उदयपूर : ‘जी २०’ चे अध्यक्षपद मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिनिधींची (शेर्पा) पहिलीच बैठक राजस्थानमधील उदयपूर येथे रविवारपासून सुरू झाली आहे. या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींसाठी ‘अतिथी देवो भव’ ही संकल्पना राबवण्यात आली असून चार दिवस चालणार्या या बैठकीसाठी परंपरागत पद्धतीने शेर्पांचे स्वागत करण्यात आले.
भारताचे शेर्पा अमिताभ कांत यांनी सदस्य देशांच्या शेर्पांचे स्वागत केले. ते म्हणाले की, “उत्कृष्ट आदरातिथ्य आणि ऐतिहासिक ठेवा ही राजस्थानची परंपरा जगप्रसिद्ध आहे. त्याचे प्रतीकात्मक दर्शन यानिमित्त पाहुण्यांना होणार आहे.”
उदयपूर येथील ‘हॉटेल लीला’ येथे शेर्पा यांची बैठक होत असून, सोमवारी विविध देशांचे ४० प्रतिनिधी ‘जी २०’च्या विकासात्मक ध्येयाबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. यात तंत्रज्ञानातून संतुलित विकास, विभिन्नतेतून अन्न, इंधन आणि खत आणि सर्वसमावेशक जीवन त्याचबरोबर महिलांच्या नेतृत्वाखाली विकास तसेच पर्यटन आणि संस्कृती या विषयांवर या वेळी चर्चा होणार आहे.
‘जी २०’चे अध्यक्षपद भारताकडे आल्यानंतर ही पहिलीच बैठक उदयपूर येथे होत आहे. त्यामुळे संपूर्ण परिसर सज्ज ठेवण्यात आला आहे. पुढील वर्षभरात ‘जी २०’ च्या २०० बैठका देशातील विविध ५५ शहरांत होणार असल्याचेही अभिकांत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
भारताकडे ‘जी २०’चे अध्यक्षपद आल्याने ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना हाती घेतली आहे, तसेच ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ ही संकल्पना हाती घेतली आहे.
‘जी २०’च्या सदस्य देशांसाठी ‘चाय पे चर्चा’ हा उपक्रमही राबविण्यात येणार आहे.