नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे शनिवारी दिल्लीत आगमन झाले. नाताळच्या कालावधीत यात्रा स्थगित असून त्यानंतर पुढील प्रवास सुरू होणार आहे.
सुमारे तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या यात्रेचे शनिवारी देशाची राजधानी दिल्ली येथे आगमन झाले. यावेळी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी - वाड्रा यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते सहभागी झाले. दिल्लीत प्रवेश केल्यानंतर हजरत निझामुद्दीन दर्ग्यावर राहुल गांधी यांनी चादर चढवली. त्यानंतर राजघाटमार्गे यात्रेचा लाल किल्ला परिसरात समारोप झाला.
यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, देशात सर्वत्र भयाचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. आपण गीता आणि उपनिषद वाचले असून त्यामध्ये कोठेही कमकुवत लोकांना मारा, असे म्हटलेले नाही. मात्र, भाजप सरकार २४ तास शेतकरी, तरुण वर्ग यांना घाबरवण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला.
भारताची 2 हजार चौरस जमीन चीनने ताब्यात घेतल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. भारताची चीनसोबत स्पर्धा असून मला शर्ट, सेलफोन, पादत्राणे यावर 'मेड इन इंडिया' असे लिहिलेले हवे आहे. मात्र, देशात जाणीवपूर्वक द्वेष निर्माण केला जात आहे. आज देशातील तरुणास भजी तळण्यास भाग पाडले जात आहे. देशातील लाखो छोटे व्यापारी त्रस्त असून त्यांच्यासाठी बँकांचे दरवाजे बंद आहेत. त्यांना बँकांतून हाकलून दिले जाते. त्याचवेळी देशातील दोन ते तीन बड्या उद्योजकांना मोठमोठी कर्जे दिली जात असल्याचाही आरोप त्यांनी केला.