दि. १८ डिसेंबरच्या रविवारी फुटबॉलचा विश्वचषक संपन्न झाला. आपल्या सगळ्याचा स्वदेशी नसला, तरी लोकमान्य खेळ ‘पाद आहत कन्दुक क्रीडा’ अर्थात फुटबॉल याबद्दलच्या लेखाचा हा पूर्वार्ध...
कतार येथे २२वी फिफा फुटबॉल (पाद आहत कन्दुक क्रीडा) विश्वचषक स्पर्धा १८ डिसेंबरला रविवारच्या रात्री संपन्न झाली. वरील नावामध्ये पाद = पाय (पायाने) आहत = आघात केलेला (मारलेला) कन्दुक = चेंडू (चा) क्रीडा = खेळ असा अर्थ होतो.'(F)edertion (I)nternationalede (F)ootball (A)ssociation'अशा फ्रेंच भाषेतील नावाने १९०४ साली स्थापन झालेली ही क्रीडा संघटना इंग्रजीत 'International Association Football Federaton' नावाने ओळखली जात असली, तरी (FIFA) ‘फिफा’ अशा लघुरुपाने सगळ्यांच्या तोंडी झाली आहे. या क्रीडासंघटनेत तीन प्रकारचे फुटबॉलचे खेळ आढळतात. ‘बीच फुटबॉल’ म्हणजे समुद्र किनार्यावरील वाळूत खेळले जाणारे फुटबॉल, ‘फूटसाल’ आणि तिसरा सगळ्यांच्या परिचयातील ’फुटबॉल.’ अमेरिकेत ‘सॉकर’ असेही त्याचे नाव आहे.
या ‘फिफा’अंतर्गत खंडीय स्तरावरील प्रादेशिक विभागात सहा विभाग असून आशियाई व ऑस्ट्रेलियन या 'Asian Football Association' (AFC) उपखंडीय विभागात भारताचा समावेश आढळतो. नुकतेच ‘फिफा’ने आधुनिक फुटबॉलचे सामने सगळ्या आधुनिक जगाला अनुभवायला दिले. फिफा’ने आजपावेतो २१वेळा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा खेळवल्या असून ही कतारमधील २२वी स्पर्धा होती. 'FFF' म्हणजेच 'French Football Federation.' ‘फ्रेंच फुटबॉल महासंघ’ म्हणजेच फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात झालेल्या रोमहर्षक सामन्यात पेनल्टी शूट आऊटवर अर्जेंटिना’च्या संघाने सुवर्णपदक मिळवले. त्या आधी दि. १७ डिसेंबरच्या शनिवारी तिसर्या स्थानासाठीच्या सामन्यात क्रोएशियाच्या संघाने मोरोक्कोच्या संघास ‘२-१’नेपराभूत करत कांस्यपदक पटकावले.
असे म्हणतात की, ’ज्यांच्याकडून काही आशा नाही, बहुतेकदा तेच लोक चमत्कार करतात.’ ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेतील काही देशांच्या संघाच्या कामगिरीसाठी आपण असेच म्हणू शकतो.कतार येथील ’फिफा’च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात सुरुवातीपासूनच प्रत्येक सामन्यात धक्कादायक निकाल ज्या प्रमाणात दिसून आले, तसे निकाल आजतागायत लागले नसतील. घरीदारी ज्यांनी कोणी ’आजचा हा सामना अमुकच जिंकेल’ अशा पैजा लावल्या असतील, ते सगळे यापुढे अशा पैजा लावाव्यात की नाही, या संभ्रमात नक्कीच पडले असतील. जेव्हा एखाद्या देशाचा संघ विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याची पात्रता फेरी जिंकतो आणि त्यात उतरतो, खरे धक्के तेथपासूनच लागायला सुरुवात झालेली असते.
