मध्य प्रदेश : राहुल गांधींची 'भारत जोडो' यात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर-माळव्यात असताना, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या आणखी एका विधानाने वाद झाला आहे. आगर येथील सभेला मार्गदर्शन करताना राहुल यांनी 'जय श्रीराम', 'जय सियाराम' व 'हे राम'च्या नाऱ्याची व्याख्या सांगितली. ते म्हणाले, "जय सियारामचा अर्थ काय आहे? जय सीता व जय राम, म्हणजे सीता व राम एकच आहे. त्यामुळे जय सियाराम किंवा जय सीताराम म्हटले जाते. भगवान राम सीतेच्या अब्रुसाठी लढले. त्यामुळे आम्ही जय सियाराम म्हणून समाजातील महिलांचा सीतेसारखा आदर करतो. पण RSS व भाजपचे लोक भगवान रामाची ही जीवनपद्धती स्वीकारत नाहीत. " असे ते म्हणाले होते.
दरम्यान यावर पलटवार करताना भाजप नेते शाहनवाज हुसैन म्हणाले की, "भाजपला राहुल गांधींच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ते निवडणूकवाले हिंदू आहेत." तर ब्रजेश पाठक म्हणाले, "राहुल गांधी नाटक बाजारातील नेते आहे. ते कोटावर जानवे घालतात. त्यांना भारतीय संस्कृतीची कोणतीही माहिती नाही. जनतेने नाकारल्यामुळे सध्या ते गल्लोगल्ली फिरत आहेत." अशी टीका केली.
मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, "राहुल बाबांचे ज्ञान, बाबा-बाबा ब्लॅक शीपसारखे मर्यादित आहे. रामाची सुरुवात श्रीने होते आणि श्रीचा वापर विष्णु पत्नी लक्ष्मी व सीतेसाठी केला जातो. जरा उघडून इतिहास वाचा." असे प्रत्युत्तर त्यांनी केले.