एक अविस्मरणीय अनुभव...

    03-Dec-2022   
Total Views |
sahity sangiti



गिरीश प्रभुणे दोन-चार वर्षे माझ्या मागे लागले होते की, कधीतरी एकदा माझ्या पुस्तकांवर दोन दिवसांची ‘संगिती’ (संगोष्ठी) करूया. त्यांच्या मनात नेमके काय आहे, हे काही मला समजत नव्हते आणि प्रकाशित झालेल्या पुस्तकांवर संगोष्ठी करण्याचे प्रयोजन काय, हेदेखील लक्षात येत नव्हते. कोरोना कालखंडाची दोन वर्षे गेली. पुन्हा एकदा गिरीश प्रभुणे यांनी ‘संगिती’ (संगोष्ठी)चा विषय काढला. तारखांची निश्चिती करता करता 28 आणि 29 नोव्हेंबर हे दोन दिवस ठरले.


नोव्हेंबर महिना माझ्या दृष्टीने खूप धावपळीचा गेला. नाशिकचे संघ कार्यकर्ते मंगेश खाडिलकर यांना संविधान अभ्यास वर्ग घ्यायचा होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी 6 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली. तेव्हा मी त्यांना म्हटले की, पुढील 15 वर्षे ‘संविधान’ या विषयावर कृती करणारे कार्यकर्ते वर्गाला उपस्थित करा. वयस्कर कार्यकर्त्यांना आग्रह करू नका. ते म्हणतील, “पतंगे, तुमची भाषणे फार अप्रतिम झाली आणि स्तुती ऐकण्याची मला अजिबात आवड नाही.” मुलतः मी कार्यकर्ता असल्यामुळे जो विषय मांडला आहे, त्यावर कार्यवाही काय होणार आहे, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे राहते. नाशिकच्या संविधान अभ्यास वर्गात जवळजवळ 180 कार्यकर्ते (स्त्री-पुरूष) होते. सर्वच तरुण होते व बहुजन समाजातील बहुसंख्य होते. मंगेश खाडिलकर यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे. प्रत्येकी 80 मिनिटांचे एक सत्र अशा तीन सत्रात मी ‘संविधान’ विषय सर्वांना समजावून सांगितला.
यानंतर नोव्हेंबरमध्ये होणार्‍या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गासाठी मला नागपूरला जावे लागले.
 
शिक्षार्थी स्वयंसेवकांसमोर 22, 23, 24 नोव्हेंबर असा तीन दिवस ‘संविधान’ हा विषय मी मांडला. त्यानंतर ‘आपले संविधान- तत्त्वविचार, मूल्यसंकल्पना, ध्येयवाद’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचे कार्यक्रम शीतलने ठरविले होते. डोंबिवलीच्या कार्यक्रमाला मी 26 नोव्हेंबरला गेलो होतो. 27 नोव्हेंबर चिंचवडला ‘साहित्य संगिती’ (संगोष्ठी) उपक्रमासाठी गेलो.माझ्या पुस्तकांवर चर्चा होणार होती. उद्घाटनाला डॉ. शरणकुमार लिंबाळे येणार होते आणि नंतरच्या सत्रांत तीन वक्ते तीन पुस्तकांवर बोलणार होते. मला उत्सुकता शरणकुमार काय बोलतात याची जशी होती, तशी पुस्तकांवर वक्ते काय बोलणार आहेत, याबद्दलही होती. दोन दिवसांत सात सत्रे झाली. बोलणार्‍या वक्त्यांमध्ये बहुतेक गुरूकुलातील शिक्षक वर्ग होता. त्यातील पाच-सहाजण तर पहिल्यांदाच व्यासपीठावरून बोलत होत्या.

गिरीश प्रभुणे यांनी पुस्तकांची वर्गवारी केली होती. संविधान, आत्मकथा, लोककथा, चरित्रात्मक इत्यादी. अशी सर्व विषयांची विभागणी करून शिक्षक वक्ते निश्चित केले होते आणि प्रत्येकाकडून खूप तयारी करून घेतली गेली होती.असे करण्याचे कारण काय, पुस्तकावर बोलणारे वक्ते, पुणे आणि पुणे परिसरात भरपूर आहेत, त्यांना का नाही बोलवलं, महाविद्यालयातील समीक्षक-प्राध्यापकांना बोलण्याचा विषय का देण्यात आला नाही, याचे उत्तर गिरीश नावाच्या संघ कार्यकर्त्यात आहे. निवडलेल्या बहुतेक पुस्तकांचा आशय वैचारिक आहे, सामाजिक आहे, समरसतेचा आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आहे. ‘गुरूकुलम’ या आशयासाठीच चालवायचे आहे आणि तो आशय गुरूकुलातील शिक्षक वर्गाने नुसताच समजून घेणे नाही, तर आत्मसात करणेदेखील आवश्यक आहे, ही गिरीश प्रभुणे यांची दृष्टी आहे. अशा कार्यकर्त्याला ‘द्रष्टा कार्यकर्ता’ म्हणतात.