’कोणालाही कमी लेखू नये’ ही शिकवण आपल्याला लहानपणापासून मिळत असते, तीच शिकवण फुटबॉल संघांच्या बाबतीत ठेवावी. शाळेत वर्गातील बाई हुशार मुलांना पहिल्या बाकावर बसायला सांगतात व क्रमवारीने ’ढ’ मागील बाकावर बसवला जातो. शाळेत हे ठीक वाटत असले तरी शालेय शिक्षणबाह्य जगात ती शेवटच्या बाकावरची मुलंदेखील पहिल्या बाकावरील मुलांसारखीच किंबहुना त्याहूनही सरस कामगिरी करुन दाखवतात, क्रीडा क्षेत्रातही तसेच आढळते. ‘फिफा’ विश्वचषकाने ते अधोरेखित केले आहे.अनेक देशांनी आपला जागतिक क्रमवारीतला क्रमांक वाढवलेला असतो, तर काहींची घसरण झालेली दिसत असते. या व अशा स्पर्धा पार पडल्या की आपला क्रमांक कितव्या स्थानी आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना लागते.
‘फिफा’ विश्वचषक कतारला होणार आहे, हे समजले तेेव्हापासून तापमापक न लावताच कळून येणारा ’ताप’ सगळ्यांना येत फुटबॉल ज्वर आढळू लागला. घरीदारी आपण फुटबॉल खेळलेच पाहिजे, आता क्रिकेटच्या मागे धावणे बास, आता फुटबॉल. असे म्हणत जोपर्यंत दुसर्या कोणत्या स्पर्धा चालू होत नाहीत तोपर्यंत प्रत्येकाचे ’थर्मामीटर’ धक्कादायक पारा दाखवत फुटबॉलज्वर दाखवू लागतो. ठिकठिकाणांवर असलेले फुटबॉल क्लब आणि अकादमीच्यावतीने, शाळा-महाविद्यालयात सराव व प्रशिक्षण सुरु होतात. ठिकठिकाणांवर ’हाऊसफुल’च्या पाट्या लागताना दिसतात.
जसा मोसम असतो हवामान असते, तसे आजार जागोजागी ज्याप्रमाणे चालू होतात व वैद्यकीय क्षेत्रातील, सरकारी यंत्रणांची व घरोघरची धावपळ सुरु होताना आपल्याला दिसू लागते, तोच प्रकार क्रीडाज्वराचा असतो. काही आजार जसे बारमाही असतातच अन् त्या प्रत्येक आजाराला प्रतिकार करण्याची क्षमता घरोघरी असलेल्या आजीच्या बटव्यांपासून ते अगदी फॅमिली डॉक्टरच्या उपचारांवर भागत असते; तोच प्रकार क्रीडाज्वरातील फुटबॉलच्या बाबतीत आढळतो. समुद्रकिनार्यावरील पटनाईक हे समर्पक वाळूशिल्प सादर करतात, एक छोटी मुलगी त्याला बटर लावीत आपल्या सगळ्यांचे लक्ष वेधत त्या त्या क्रीडाज्वराची आठवण करुन देत असते. विविध मथळ्यांमधे फुटबॉलचा चेंडू आढळू लागतो.
हॉकीपटू मैदानावर उतरले की, अनेकदा हॉकीच्या सरावादरम्यान अथवा सरावपूर्व वा सरावपश्चात फुटबॉल आवर्जून खेळतात. आता ‘अॅस्ट्रो टर्फ’ अर्थात कृत्रिम हिरवळीचा जमाना आहे. फुटबॉल कृत्रिम हिरवळींवरही खेळताना दिसू लागले आहे. यावेळेस तर धनाढ्य कतारवाल्यांनी रणरणत्या उन्हात वातानुकूलित ’इन् डोअर’ मैदानं तयार करुन फुटबॉल खेळण्याची संधी दिली आहे.
