मुंबई : कर्नाटकातील हिजाब प्रकरणाचा वाद मिटण्यापूर्वीच मुंबईत त्याच धर्तीवर आणखी एक आंदोलन नुकतेच पार पडले. मुंबईच्या ग्रँट रोड भागातील सेंट कोलंबो शाळेसमोर बुधवार, दि. १० फेब्रुवारी रोजी मुंबई भाजपच्या युवती मोर्चातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले. 'शाळेत शिस्त पाळण्यासाठी काही गोष्टींवर शाळा प्रशासनाकडून बंदी घालण्यात येत आहे. ही बाब मान्य करता येईलही, मात्र हिंदू संस्कृतीचे जतन केल्यास शाळेत प्रवेश नाकारणे कुठल्या नियमात बसते ? त्यामुळे शाळा प्रशासनाचे हे नियम केवळ हिंदू मुलींच्याच बाबतीत लागू होणे ही बाबत अत्यंत दुर्दैवी आहे. अशाच प्रकारची घटना मुंबईच्या ग्रँट रोड परिसरातील सेंट कोलंबो या शाळेमध्ये घडत आहे. हिंदू संस्कृती जोपासण्याला या शाळेचा विरोध असल्यामुळे त्याच्या निषेधार्थ आज आमच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन करण्यात आले आहे,' अशी भूमिका मुंबई भाजप युवती मोर्चातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
'ग्रँट रोड परिसरातील सेंट कोलंबा हायस्कूलमध्ये मुलींना हिंदू संस्कृती जोपासण्यास बंदी घालण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष शरद चिंतनकर यांच्या नेतृत्वात भाजप मुंबई युवती मोर्चाच्या वतीने हायस्कूलच्या बाहेर गुरुवार दि. १० फेब्रुवारी २०२२ रोजी आंदोलन करण्यात आले आहे.' अशी माहिती मुंबई भाजपतर्फे देण्यात आली.
सर्व धर्मातील मुलीना समान ड्रेस कोड असायला हवा : पल्लवी सप्रे
मुंबई भाजप युवती मोर्चाच्या अध्यक्षा पल्लवी सप्रे म्हणाल्या की, 'दक्षिण मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील सेंट कोलंबो या शाळेमध्ये हिंदू संस्कृती जोपासण्यासाठी विरोध असून याचा आम्ही निषेध करतो. शाळेच्या ऑनलाइन लेक्चरमध्ये सुद्धा मुलींना टीकली लावू दिली जात नाही. हातावर मेहंदी देखील काढू दिली जात नाही या सगळ्या गोष्टी होत असताना तिथेच "हिजाब" च्या संदर्भात शाळेकडून कोणतीच बंदी नाही. मग अन्याय फक्त हिंदूं मुलींवरच का? हा आमचा सवाल आहे. शाळेचा जो ड्रेस कोड आहे, तो आम्ही देखील मानतो. मग सर्व धर्मातील मुलीना समान ड्रेस कोड असायला हवा. एका धर्माला एक न्याय आणि इतरांना दुसरा हा भेद होता काम नये,' अशी भूमिका पल्लवी सप्रे यांनी व्यक्त केली आहे.