माझी एवढी पुस्तके झाली. परंतु, समीक्षेच्या क्षेत्रात महाराष्ट्रातील स्वनामधन्य समीक्षकांनी त्याची दखल घेतली असे नाही. समीक्षेच्या पुस्तकी सिद्धांतात ही पुस्तके बसणे अवघड आहे. ते सिद्धांत मला माहीत आहेत. माझे त्यांचे बर्‍यापैकी वाचनही आहे. ही पुस्तके विषय समजून घेण्याची जिज्ञासा असणार्‍यांसाठी आहेत आणि जिज्ञासा निर्माण करण्यासाठी आहेत. मी एका विशिष्ट विचारधारेतील कार्यकर्ता आहे. त्यामुळे ही पुस्तके किती हजार कार्यकर्ते वाचत असतील, याचा नक्की आकडा सांगणे अवघड आहे. पण, ती फार बारकाईने वाचली जातात आणि वाचणार्‍या कार्यकर्त्याला त्यातून वैचारिक बळ प्राप्त होते. तो समीक्षेच्या सिद्धांतात अडकत नाही. तो कृतीप्रमाणतेच्या मार्गाला लागतो. त्याची समीक्षा कृतीरूप समीक्षा असते आणि लेखक म्हणून मलाही तेच अभिप्रेत असते.

या दोन दिवसांच्या चर्चा क्षेत्रातील वक्त्यांची नावे अशी होती, ‘संघर्ष महामानवा’चा - राणीताई सोनावणे, ‘सामाजिक न्याय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ - आसाराम कसबे, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्र उभारणीतील योगदान’ - प्रा. धनंजय भिसे, ‘अब्राहम लिंकन ते बराक ओबामा’ - अमोल दामले, ‘बुकर टी वॉशिंग्टन’ - प्रा. पुनम गुजर, ‘मार्टिन ल्यूथर किंग’- रमेश वाकनिस, ‘मी मनू आणि संघ’ - सतीश अवचार, ‘अंगुस्तान ते लेखणी’ - सुनीता सलगर, ‘समरसतेचा वाटसरू’ - मंगला सपकाळे, ‘आम्ही आणि आमचे संविधान’ - सुनंदा भगत, ‘आपले मौलिक संविधान’ - प्रशांत यादव, ‘आपले संविधान - तत्त्वविचार, मूल्यसंकल्पना, ध्येयवाद’ - दिगंबर ढोकले, ‘कथामृत’ - श्रीकांत चौगुले, ‘कथा लोकप्रज्ञेच्या’ - रूपाली कालेकर, ‘सांस्कृतिक भारतातील श्रेष्ठ लोककथा’ - स्मिता जोशी, ‘गांधी समजून घेताना’ - मारूती वाघमारे, ‘तथागतांचे विचार’ - उज्ज्वला हातगळे, ‘तथागत आणि श्रीगुरूजी’ - रूपाली भुसारी, ‘साहित्य संगिती’चा समारोप ज्येष्ठ साहित्यिक’ डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाला. यातील एकही समीक्षक नव्हता. त्यांची विषयमांडणी ऐकून मला हे जाणवले की, पुस्तक त्यांना दोन-तीनदा तरी वाचावे लागले असावे. काय बोलायचे याचे त्यांनी मुद्दे काढलेले होते आणि कुठेही इकडे तिकडे न भरकटता पुस्तकाच्या मध्यवर्ती संकल्पनेला प्रत्येकाने आपल्या शब्दात फारच प्रभावीपणे मांडले.