सगळे संबोधतात तसे ’आमच्या काळात’ पावसाळा आला की, पावसाच्या पाण्याने आमच्या स्टिका खराब होत असत. मैदानावर पाण्याने हॉकी खेळता येत नसे. सर्वत्र चिखल होत असे. मग आमची संध्याकाळ वाया जाऊ नये, म्हणून आमच्यातले कोणी तरी फुटबॉलचा चेंडू आणलेला असे किंवा जिमखान्यात नोंदणीपुस्तिकेत नोंद करुन फुटबॉलचा चेंडू आणला जाई आणि आम्ही त्यादिवशी स्टिक्सना विश्रांती देत फुटबॉलचा सामना खेळायचो. ‘गोलपोस्ट’ मात्र हॉकीचाच असायचा. एक फुटबॉलचा चेंडू असला की, २२ जणांचा प्रश्न मिटायचा. अजिबात खर्च नाही, फक्त वेळ प्रसंगी चेंडूत हवा भरायचा पंप मिळवला की झाले. तर असे आहे आमचे फुटबॉलप्रेम.
कतारने दारुबरोबर बिअर घेण्यास बंदी घातली होती. त्यामुळे ड्रिंक्स घेणार्यांना ‘किक बसणे’ शक्य झाले नव्हते. या स्पर्धेच्या प्रायोजकत्वांतील एक पुरस्कर्ता जगप्रसिद्ध बिअरचा उत्पादकच होता, त्यांनी अगदी न चढणारी बिअर म्हणजे मद्यार्काचा लवलेश नसलेली ‘शुद्ध बिअर’देखील बनवली होती. त्यामुळे या ’कीक’चा प्रश्नच नव्हता.फुटबॉल आणि हॉकी दोन्ही क्रीडांमध्ये ’गोल’ कडे लक्ष असते, ते प्रेक्षकांचे, तर ’ध्येया’कडे खेळाडूंचे. फरक फक्त एकाग्रतेचा असू शकतो. खेळ बघताना एकाग्रता भंग पावली तरी चालते, गोल होताना आपल्याला बघता नाही आलं, तरी चालते. कारण, आजकाल दूरचित्रवाणीवरून ते पुनः दिसू शकते, पण खेळाडूची एकाग्रता मात्र ढळली, तर त्या खेळाच्या निकालावर काहीपण परिणाम होऊ शकतो. खेळाडूने चेंडूला मारलेल्या ’कीक’ने गोलरक्षकाच्या डोक्यावरून आत पाठवलेला तो चेंडू.
कधीकधी ‘गोलपोस्ट’च्या वरील व दोन्ही दिशांना फटकारलेला चेंडू धडकून परत आलेला असो. हे गोल बघताना त्या वेळी त्या गोलरक्षकाकडे आणि चेंडू फटकावणार्या खेळाडूकडे एवढेच नव्हे, तर ‘पेनल्टी कॉर्नर’ (पेनल्टी कीक) मारणार्या खेळाडूकडे अगदी डोळ्यात तेल घालून धावणार्या पंचांसकट सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या असतात. हॉकी आणि फुटबॉलमध्ये हॉकी स्टिकची जादू जितकी प्रेक्षकांच्या नजरेत भरते तितकीच फुटबॉलची ’कीक’ही नजरेत भरते. हॉकीच्या गोलमधली एकच गोष्ट फक्त फुटबॉलमध्ये आपण अनुभवू शकत नाही आणि ती म्हणजे हॉकी स्टिकने चेंडू गोलजाळीत जमिनीसपाट पाठवत मागची लाकडी फळी तसेच डाव्या व उजव्या बाजूने लावलेल्या फळ्यांचा येणारा वैशिष्ट्यपूर्ण आवाज. या फळ्या वाजवत केलेला गोल. अशा हॉकी व फुटबॉल यात समान एक गोष्ट असते की, जी दोन्ही लत्ताप्रहार व काठीप्रहार या क्रीडा प्रकारात येणारी ती ’किक’ अनेकांना ’झिंग’ प्रेक्षक व खेळाडू अशा दोघांनाही आणत असते.
