मुंबई: पालघरचे शिवसेना खासदार यांना मोठा दणका मिळाला आहे. जमीन विकास प्रकरणी दिलेला चेक बाउन्स झाल्याच्या प्रकरणात त्यांना एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच, पावणेदोन कोटी रुपयांच्या भरपाईची शिक्षादेखील पालघरच्या प्रथम वर्ग न्यायालयाने सोमवारी ठोठावली आहे. राजेंद्र गावित यांना या प्रकरणी जामीन मंजूर झाला असून, शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठी याचिका दाखल करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. पालघरमधील साईनगरजवळ असलेल्या एका भूखंडाच्या विकास करारनाम्याचे हे प्रकरण आहे.
८ ऑक्टोबर २०१४ रोजी पालघरमधील व्यावसायिक चिराग बाफना यांच्याशी गावित यांचा साईनगर येथील भूखंडाचा विकास करण्यासाठी एक कोटी रुपयांचा करारनामा झाला होता. या कराराचे उल्लंघन करत राजेंद्र गावित यांनी हीच जागा अन्य विकासकाला विकसित करण्यासाठी दिली होती. तसेच जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून चिराग बाफना यांना विकास कामासाठी परवानगी देण्यास विरोध केला होता. सन २०१७ मध्ये पालघरच्या दिवाणी न्यायालय येथे विकास कराराची पूर्तता न झाल्याबद्दल संबंधित विकासकांनी दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना शिक्षा आणि दंड ठोठावन्यात आले आहे.