मुंबई : मुंबई विद्यापीठाने एप्रिल - मे दरम्यान होणाऱ्या बहुतेक परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंबईतील बऱ्याच महाविद्यालयांनी त्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद करून पुन्हा ऑफलाईन शिक्षण सुरु केले आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण अचानक बंद करून ऑफलाईन शिक्षण सुरु करण्यावर विद्यार्थ्यांनी मात्र आक्षेप नोंदवला आहे.
"ऑक्टोबर २०२१ मध्येच सरकारकडून सांगण्यात आले होते कि कोणत्याही विद्यार्थ्याला ऑफलाईन पद्धतीने शिक्षण घेण्यास महाविद्यालयाकडून कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात येऊ नये. परंतु महाविद्यालयांकडून हळू हळू ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग बंद करण्यात येत आहे. परंतु आमच्यापुढे कोणताच दुसरा पर्याय महाविद्यालयांकडून ठेवण्यात न येणं हे योग्य नाही."
मार्च २०२० पासून सर्व शाळा आणि महाविद्यालये कोरोनाच्या प्रभावामुळे बंद करण्यात आली होती. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने ऑक्टोबर २०२१ मध्ये सरकारकडून शाळा व महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले होते. परंतु वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे जानेवारी २०२२ मध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा महाविद्यालये बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. मात्र १ फेब्रुवारी पासून पुन्हा महाविद्यालये ऑफलाईन पद्धतीने सुरु करण्यात आली आहेत.
तसेच १० फेब्रुवारी रोजी मुंबई विद्यापीठाकडून घोषणा करण्यात आली कि, पदवी आणि पदवीयुत्तर बहुतेक परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. 'मुंबई विद्यापीठाकडून ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्यानंतर जे विद्यार्थी आपल्या मूळ गावातून ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असतील त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शहरात येण्यासाठी आम्ही पुरेसा वेळ दिला आहे,' असे बांद्रामधील सेंट अँड्रीव महाविद्यालयाचे मुख्याध्यापक मेरी फर्नांडिस यांनी सांगितले आहे.