‘ठाणेदार’ होणार भाजपचाच!

आ. निरंजन डावखरे यांना विश्वास

    30-Dec-2022   
Total Views |
निरंजन डावखरे


नागपूर:
येत्या काळात ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर बसविण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न करणार, असा विश्वास आमदार निरंजन डावखरे यांनी व्यक्त केला आहे. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी डावखरेंनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीतील घटक पक्षांत असलेल्या विस्कळीतपणावरही त्यांनी टीका केली.
 
“सहा महिन्यांपूर्वी झालेल्या राजकीय घडामोडींचे स्थित्यंतरामुळे राज्यातील सरकार बदलले. या घडामोडींमध्ये ठाण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. एकनाथ शिंदेंनी केलेल्या या उठावामुळे शिंदे गट बळकट झाला असला तरी त्याचा ठाणे भाजपवर परिणाम झालेला नाही. भाजपची स्थिती पूर्वीप्रमाणेच अधिकाधिक बळकट होत असून आमचे संघटन आजही भक्कम आहे,” असा विश्वासही डावखरे यांनी व्यक्त केला आहे.


विरोधकांचा भर वैयक्तिक मुद्द्यांवरच


“विरोधक मूळ मुद्द्यांवर लढत नव्हते असेच चित्र या हिवाळी अधिवेशनात त्यांनी घेतलेल्या भूमिकांमधून स्पष्ट झालेले आहे. अकारण काही मुद्दे उकरून आणि सीमाप्रश्नासारख्या विषयांना चुकीच्या पद्धतीने जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न करून महाराष्ट्राचे लक्ष भरकटवण्याचे उद्योग विरोधकांनी केले. त्यांचा रोख हा जनतेचे प्रश्न सोडवण्यापेक्षा वैयक्तिक स्वार्थाचे विषय मार्गी लावण्यावरच अधिक होता,” अशी टीकाही डावखरेंनी महाविकास आघाडीवर केली. तसेच या अधिवेशनाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांत एकजूट तर विखुरलेले विरोधक असे विसंगतीपूर्ण चित्र राज्यासमोर आल्याचे म्हणत त्यांनी मविआवर निशाणा साधला.

पक्षनेतृत्वाचा निर्णय शिरसावंद्य


ठाणे महापालिका निवडणुकीवर बोलताना डावखरे म्हणाले की, ‘’२०१७ची ठाणे महापालिका निवडणुक भाजपने एकहाती लढवली होती. मात्र, या निवडणुकीत भाजप एकटी लढणार की, शिंदे गटाच्या मदतीने महापालिकेचा गड सर करणार याबाबतचा निर्णय नेतृत्व घेईल. त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भात पक्ष नेतृत्वाचा निर्णय आम्हाला शिरसावंद्य असेल,” असे त्यांनी म्हटले आहे. तसेच “ठाणे महापालिकेत भाजपचा महापौर विराजमान करण्यासाठी भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता संपूर्ण ताकदीने काम करेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.