संवेदनशील, सांप्रदायिक घटनांचे प्रतिक्रियाकेंद्र बीड !

हिजाब समर्थनार्थंच्या फलकांमुळे बीड पुन्हा चर्चेत

    14-Feb-2022   
Total Views |
 
BEED
 
  
 
मुंबई : कर्नाटक राज्य सरकारच्या वतीने सरकारी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करण्याच्या संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयावरून देशभरासह आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील उडपी या ठिकाणच्या महाविद्यालयात घडलेल्या एका घटनेचे पडसाद आणि त्याच्या प्रतिक्रिया उडपीपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातही उमटू लागल्या आहेत. मात्र, आश्चर्यकारक बाब म्हणजे उडपीत घडलेल्या या घटनेचे पडसाद उडपीपासून सुमारे ७८४ किलोमीटर दूर असलेल्या महाराष्ट्रातील बीड शहरात अवघ्या काही तासांमध्ये उमटले आणि त्याची राज्यभरात चर्चाही झाली. मागील काही वर्षांमधील घटनांचा अभ्यास केल्यानंतर एक बाब ठळकपणे अधोरेखित झालेली आहे ती म्हणजे देशभरात घडलेल्या कुठल्याही सांप्रदायिक घटनेचे पडसाद बीडमध्ये प्रकर्षाने आणि तात्काळ उमटतात. या मागे नक्की कारण काय याचा आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न..
 
 
फलक रातोरात हटविले ; मात्र चर्चा कुठेच नाही !
कर्नाटकातील ज्या हिजाब प्रकरणावरून हा वादंग सुरु झाला होता आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून जे काही फलक बीडच्या काही प्रमुख भागांमध्ये लावण्यात आले होते, ते अवघ्या काही तासांमध्ये तेथून हटविण्यात आले होते. फलक लावण्यात आल्यानंतर सुरु झालेला वाद आणि त्याला प्राप्त होणारे धार्मिकतेचे स्वरूप पाहता स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि काही पत्रकारांच्या पुढाकाराने हे फलक तेथून हटविण्यात आले होते. 'ज्याप्रमाणे फलक लागल्याची चर्चा सर्वत्र झाली, दुर्दैवाने तशी चर्चा फलक काढलयाची झाली नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार माध्यमे आणि राज्यातील जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी जाणीवपूर्वकरीत्या घडवून आणण्यात आला होता, हे निर्देशित करतो,' अशी प्रतिक्रिया स्थानिक बीडकरांनी दिली आहे.
 
 
 
 
मराठवाड्यावरील निजाम राजवटीचा प्रभाव
 
मराठवाड्यावर अनेक वर्षे निजामाच्या राजवटीचा प्रभाव होता. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ६० ते ७० वर्षे लागली, पण स्वामी रामानंद तीर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी केवळ दहा वर्षाच्या काळात अभूतपूर्व कामगिरी करून या भागाला मुक्ती मिळवून दिली. सातवा निजाम अत्यंत धर्मांध, धूर्त, हिंदूद्रष्टा व महत्त्वाकांक्षी होता. त्याने ‘इत्तेहादुल मुसलमान’ या संघटनेला राजाश्रय दिला. १९४० व झाली रझाकार संघटनेला कार्यरत केले आणि निजामाच्या अधिपत्याखालील मराठवाड्यातील जनतेवर अन्याय केले गेले. १९४८ साली निजाम राजवटीच्या जुलुमी जोखडातून जरी मराठवाड्याची सुटका झालेली असली तरी अद्यापही त्या विचारांचा काहीसा प्रभाव आणि त्या प्रभावातून समाजातील काही घटकांमध्ये निर्माण झालेली शक्तिशाली असल्याची जाणीव हे अशा सर्व घटना घडण्यासाठी कारणीभूत ठरत असल्याची शक्यता कायमच वर्तवली गेली आणि आजही वर्तवली जाते. त्यामुळे निजाम राजवटीतील सत्ताधाऱ्यांच्या विचाराचा प्रभाव आजही या भागातील काही असामाजिक घटकांमध्ये असल्याचे अधोरेखित झालेले आहे.
 