पुस्तके माझीच असली तरीही ती मला नव्याने परिचित होत गेली. मलाही असे वाटू लागले की, आपणही वेळ काढून ही पुस्तके वाचायला पाहिजेत. इतके मांडणार्‍या वक्त्यांचे सामर्थ्य होते.संविधानावरील पुस्तके मी कायदा जाणणार्‍यांसाठी लिहिलेली नाहीत. स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ठरावीत म्हणूनही लिहिली नाहीत. सर्वसामान्य माणसाला संविधान समजावे यासाठी लिहिली. पुस्तके लिहिण्यापूर्वी सर्वसामान्य माणसाला जेवढे संविधान समजते, तेवढेच मलाही समजले होते. पण नंतर मी त्याचे अध्ययन केले, प्रदीर्घकाळ चिंतन-मनन केले आणि मला जे समजले ते लिहून काढले.

आपल्याला जे समजले ते इतरांनाही समजले पाहिजे, या भावनेने पुस्तके तयार झाली आणि सामान्य वाचकांनी त्याचे अभूतपूर्व स्वागत केले. खपांचे विक्रम निर्माण केले. संविधान साक्षरता अभियानात आपलादेखील खारीचा वाटा आहे, याचे समाधान मला लाभले.या ‘संगोष्ठी’मध्ये उच्च न्यायालयात वकिली करणारे आणि अन्य न्यायालयात वकिली करणारे वकीलदेखील वक्ते म्हणून सहभागी झाले होत. त्यांनी संविधानावरील पुस्तकांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. आम्हालाही यातून खूप शिकायला मिळाले, असे प्राजंलपणे त्यांनी नमूद केले. जो कायद्याचा पदवीधर नाही, तो संविधानावर लिहिणारा कोण, असा प्रश्न कुणी उपस्थित केला नाही. याउलट मला न पेलविणारी मोठमोठी विशेषणे त्यांनी लावली. असं काही ऐकायची सवय नसल्यामुळे मी निर्विकार चेहरा करून बसलो होतो.

ही ‘संगिती’ अशा काळात झालेली आहे, जो काळ महाराष्ट्राच्या दृष्टीने फारसा सुखाचा नाही. रोज नवनवीन विषय शोधून काढून त्यावर वादंग करणे, ढोल बडविणे, तुतार्‍या फुंकणे चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजदेखील यातून सुटलेले नाहीत. आपण महाराष्ट्राचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक वातावरण भयंकर खराब करीत आहोत, असे बोलणार्‍याला वाटत नाही, छापणार्‍या वृत्तपत्रांना वाटत नाही आणि वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांनाही वाटत नाही. अशा भयानक वातावरणात ‘पुनरूत्थान समरसता गुरूकुलम’च्या छोट्या सभागृहात शे-सव्वाशे जण सामाजिक समरसतेचे चिंतन करीत होते. मार्टिन ल्यथूर किंग, बुकर टी वॉशिंग्टन, अब्रहम लिंकन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, क्रांतिगुरू लहुजी साळवे इत्यादी थोर पुरूषांच्या जीवनातून कोणता बोध घ्यावा, याचे श्रवण, मनन, चिंतन करीत होते. संख्या 70 ते 90च्याआसपास असावी, अशा प्रकारच्या चिंतनात संख्येला तसे महत्त्व नसते. महत्त्व ग्रहणशक्तीला असते.

समाजासाठी काही ना काही करण्याची तयारी उर्मी असणारी ही सर्व मंडळी होती. वेळ घालविण्यासाठी भाषणे ऐकायला आलेली नव्हती. ती ग्रहण करण्यासाठी बसलेली होती आणि गिरीश प्रभुणे यांना सर्वांसाठी एक संदेश द्यायचा होता की, क्रियाशील व्हा, चालत राहा, सामजिक दायित्वाचे सतत स्मरण ठेेवा. एकात्म, एकरस, निर्दोष आणि सशक्त समाजनिर्मितीच्या कामात अग्रेसर व्हा. घर-व्यवसाय-प्रपंच प्रत्येकाला असतो, पण तेवढेच करणे म्हणजे जीवन नव्हे, त्याच्याही बाहेर पडून समाजऋण फेडण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. असे कोणतेही भाषण न करता दोन दिवसांच्या चर्चासत्रांतून वेगवेगळ्या वक्त्यांनीच हाच संदेश सर्वांसाठी दिला. यासाठी ही संगिती व्यक्तिगत दृष्टीने आनंददायी आणि थोड्या व्यापक अर्थाने ऐतिहासिक आणि अद्वितीय झाली, असे म्हणावे लागेल.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.