चेंबूरकरांना वीज मिळणार की नाही?
16-Feb-2022
Total Views |

मुंबई : चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीच्या परिसरात गेल्या दोन दिवसांपासून वीजेची आवकजावक सुरू आहे. याच वीजेच्या अनियमित पुरवठ्याविरोधात स्थनिक रहिवस्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. यावेळी उपस्थित नागरीकांनी वीज कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली.
३५०० हजारपेक्षा जास्त घरे असणाऱ्या या परिसरातून वीजबीलाची तब्बल ७७ कोटींपेक्षाही जास्त थकबाकी आहे. ही थकबाकी अदानी वीज कंपनीला डोईजड झाली असल्याने वीजपुरवठा खंडीत केला असल्याचे अदानी ईलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, नागरीकांनी नियमित वीजबील भरण्यास सुरुवात केली आहे. तरीही वीजपुरवठा खंडीत केला असल्याचा आरोप नागरीक करत आहेत. त्यामुळे आता लवकर वीजपुरवठा सुरळीत झाला नाही, तर मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढू अशी संतप्त प्रतिक्रिया नागरीक देत आहेत.
अदानी इलेक्ट्रीसिटीचं म्हणणं काय ?
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीतील ग्राहकांनी मागील १६ वर्षांपासून वीज देयके भरलेली नाहीत, परिणामी त्यांच्याकडील
थकबाकी ही आता ९८.९९ कोटी रुपयांवर गेली आहे. अशा प्रकारची देयके थकविण्याच्या प्रवृत्तीचा इतर नियमित देयके भरणाऱ्या ग्राहकांवर अनावश्यक भार पडत आहे. या थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा यापूर्वी अनेक वेळा खंडित करण्यात आला आहे.
यापूर्वी ऑगस्ट २०१९ मध्ये जेव्हा शेवटचा वीज पुरवठा खंडित केला गेला होता. जून २०१९ पासूनची सर्व चालू देयके मासिकआधारावर भरण्याचे आणि मागील थकबाकी तीन महिन्यांच्या कालावधीत भरली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाच्या आधारावर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला होता. तथापि, गतकाळातील थकबाकी अजूनही कायम आहे आणि मोठ्या संख्येने ग्राहकांनी त्यांची चालू मासिक देयके भरण्यात देखील कूचराई सुरूच ठेवली आहे.
अदाणीइलेक्ट्रिसिटीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले की,अनेकदा शिथिलता दिली गेली, अनेक सूचना आणि स्मरणपत्रे देऊनही, सिद्धार्थ कॉलनी आणि शुद्धोधन नगर येथील ग्राहकांनी त्यांची मागील थकबाकी भरलेली नाही आणि चालू देयके भरण्याचही त्यांनी कूचराई सुरू ठेवली आहे. यामुळे आमच्या नियमित देयके भरत असलेल्या ग्राहकांवर अनावश्यक शुल्काचा बोजा पडतो आणि अशी परिस्थिती अस्वीकारार्हच आहे. त्यामुळे आमच्या नियमित पैसे देणाऱ्या ग्राहकांच्या हित रक्षणासाठी अशा थकबाकीदारांच्या विरोधात सामूहिक वीज- तोडणीच्या कारवाईशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग उरलेला नाही.”