 
 
 
बंडखोर विचार आणि प्रवृत्तीचा जिल्हा
 
बीडकडे कायम राज्यच नव्हे तर देशभरातही एक बंडखोर प्रवृत्तीचे शहर म्हणून पाहिले जाते. अशा कुठल्याही प्रकारच्या सामाजिक, राजकीय आणि अन्य क्षेत्रांमध्ये होणाऱ्या बंडखोरीचे केंद्रस्थान म्हणून बीड कायम समोर आले आणि आजही ती प्रतिमा कायम आहे. या भागातून कुठलाही ठोस जातीय आधार नसलेली मंडळी देखील लोकप्रतिनिधी म्हणून विधिमंडळ आणि लोकसभेत प्रतिनिधित्व करत होती. जगभरासह भारतातही जेव्हा कम्युनिस्टांचा प्रभाव ओसरत होता तेव्हा बीडसारख्या जिल्ह्याने गंगाधर बुरांडे यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले होते. इंग्रजांच्या विरोधात लढणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनाही १९६७ साली बीडच्या जनतेने लोकसभेवर पाठविले होते. कायमच जातीयवादी आणि मागास ठरविल्या जाणाऱ्या या जिल्ह्याने धक्कातंत्राचा वापर करून असे अनेक राजकीय चमत्कार करून दाखवलेले आहेत. राज्यात घसरत जाणाऱ्या लिंग गुणोत्तराला कारणीभूत ठरणाऱ्या स्त्री भ्रूण हत्या प्रकाराला विरोध करण्यासाठीची ठिणगी देखील बीडमध्ये पडली होती. त्यासोबतच देशभरात गाजलेल्या 'शाहीन बाग' प्रकरणाचा देखील मोठा प्रभाव बीड जिल्ह्यात दिसून आला होता. त्यामुळे एकंदरच सामाजिक, राजकीय आणि अशा विविध क्षेत्रातील बंडखोर विचारांचा आणि प्रवृत्तीचा मोठा पगडा या जिल्ह्यावर कायमच राहिल्याचे या घटनांवरून स्पष्ट होते.
 
 
 
 
विकासापासून जिल्हा शेकडो मैल दूरच !
 
मुळात कुठल्याही भागाचा विकास हा तेथील उद्योग, पायाभूत सुविधा, भौगोलिक रचना आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून असतो. दुर्दैवाने बीड हे गेल्या कित्येक वर्षांपासून दुष्काळाच्या दुष्टचक्रातून आपली सुटका करून घेऊ शकलेले नाही. मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांचे जाळे उभारलेले असतानाही केवळ रेल्वे आणि तत्सम दळणवळणाच्या साधनांची अनुपलब्धता या भागात विकासाला वाट मोकळी होऊ देत नाही, हे बीडचे भीषण वास्तव आहे. राजकीयदृष्ट्या भक्कम पाठबळ असलेल्या या जिल्ह्याकडे मात्र कायमच मतदान आणि निवडणुका या विशिष्ठ करण्यापुरतेच लक्ष दिले गेले. राजकीय अनास्थेमुळे ना बीडमध्ये पायाभूत सुविधांची उभारणी झाली ना कुठल्याही मोठ्या उद्योग समूहाने इथे उद्योग उभारणीसाठी इथे पाय ठेवण्याचे धारिष्ट्य केले. त्यामुळे स्वाभाविकपणे नोकऱ्या आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्याने एक खूप मोठा वर्ग बेकारीच्या वाटेवर उभा असल्याचे चित्र कायम दिसून आलेले आहे.
 
 
 
