मुंबई (विशेष प्रतिनिधी) - यंदाच्या सागरी कासव विणीच्या हंगामात संरक्षित करण्यात आलेल्या अंड्यांमधून पिल्लांनी डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे. ही पिल्लं वाळूतून मार्गक्रमण करत समुद्रात रवाना होण्यास सुरुवात झाली आहे. सागरी कासव विणीच्या यंदाच्या हंगामात जन्मास आलेली पहिले पिल्ले दिवेआगर किनाऱ्यावरुन समुद्रात सोडण्यात आली आहेत. ( konkan sea turtle )
राज्यातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन सागरी जिल्ह्यांमधील काही किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालण्यासाठी येतात. ( konkan sea turtle ) यामध्ये 'ऑलिव्ह रिडले' या प्रजातीच्या माद्यांचा समावेश असतो. रायगड जिल्ह्यातील ४, रत्नागिरीमधील १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ किनाऱ्यांवर समुद्री कासवे अंडी घालतात. नोव्हेंबर ते मार्च हा सागरी कासवांचा विणीचा हंगाम असतो. यंदाच्या या हंगामात किनाऱ्यावर आढळलेली अंडी कासवमित्रांकडून संरक्षित करण्यात आली होती. या अंड्यांमधून आता पिल्ल बाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. ( konkan sea turtle )
दिवेआगर आणि श्रीवर्धन किनाऱ्याच्या मधल्या पट्ट्यामध्ये आरवी किनारा आहे. या किनाऱ्यावर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घरटे सापडले. या किनाऱ्यावर घरट्याच्या देखभालीसाठी कोणीही नसल्याने घरट्यात सापडलेल्या १०० अंड्यांना दिवेआगर किनाऱ्यावर हलवण्यात आले होते. या अंड्यांमधून ४५ पिल्ले बाहेर पडली असून त्यांंना समुद्रात सोडण्यात आल्याची माहिती श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी मिलिंद राऊत यांनी दिली. येत्या काळात इतर किनाऱ्यांवर संरक्षित केलेल्या घरट्यांमधून पिल्ले बाहेर पडण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान वेळास आणि आंजर्ले किनाऱ्यावर सॅटलाईट काॅलर लावलेल्या 'प्रथमा' आणि 'सावनी' या माद्या देखील आपले मार्गक्रमण करत आहेत. ( konkan sea turtle )
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.