धिक आणि सामाजिक उन्नतीवरती भर दिला. भारतीय दर्शनांचा योग्य समन्वय साधून सामान्यांची उन्नती होईल, असे तत्त्वज्ञान स्थापन केले. त्यांनी केवळ तत्त्वज्ञान सांगितले नाही, तर त्याचे अनुकरण स्वत:ही केले. तत्कालीन दलित भक्त मारीनेरंबीच्या भक्तीला त्यांनी अनुकरणीय असून आपल्या संप्रदायात आदर्श स्थान दिले. जन्माने मुस्लीम असणार्‍या तुलुक्क नाच्चियार या कन्येची भक्ती ही लोकोत्तर भक्ती जाणून तिचे मंदिर रामानुजाचार्यांनी निर्माण केले.
 
 
 
भक्ती सर्वश्रेष्ठ असून ती कोणीही व्यक्ती करू शकते. भक्तीच्या प्रसारासाठी त्यांनी मठ-मंदिरांची निर्मिती करून तिथे सर्वांना प्रवेश दिला. स्वउन्नती करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असून ती स्वत:च्या पातळीवर श्रेष्ठ आहे, असे रामानुजाचार्य म्हणतात. उच्च-नीचतेने आंधळ्या झालेल्या समाजात समानता, सामाजिक समरसता स्थापन करण्याचे कार्य रामानुजाचार्यांनी केले. रामानुजाचार्यांनी वैष्णव संप्रदायात धार्मिक समता प्रस्थापित करण्याचे मोठे कार्य केले. दीन-दु:खितांच्या सेवेला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. मानवता हाच धर्म असून भेदभाव मानणे हा उन्नतीतील मोठा अडथळा आहे, हे रामानुजाचार्यांनी पटवून दिले. परिणामी आज वैष्णव संप्रदाय मोठ्या प्रमाणावर विस्तारित झालेला दिसून येतो. रामानुजाचार्यांनी आध्यात्मिक आणि सामाजिक स्तरावर केलेल्या कार्याला त्रिवार वंदन...! रामानुजस्य चरणौ शरणं प्रपद्ये!
 
 
- वसुमती करंदीकर
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.