आधी चिनी अॅप्सवर बंदी, नंतर चिनी खेळण्यांवर, पण आता भारत चीनच्या आणखी एका उत्पादनावर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे दिसते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजना सुरू केली. तेव्हापासून भारत कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात मोठी उपलब्धी प्राप्त करत आहे. अशा परिस्थितीत भारताने चीनकडून आयात केल्या जाणार्या इलेक्ट्रिक पंखे आणि ‘स्मार्ट मीटर’च्या चौकशीचे संकेत दिले आहेत. एका इंग्रजी दैनिकानुसार वाणिज्य मंत्रालय लवकरच चीनमधून येणार्या उत्पादनांसाठी ‘क्वालिटी कंट्रोल ऑर्डर’ जारी करणार असून यामुळे आयात होणार्या इलेक्ट्रिक पंखे आणि ‘स्मार्ट मीटर’ची योग्यप्रकारे चौकशी केली जाऊ शकेल. चिनी खेळण्यांच्या आयातीवर यशस्वीपणे लगाम कसल्यानंतर आता मोदी सरकार चिनी इलेक्ट्रॉनिक्सच्या आयातीवरही लगाम लावणार आहे. एका अधिकार्याच्या हवाल्याने वृत्तपत्रात प्रकाशित वृत्तानुसार, आम्ही मोठ्या प्रमाणावर उत्पादन केल्या जाणार्या उत्पादनांवर जसे की, ‘स्मार्ट मीटर’ आणि पंख्यांसाठी ‘क्वालिटी कंट्रोल ऑर्डर’ आणण्यावर विचार करत आहोत. यामुळे देशांतर्गत उद्योग आणि ग्राहकांना फायदा होईल. दरम्यान, 2022मध्ये भारतात पंख्यांची आयात 132 टक्क्यांनी वाढून जवळपास 62.2 लाख डॉलर्सची झाली, यातील 59.9 लाख डॉलर्सचे पंखे चीनमधून आयात झाले होते. 2022 मध्ये इलेक्ट्रिक मीटरची आयात वाढून 31 लाख डॉलर्सची झाली आणि यातही 13.2 लाख डॉलर्स मूल्याचे इलेक्ट्रिक मीटर चीनमधून आयात झाले.
तत्पूर्वी भारताने कठोर ‘क्वालिटी चेक’ नियमांच्या माध्यमातून चीनमधून आयात केल्या जाणार्या खेळण्यांवर लगाम कसला होता. भारतात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांसह चिनी खेळण्यांचीदेखील अधिक मागणी होती. चिनी सामानाच्या दर्जाबाबत नेहमीच तक्रारी येत होत्या. खेळण्यांबाबतही स्थिती वाईटच होती. 2020मध्ये भारताने खेळण्यांबाबत ‘क्वालिटी कंट्रोल ऑर्डर’ जारी केली होती, त्यानंतर गेल्या वर्षी खेळण्यांच्या आयातीला 70 टक्क्यांपर्यंत घट पाहायला मिळाली. आर्थिक वर्ष 2019 मध्ये 37.1 कोटी डॉलरवर असलेली आयात 2020मध्ये 11 कोटी डॉलर झाली. याचदरम्यान, चीनमधून खेळण्यांची आयात 80 टक्के घटून 5.9 कोटी डॉलर्सवर आली. तीन-चार वर्षांआधी भारत खेळण्यांसाठी अन्य देशांवर अवलंबून होता, त्यावर चीनचे वर्चस्व होते. पण, आता यात मोठा बदल झाला आहे. देशात खेळणी उद्योग वेगाने विस्तार आहे. भारत आता अन्य देशांनाही आपण तयार केलेल्या खेळण्यांची निर्यात करत आहे. मंत्रालयानुसार तीन वर्षांत खेळण्यांच्या निर्यातीत 61 टक्के वाढ पाहायला मिळाली. एचएस कोड 9503 आणि 9504 साठी खेळण्यांची निर्यात वाढून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 326 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. ती आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 202 दशलक्ष डॉलर्स होती. एचएस कोड 9503साठी खेळण्यांची निर्यात 177 दशलक्ष डॉलर्सवर पोहोचली. तसे पाहिले, तर हा बदल सहजासहजी झाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘आत्मनिर्भर भारत’, ‘मेक इन इंडिया’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’ अभियानाच्या माध्यमातून भारतीय खेळण्यांच्या उद्योगाला मजबूत केले गेले.
उद्योग विभागाने 2020 पासून जवळपास 20 ‘क्वालिटी कंट्रोल ऑर्डर’ जारी केल्या. सप्टेंबरमध्ये एका उद्योगविषयक कार्यक्रमात बोलताना वाणिज्यमंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की, “देशातील सर्वात गरीब व्यक्तीदेखील सर्वोत्तम गुणवत्तेच्या उत्पादनांचा अधिकारी आहे आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करण्याची संस्कृती आपलीशी करावी लागेल. भारतात पंखे आणि इलेक्ट्रिक मीटरच्या आयातीतील वाढ समोर ठेवून सरकार आता या दोन्ही उत्पादनांच्या गुणवत्तेची पूर्णपणे चौकशी करेल.” ज्याप्रकारे चिनी खेळण्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांच्या आयातीत घट झाली त्याचप्रकारे सरकारला पंखे आणि इलेक्ट्रिक मीटरच्या दर्जामध्ये गडबड असल्याचे दिसल्यास भारतात त्यांचीही आयात घटायला वेळ लागणार नाही, हे यावरून स्पष्ट होते. याचाच पुढचा भाग म्हणजे चीनमधून या उत्पादनांच्या आयातीत घट झाली की खेळण्यांप्रमाणेच भारतात पंखे आणि इलेक्ट्रिक मीटरच्या उत्पादनात वाढ होईल आणि ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन मिळेल.