’उंटज्वर’ नको, पण ’फुटबॉल ज्वर’ चालेल. कतारने फुटबॉल विश्वचषक स्पर्धांचा आनंद घेणार्यांना सावध केले होते की, वाळवंटी जहाजाला म्हणजेच तेथील उंटांना फक्त हात लावू नका, अंजारुगोंजारु नका, असे तेथे सांगितले जात होते. कारण, कतारमध्ये ’कॅमल फ्लू’ हा ’मंकीपॉक्स’ सारखा विषाणूजन्य साथीचा रोग पसरण्याची भीती होती. स्वतःची तब्येत सर्वप्रकारे सांभाळली तर तुम्हाला कतारसारखा ज्वर होणार नाही, उलटपक्षी सध्या सर्वत्रच फुटबॉल ज्वराची साथ येऊन गेली, ती परतली नाही तरी चालेल, काही ठिकाणी ती साथ स्थायी असते तशी राहिली तरी चालेल.
एकीकडे जेव्हा ’फिफा’ विश्वचषक चालू होता तेव्हा आपल्याकडे आशियाई फुटबॉल महासंघ मान्यताप्राप्त ’इंडियन सुपर लीग’ अर्थात ‘हिरो इंडियन सुपर लीग’मध्ये सामने खेळले जात होते. त्यालाही उदंड प्रतिसाद मिळत होता. दूरदर्शनवरील काही क्रीडा वाहिन्यांवर क्रिकेट, कबड्डी समवेत भारतीय व्यावसायिक फुटबॉलचे धावते प्रक्षेपणही चालू होते. अशी क्रीडाप्रेमींना ती जणू परवणीच होती. फक्त हॉकी चालू होती ती दाखवली जात नव्हती. देशपरदेशात कुठे ना कुठे फुटबॉलचे सामने चालूच असतात, तेव्हा या फुटबॉल ज्वरावर औषध नाही हे पक्के..
ऋषी सुनक, ब्रिटनचे पंतप्रधान. त्यांनी कधीही आपले जसे भारतीयत्व आणि आपले हिंदुत्व नाकारलेले नाही तसे फुटबॉलप्रेमदेखील. ते त्यांची एक ’फुटबॉल’ संबंधीची आठवण सांगतात. शाळेत असल्यापासून त्यांना फुटबॉल आवडे. ’युरो ९६’च्या फुटबॉलचे सामने पाहण्यासाठी त्यांनी शाळेत चोरुन एक सहज हातातून नेता येण्याजोगा लहानसा दूरचित्रवाणी संच आणला होता.. त्याबद्दल त्यांना शिक्षाही झाली होती.
सगळे गुंतलेत चेंडू बनवण्यात..
उत्तर प्रदेशातील मेरठच्या जवळचे सीसौला नावाचे एक गाव आहे. जवळपास चार हजार, लोकसंख्येच्या त्या गावात फुटबॉलमुळे तेथील एकही युवक बेरोजगार नाही. फुटबॉलचे चेंडू बनवण्यासाठीच्या कच्च्यामालाची कापणी तेथे केली जाते, तर काही ठिकाणी शिवणकाम केले जाते. महिलादेखील त्या कामात गुंतलेल्या आहेत.
‘फिफा’चे आधुनिक तंत्रज्ञान..
मैदानात आढळणारे आधुनिकीकरण, खेळाडूंना उपलब्ध अत्याधुनिक व्यायामशाळा, निष्णात व दीर्घ अनुभवी देशी व विदेशी प्रशिक्षक, हवे तेवढे, हवे तिथे उपलब्ध होणारे प्रशिक्षण, सढळ हाताने खेळाडूंना मिळणारे आर्थिक पाठबळ, मानसिक बौद्धिक उन्नतीसाठीचे प्रयत्न आज उपलब्ध होताना दिसत आहे. क्रीडा क्षेत्राची ही तयारी आणि क्रीडा साहित्यांचे आधुनिकीकरण हे फुटबॉलमधील पंच, आणि अन्य महत्त्वाचा अधिकारीवर्ग यांच्याकडून होणार्या चुका अन् त्यायोगे उद्भवणारे वादविवाद आता दिसेनासे होतील. यासाठी तंत्रज्ञान मोलाची कामगिरी करत असते. याचे उदाहरण ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दिसले. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात वापरले जाणारे चेंडू ’चार्ज’ करुन मग खेळायला घेतले गेले. या चेंडूत उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करुन घेण्यात आलेले ’सेंसर’ लावून ते विद्युतचुंबकांनी प्रभारी केले जातात.