 
विशिष्ठ घटकांचे अनुनयन धार्मिक तेढीस कारणीभूत
 
बीडवर निजाम राजवटीचा मोठा प्रभाव असल्याने येथील काही घटकांना बीडमधील बड्या राजकीय घराण्याकडून बेकायदेशीर कृत्ये करण्यासाठी अभय देण्याचा आणि कायमच त्या एका घटकाचे लांगुलचालन करण्याचाही आरोप त्या कुटुंबावर बीडच्या वर्तुळात लावला गेला. या आश्रयाचा गैरफायदा घेत काही असामाजिक घटक केवळ आपले अस्तित्व दाखविण्यासाठी अशा प्रकारच्या चमकोगिरीचा वापर करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात. मात्र, दुर्दैवाने काही असामाजिक घटकांच्या धार्मिक-सांप्रदायिक प्रतिक्रियावादी धोरणाचा दुष्परिणाम संबंध जिल्ह्याच्या प्रतिमेवर होतो आणि जिल्ह्याची प्रतिमा मलिन होते हे दुर्दैवी आहे. केवळ प्रतिक्रियावादाच्या चढाओढीमुळे या भागात धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता कायमच असते, मात्र सुदैवाने तसा कुठलाही हिंसात्मक प्रकार अथवा धार्मिक गैरप्रकार मागील अनेक वर्षांमध्ये घडून आलेला नाही. त्यामुळे काही घटकांचे अनुनयन करण्याच्या उद्दिष्टाआडून बीडमध्ये धार्मिक तेढ पसरविण्याचे प्रयत्न मात्र असंख्य वेळा असफल झाल्याचे चित्र आहे.
 
 
 
दुसरी सकारात्मक बाजू पुढे येणे आवश्यक !
 
बीड हा कायम मागासलेला जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळखला जातो. परंतु याच बीड जिल्ह्यातील मुकुंदराजांनी विवेकसिंधु हा पहिला मराठी काव्य ग्रंथ लिहिला होता. अनेक इतिहासकारांच्या दाव्यानुसार थोर गणितशास्त्रज्ञ आर्यभट्ट ज्यांनी शून्याचा शोध लावला होता, त्यांचे जन्मस्थान देखील बीड होते. या सारख्या अनेक सकारात्मक बाबी देखील बीडची प्रतिमा उंचावण्यासाठी मदतशीर ठरतील पण दुर्दैवाने जिल्ह्यातील काही घटकांची आवश्यकतेपेक्षा अधिकची राजकीय समज - महत्त्वाकांक्षा आणि नेतृत्व करण्याची अवाजवी इच्छा जिल्ह्याच्या प्रतिमेवर मोठा नकारात्मक परिणाम करत आहे. तेव्हा केवळ मागासलेपण किंवा सांप्रदायिक घटनांच्या बाबतीत चर्चिल्या जाणाऱ्या आमच्या जजिल्ह्याची ही दुसरी बाजू देखील तितक्याच प्रमाणात चर्चिली जावी, हीच आमची भावना आहे,' अशी प्रतिक्रिया स्थानिक बीडकरांनी दिली आहे.
 
 
 
 
'आधी किताब मग हिजाब हीच कुराणची शिकवण'
 
पहिले हिसाब फिर किताब की घोषणा अत्यंत चुकीची आहे. कुराणमध्ये अशा पहिले किताब आणि मग हिजाब या संकल्पनेला मान्यता दिलेली आहे या सगळ्या गोष्टींचा उल्लेख देखील कुराणमध्ये आणि इस्लाम मध्ये करण्यात आलेला आहे. जेव्हा या संदर्भात मी एमआयएमच्या जिल्हाध्यक्षांची बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी हा सगळा प्रयत्न विद्यार्थी आघाडीच्या सदस्यांनी केल्याचे नमूद केले आहे त्याला कुठलीही मान्यता यांची नव्हती असे देखील त्यांनी म्हटलंय.. या सृष्टीची निर्मिती देखील एका लेखणीतून झाली होती त्यामुळे किताब ला पर्याय नाही.
- काझी मकदूम, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार, बीड
 
 
 
 
'विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करणे आवश्यकच !'
 
'आज कित्येक इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळांमध्ये हिंदू मुलींना टिकली आणि बांगडी वापरण्यास मनाई आहे. या वस्तू परिधान करण्यामागे काही तर्क आणि शास्त्रीय कारणे आहेत. मात्र, यावर कुणीही ब्र काढत नाही, कारण तो निर्णय संबंधित शाळा प्रशासनाने घेतलेला असतो. त्याच प्रमाणे जर शाळेत हिजाब घालण्यासाठी मनाई करण्यात आली असेल, तर त्याला विरोध कशासाठी ? त्यामुळे विद्यार्थ्यांना लावण्यात आलेले नियम हे सर्वांना समान असावेत आणि विद्यार्थ्यांनी देखील त्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे.
 
- हेमंत बिडवे, शिक्षक तथा स्थानिक रहिवासी
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.