मुंबई : महाविकास आघाडीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांविरोधात आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांविरोधात महामोर्चा काढण्याची घोषणा केली. हा मोर्चा १७ डिसेंबर रोजी जिजामाता उद्यान ते आझाद मैंदान या मार्गावर होणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून केले होते. ठाकरेंच्या या मोर्चाला ओवेसींनीही पाठींबा दर्शवल्याचे दिसत आहे. एमआयएम पक्षाचे खा. इम्तियाज जलील यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
"ज्यावेळी महाराष्ट्राच्या राज्यपालांनी सावित्रीबाई फुलेंविषयी विधान केले होते, तेव्हाच महाराष्ट्राने त्यांच्याविरोधात जोरदार विरोध दर्शवला असता तर त्यांची आता शिवरायांबद्दल बोलायची हिम्मत झाली नसती. राज्यातील सर्वपक्षांना एकमताने राज्यपालांविरोधात निर्णय घेण्याची गरज आहे. एमआयएम पक्षानेही महाराजांचा कधी अवमान केला नाही.", असे इम्तियाज जलील यावेळी म्हणाले. तसेच मुंबईत १७ डिसेंबरला मविआतर्फे काढण्यात येणाऱ्या महामोर्चात एमआयएम पक्षही सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.