विजेरी, छोटे छोटे सेल त्यात घालून ते वापरले आहेत. तो विद्युत प्रभार सहा तास अखंड वापरात राहू शकतो, अन्यथा तो १८ दिवस टिकतो. या सेंसर्सचे वजन फक्त १४ ग्रॅम आहे. चेंडूचा वेध घेत चेंडू समवेतच त्याचे त्यात चित्रीकरण करण्याची व्यवस्था त्यात आहे. समस्त पंच मंडळींना ‘ऑफसाईड’ व तत्सम निर्णय घेण्यात मदतीस पूर्ण मैदानभर कुठेही प्रत्यक्ष ठिकाणाहून ते तंत्रज्ञान मदत करत असते. अनेक वादग्रस्त निर्णयात ते कामी येते. कोणत्याही खेळाडूने चेंडूला पायाने मारले अथवा डोक्याने चेंडू मारला, फेकला, टोलवला की तत्काळ स्थानिक ठिकाणावरील सत्य स्थिती दर्शवणार्या प्रणालीत ते पाठवून त्या संदेशांची देवाणघेवाण केली जाते आणि लगेच संग्रहितदेखील केली जाते. जेव्हा चेंडू फुटबॉल मैदानाच्या सीमारेषा ओलांडून जातो तेव्हा दुसरा चेंडू त्याबदल्यात खेळण्यात येतो आणि लगेच ती प्रणाली त्या नवीन चेंडूशी बोलायला सुरुवात करते. हे तंत्रज्ञान इतके स्वयंचलित आहे की, त्यात मानवी हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही.
क्रीडाविज्ञानातील नावाजलेली ‘कायनेक्सॉन’ ही म्युनीच जर्मन स्थित संस्था कार्यरत असून त्यांनी आणि ‘आदिदास’ या क्रीडासाहित्यात अग्रगण्य समूहाच्या जोडीने ‘फिफा’ने हे अत्याधुनिक तंत्रज्ञान या स्पर्धेत वापरत यशस्वी केले आहे. हॉकी, क्रिकेटमध्ये आपण जे तंत्रज्ञान बघतो तसेच किंवा त्याहूनही वेगळे असे तंत्रज्ञान फुटबॉलला मिळून गेले आहे. पेलेच्या काळातला फुटबॉल आणि रोनाल्डो, मेस्सीच्या काळातील फुटबॉल यात खेळाडूंच्या फुटबॉल नैपुण्य व क्षमतेतला दर्जा कमी जास्त झालेला दिसत असला अथवा नसला तरी आधुनिक तंत्रज्ञान मात्र सगळ्यांना अचंबित करताना दिसत आहे.
हे ’बॅटमॅन’ तर नव्हेत!
‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतील खेळाडूंच्या चेहर्याकडे बघितले तर आपल्याला ऋतिक रोशनच्या ’क्रिश’ या चित्रपटातील पात्राचा चेहरा डोळ्यासमोर येतो किंवा ’बॅटमॅन’सारखे एखादं व्यक्तिमत्त्वच फुटबॉलच्या मैदानात उतरले आहे, असे भासते. नाही पण हा ‘क्रिश’ किंवा ‘बॅटमॅन’सदृश कोणी खेळाडू नसून तो बहुरूपी किंवा होळीच्या सोंगालाही कोणी नाही. आज ही ’फॅशन’ नसून ती गरज ठरू लागत आहे. डोक्यासकट चेहर्यावर घातलेले हे मुखवटे त्या खेळाडूंना होणार्या दुखापतींपासून वाचवतात. हे संरक्षककवच, ही आवरणे आपण हॉकीपटू, क्रिकेटपटू यांच्या उपयोगात आलेली समजू शकतो, पण जेव्हा एखादा फुटबॉलपटू याचा वापर करतो तेव्हा प्रश्न वेगळा येतो.
