नवी दिल्ली : “भारतातील लोकशाहीचा वारसा सुमारे 2500 वर्षांचा आहे. त्यामुळे लोकशाही म्हणजे काय आणि लोकशाहीमध्ये काय करावे, याविषयी भारताला कोणीही शिकवू नये,” असे प्रतिपादन संयुक्त राष्ट्रसंघातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी केले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद महिनाभरासाठी भारताकडे आले आहे. त्याचा पदभार स्वीकारल्यानंतर भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पत्रकार परिषदेस संबोधित केले. यावेळी त्यांना भारतातील लोकशाही आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याविषयी प्रश्न विचारण्यात आला असता त्या म्हणाल्या की, “भारत ही जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. भारतातील लोकशाहीची मुळे 2500 वर्षांपूर्वीपासून आहेत. सध्याच्या युगाविषयी बोलायचे झाले तर लोकशाहीचे सर्व स्तंभ खंबीरपणे उभे आहेत. ज्यामध्ये विधिमंडळ, कार्यपालिका, न्यायपालिका आणि चौथा स्तंभ म्हणजे माध्यम. याशिवाय समाजमाध्यमांचेही स्वातंत्र्य भारतात आहे. म्हणूनच भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे.” त्यामुळे लोकशाही काय असते, लोकशाहीमध्ये काय करावे आणि लोकशाही कशी चालवावी; याविषयी भारतास कोणीही शिकवण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कंबोज यांनी यावेळी भारताचा अजेंडा हा शांततेचा असल्याचे सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की, “जग एका साथीच्या आजाराशी झुंजत असताना बहुपक्षीय व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, अशा वातावरणात भारत आशेचा किरण म्हणून उदयास आला आहे. कोरोना संकटामध्ये भारताने जगातील अनेक देशांना मदत केली आहे. सुरक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या काळात दहशतवादाचा सामना आणि बहुध्रुवीय व्यवस्थेस बळकटी प्रदान करणे, यास भारताचे प्राधान्य असेल,” असेही त्यांनी नमूद केले आहे.