‘संस्कृतसेवा इति जीवनाभिलक्षम् !’ अर्थात संस्कृत भाषेची सेवा हेच ध्येय मानून, गेली सात दशके कार्यरत असलेल्या स्नेहल शशिकांत नांदेडकर यांच्याविषयी...
स्वातंत्र्यपूर्व काळात विद्येचे माहेरघर पुणे येथे जन्मलेल्या स्नेहल यांचे वडील पंडित ना. वा. तुंगार हे नावाजलेले संस्कृतशास्त्री तथा लेखक होते. त्यामुळे घरातच ज्ञानगंगा अविरत वाहत होती. पाच भावंडांमध्ये स्नेहल या शेंडेफळ असल्याने त्यांचे बालपण तसे लाडातच गेले. पुण्यातील सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षणाचे धडे गिरवल्यानंतर स्नेहल यांना संस्कृत भाषेची गोडी लागली. त्यांनी पुण्याच्या एसपी महाविद्यालयामध्ये संस्कृत विषयात ‘बीए’ पदवी संपादन केली. काही काळ पुण्याच्याच शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करीत असताना विवाह झाल्याने पतीसोबत त्यांना पुणे सोडून दिल्लीत स्थायिक व्हावे लागले. पतीच्या नोकरी-व्यवसायातील बदलीमुळे १३ वर्षांनी १९८४ साली त्या सहकुटुंब कायमस्वरूपी ठाणेकर झाल्या. मात्र, संस्कृतची ओढ त्यांना स्वस्थ बसू देईना अन् २५ वर्षांनंतर त्यांनी ‘एसएनडीटी’मधून संस्कृतमध्येच उच्चशिक्षण पूर्ण केले.
भारताची प्राचीन भाषा असलेल्या संस्कृत भाषेची अधोगती होत असल्याने तसेच सध्याच्या शिक्षणप्रणालीत शाळांमध्ये शिकविली जाणारी संस्कृत भाषा म्हणजे परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण वाढावे, यासाठीच असून महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्येदेखील केवळ संस्कृत भाषेची ओळख होण्यापुरताच उल्लेख त्यांना अस्वस्थ करीत असे. यासाठी स्नेहल यांनी ‘सुरवाणी ज्ञानमंदिर’ या ठाणे जिल्ह्यातील एकमेव शासनमान्य संस्कृत पाठशाळेची धुरा शिरावर पेलली. दिवंगत पराष्टेकर शास्त्री यांनी संस्कृत भाषा ‘प्रसारिणी सभा’ या ट्रस्टच्या माध्यमातून ही शाळा १९५७ साली घंटाळी परिसरातील छोट्याशा जागेत सुरू केली होती. संस्कृत भाषेच्या ध्यासापोटी अल्पशा मानधनावर स्नेहल यांनी ‘सुरवाणी’ शाळेच्या प्रधानाचार्या म्हणून तब्बल ३३ वर्षे सेवा बजावली. या शाळेने अनेक विद्यार्थी घडवले. १९८७ या सुरुवातीच्या काळात शाळेची पटसंख्या आणि आर्थिक स्थिती यथातथाच असल्याने स्नेहल यांनी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच राजकीय प्रभुतींच्या मदतीने संस्कृतचा प्रचार आणि प्रसार होईल, असे विविध शैक्षणिक उपक्रम राबवले.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून संस्कृत शिक्षण तळागाळात पोहोचवण्यासोबतच प्रौढ शिक्षणातही संस्कृतची गोडी वाढावी, यासाठी कार्यशाळा व विविध उपक्रम आदी प्रयत्न केले. आबालवृद्ध आणि गर्भवती महिलांना संस्कृतचा परिचय व्हावा, यासाठीही अनेक उपक्रम राबवले. यात गर्भसंस्कार शिबिरे, निबंधवाचन, संस्कृत पठण, पाणिनीय संस्कृत आदींचे धडे आणि स्पर्धा आयोजित केल्या. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच पदव्युत्तर शिक्षण घेणार्यांना आणि शासकीय परीक्षार्थिंनाही संस्कृतचे मार्गदर्शन केले. शिक्षकांना संस्कृतचे विनामूल्य प्रशिक्षण देण्याचेही काम त्यांनी केले. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर संस्कृतविषयक कार्यक्रम सादर केले. विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून ‘संस्कृत’ विषयावर व्याख्याने, चर्चासत्रे आणि विपुल लेखन केल्याचे स्नेहल यांनी सांगितले. ‘कोविड’ काळात सर्व शिक्षण ठप्प असताना स्नेहल यांनी मात्र घरच्या घरी संस्कृतचे विनामूल्य संस्कार वर्ग घेऊन हा कालावधी सत्कारणी लावला. या संस्कार वर्गाचा ज्येष्ठांसह बच्चे कंपनीनेही लाभ घेतला. केवळ शिक्षणदान नव्हे, तर इतरांच्या सुखदुःखात सहभागी होण्यासह अडल्या-नडलेल्यांना सत्पात्री दान केल्याचे त्या सांगतात.
संस्कृत क्षेत्रात या प्रशंसनीय कामगिरीबद्दल स्नेहल यांना २००८ साली तत्कालीन गृहमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाचा ‘कवी कुलगुरू कालिदास साधना’ पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले. त्यानंतर पुरस्कारांची मालिकाच सुरू झाली. यात ‘ठाणे भूषण’, ‘हिरकणी’, ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’, ‘नवदुर्गा’, ‘मराठी राजभाषा दिनी पुरस्कार’ यासह अनेक उत्सव उपक्रमात पुरस्कार मिळाल्याचे स्नेहल सांगतात. आजकाल मोबाईल व इंटरनेटमध्ये गुरफटलेल्या नवीन पिढीला संदेश देताना त्या मौलिक उपदेश करतात. युवा पिढीने मन:शांती व आचार-विचार समृद्ध होण्याबरोबरच संस्कारमय जीवन व्यतीत करण्यासाठी संस्कृतचा ठेवा जपणे गरजेचे आहे. विदेशात संस्कृत भाषेचे महत्त्व कळले आहे. मात्र, संस्कृतची गंगोत्री असूनही भारतात संस्कृत लोप पावत चालल्याची खंत त्यांना नेहमीच सतावत असते. तेव्हा, संस्कृत भाषेचे अस्तित्व देशात टिकवणे गरजेचे असल्याचे मत त्या व्यक्त करतात. त्यामुळे संस्कृतप्रेमींनी, अभ्यासकांनी आत्मसात केलेले संस्कृत भाषेचे सर्वांगीण ज्ञान केवळ स्वत:पुरते, स्वत:च्या कामापुरतेच मर्यादित न ठेवता, या भाषेचा अधिकाधिक प्रचार-प्रसार कसा होईल, यासाठी प्रयत्नशील असणेदेखील तितकेच गरजेचे. स्नेहल नांदेडकर यांचे कार्य अशा सर्वांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकते, यात शंका नाही. अशा या संस्कृत विदुषीला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या आरोग्यदायी शुभेच्छा!