फुटबॉलच्या खेळातील गोलरक्षकाचे एकवेळ ठीक आहे, असे आपण आत्तापर्यंत समजत होतो. ’पॉलिकार्बोनेट’ व तत्सम तंत्रज्ञानाच्या वापराने घडवलेल्या साहित्यांपासून हे बनवले जाणारे मुखवटे. मानेपासून वरच्या शरीरातील भागांना काही दुखापत होऊ नये आणि अन्य त्रास होऊ नयेत म्हणून ते आता वापरात आणू लागले आहेत. वजनाने ते अत्यंत हलके असले, तरी मजबूत असतात. यातील काही त्रिमितीय पद्धतीने (३D) तयार केलेले आढळतात. प्रत्येक खेळाडूला चपखल बसतील, अशा आकृतिबंधाने ते घडवले जात असतात. एखादा फुटबॉलपटू प्रतिस्पर्ध्यावर धडकला किंवा पडला, तर त्यांचे नाक मुख्यत्वे रक्तबंबाळ होते. अशा वेळच्या सामन्यांमध्ये अनेक देशांच्या खेळाडूंनी असे मुखवटे वापरुन आपल्याला दुखापतींपासून दूर ठेवलेले आपण बघितले.
सगळेच श्यामच्या आईतले श्याम..
साखळी फेरीतील स्पर्धा जिंकलेली असो अथवा उपांत्यफेर्यांच्या आधीचा सामना हरल्याने जपानचे खेळाडू आणि जपानचे तेथे जमलेले प्रेक्षक यांची अत्यंत करुणाजनक परिस्थिती असतानादेखील जपानच्या लोकांनी क्रीडा रसिकांची मते जिंकली होती. कारण, बालपणापासून मनावर बिंबलेले चांगले संस्कार, सत्कर्म त्यांना रोखता आली नाहीत आणि आपला संघ पराभूत झालेला असूनही तेथून निघून न जाता तेथील अन्य प्रेक्षकांनी तेथेच टाकलेल्या पाणाच्या बाटल्या, टाकलेले खरकटे, प्लास्टिक पिशव्या असे सगळे पोत्यात भरुन ते ठिकाण साफ करुन दिले. सगळ्या खेळाडूंच्या कपडे बदलण्याच्या खोल्या वगैरेंत जाऊन त्यांच्या खोल्या आवरल्यावर, तेथे त्यांना भेटवस्तू ठेवून त्या खोल्यांत वाचल्यावर खेळाडूंना चांगले वाटेल असे तेथे सुविचारही लिहून ठेवले होते.
हे कृत्य सगळ्याच जगाने बघितले होते. तसे म्हटले तर हे त्यांनी केले नसते, तरी चालले असते. पण आपली शिकवण दाखवत सगळ्या जगापुढे त्यांनी तो एक आदर्श दाखवून दिला. तेव्हापासून लगेचच त्यांचे आचरण करत जपान पाठोपाठ मोरोक्को, इक्वाडोर यांनी विविध क्रीडाप्रेक्षागारातील कचरा साफ करायला प्रारंभ करताच अन्य देशांहून आलेल्या काही प्रेक्षकांनी त्याचे अनुकरण करत सत्कार्य चालू केले, ही स्पृहणीय गोष्ट आहे. हे असे असले तरी हे तथाकथित क्रीडाप्रेमी बसल्याजागीच कचरा करायची जन्मजात सवय काही सोडताना आढळले नाही. यानंतरच्या विश्वचषकात भारतीय खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी गेलेला भारतीय तेथे आपण बघू. तेथे भारताचा संघ आणि भारतीय प्रेक्षक हे दिसतील. कारण, आपल्याला जगाला दाखवून देण्याची ती एक संधी असेल की, ज्याद्वारे भारतीय संस्कृतीचे दर्शन देणारे अनेक श्यामच्या आईतल्यासारखे श्याम असतील.(क्रमश:)
श्रीपाद पेंडसे
(लेखक जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र प्रांत खेलकूद आयाम प्रमुख आहेत.)