ठाणे : शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याच्या महापालिकेत गेली अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. ३ फेब्रुवारी रोजी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ठाणे महापालिकेचा २०२२-२३ साठीचा अर्थसंकल्प १० फेब्रुवारी रोजी पालिका आयुक्तांनी स्थायी समितीकडे सादर केला. मात्र हा अर्थसंकल्प ऑनलाईन स्वरूपात सादर झाल्याने सादरीकरणात गोंधळ उडाला असून यावर काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
काँग्रेस नेते विक्रांत चव्हाण आणि भाजप नेते मिलिंद पाटणकर यांनी ऑनलाईन अर्थसंकल्पाला तीव्र विरोध दर्शवला आहे. 'सभागृहात सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित असताना, नगरसेवक आणि विरोधकांना ऑनलाईन स्वरूपात उपस्थिती का?', असा प्रश्न विरोधकांकडून विचारला जात आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी त्याची प्रत न दिल्याचा आरोपही विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. पालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी झालेल्या गोधळातच ३ हजार २९९ कोटींच्या अर्थसंकल्पाचे सादरीकरण सुरू केल्याने विरोधक ऑनलाईन मिटिंग मधून बाहेर पडले.