मुंबईत थंडीला सुरुवात झाल्यावर हवेतील प्रदूषण वाढायला लागले आहे व हवेत जाड धुक्याचे (स्मॉग) थर दिसायला लागले आहेत. सतत दोन-तीन दिवस प्रदूषणाचा सरासरी निर्देशांक ३०० च्यावर पोहोचला आहे. डिसेंबर महिन्यात प्रदूषणात वाढच राहाणार आहे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
निर्देशांकावरून हवेची स्थितीचा अंदाज करतात. ० ते ५० (हवा चांगली), ५१ ते १०० (हवा समाधानकारक), १०१ ते २०० (बरी हवा), २०१ ते ३०० (खराब हवा), ३०१ ते ४०० (अती खराब हवा), ४०१ ते ५०० (संकटकालीन हवा), ५०१ हून अधिक (अतिसंकटकालीन). डिसेंबरातील हवेचा दर्जा खालीलप्रमाणे आढळला - माजगाव (३४२), कुलाबा (३३६), मालाड (३२१), चेंबूर (३१९), वांद्रे-कुर्ला संकुल (३१३), भांडूप (२७८), अंधेरी (२१५), बोरिवली (१८३), वरळी (१६९). (सरासरी ३००) २४ प्रभागांतील प्रदूषण कमी करण्यासाठी जे सल्लागार नेमले आहेत, त्यांनी धुळीचा त्रास कमी करण्यासाठी रस्त्यावर पाणी शिंपडायचे, घनकचरा जाळण्याचे बंद करण्याचा सल्ला दिला आहे.
सध्याच्या मुंबईच्या हवेतील प्रदूषणवाढीची कारणे -
‘निरी’चे पूर्वीचे डायरेक्टर राकेश कुमार म्हणतात, थंडीमध्ये पश्चिम व नैऋत्येकडील वारे अनुक्रमे उत्तरेकडे व ईशान्येकडे बदलायला लागतात. वार्याचा वेग ताशी पाच ते दहा किमी म्हणजे खूप कमी होतो, तसेच उन्हाची तीव्रता जास्त होते. यामुळे तरंगणार्या पदार्थांची (पार्टिक्युलेट मॅटर्स) दाटीने साठून राहणे स्वाभविकपणे बनून राहते. प्रदूषण वाढते व हवेतील दृश्यमानता कमी होते. मुंबईतील उंच इमारती वार्याकरिता अडचण ठरून त्या वार्याचा वेग कमी करतात.
प्रदूषणामुळे होणारा ‘सीओपीडी’ आजार ’कोविड’पेक्षाही भयावह ठरत आहे
‘नानौटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’चे डॉ. सलिल बेंद्रे म्हणतात, “औद्योगिक कारखान्यामुळे व वाहनांच्या उत्सर्जनामुळे वाढलेले प्रदूषण वर्षभरात साठलेले राहते व प्रदूषणाच्या निर्देशांकाच्या कमी-जास्त होण्यामुळे अस्थमा, ‘ब्राँकायटिक्स’ व ‘क्रॉनिक ऑबस्ट्रकटिव्ह पल्मोनरी डीसॉर्डर’ असे आजार फैलावतात. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, या मोसमातील ‘सीओपीडी’चा आजार ‘कोविड’च्या आजारापेक्षाही जास्त धोका निर्माण करतो. हल्लीच्या स्थितीतील अशुद्ध व प्रदूषित हवेमुळे श्वसनविषयक रोगांचा तिप्पट वेगाने फैलाव होत आहे. पालिकेच्या व खासगी रुग्णालयात अशा रोगाने ग्रासलेल्या लोकांची गर्दी झालेली दिसते.
‘रिफायनरीज्’च्या धुरामुळे हवा बिघडत आहे
मुंबई महापालिकेचे आयुक्त व प्रशासक इकबाल सिंह चहल म्हणतात, “त्यांच्या कार्यालयीन केंद्रीय पेट्रोलियम व नॅचरल गॅस खात्याकडे मुंबईच्या परिसरातील ‘रिफायनरीज्’ (भारत पेट्रोलियम, राष्ट्रीय केमिकल्स आणि इंडियन ऑईल) यांच्या रोजच्या निर्मिलेल्या धुरामुळे मुंबईच्या वातावरणाची हवा अशुद्ध व प्रदूषित होत आहे व त्यावर काही नियंत्रण ठेवता येईल का, अशी विचारणा केली आहे. ‘जी २०’चे शेरपा अमिताभ कांट यांनी त्यावर उत्तर दिले. ते म्हणतात, “माहुलच्या दोन ‘रिफायनरीज्’मधील ‘सल्फर डायॉक्साईड’चे उत्सर्जन शास्त्रज्ञांनी ठरविलेल्या मानकांच्या पातळीखाली ठेवायला पाहिजे. शिवाय देवनारच्या घनकचर्याचे ज्वलन थांबविले पाहिजे आणि ’टाटा पॉवर’ने वीजनिर्मिती करण्यासाठी जास्तीत जास्त स्वच्छ पद्धतींचा वापर करून प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे.
ठाणे जिल्ह्यातील कारखाने प्रदूषण वाढवित आहेत
प्रदूषण वाढविणारे कारखाने (ठाणे, भिवंडी, कल्याण, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, मुरबाड) ३ हजार, ०१६ आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना प्रदूषणाच्या त्रासाला तोंड द्यावे लागत आहे. यात रासायनिक व औषधनिर्मिती करणारे कारखाने अधिक वायुप्रदूषण करणारे आहेत. ठाणे येथील वागळे इस्टेट व नवी मुंबईतील बेलापूरला ६ हजार, ४९० कारखाने आहेत. त्यातील १ हजार, ८३६ कारखाने व भिवंडी येथील ४२८ कारखाने अधिक प्रदूषणकारी आहेत.
मुंबईतील वाहने प्रदूषण वाढवित आहेत
गेल्या तीन वर्षांत प्रदूषण करणार्या १५ हजार, ३७८ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. वायूच्या उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने प्रदूषण नियंत्रण चाचणी करणे बंधनकारक केले आहे. ही तपासणी करण्याकडेही काही वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत. अशी वाहने ‘आरटीओ’च्या रेडारवर असल्याचे एका अधिकार्याने सांगितले. २०२१-२२ मध्ये सर्वात जास्त प्रदूषण करणारी वाहने (६१२) ताडदेव ‘आरटीओ’ कार्यालयातील होती. अंधेरी ‘आरटीओ’ (५९४), बोरिवली ‘आरटीओ’ (२१९), वडाळा ‘आरटीओ’ (४६८) वाहनांवर कारवाई करण्यात आली.
चाकांच्या घर्षणामुळे प्रदूषणात भर पडते
इंग्लंडमधील एका ‘फिजिकल लॅब’मध्ये नळकांड्यातून होणारे प्रदूषण व चाक-रस्त्याच्या घर्षणातून होणारे प्रदूषण यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर त्यांना आढळले की, चाकामधून होणारे प्रदूषण अधिक होते. चाकांच्या घर्षणामुळे शेकडो प्रकारचे रासायनिक सूक्ष्मकण हवेत प्रवेश करतात आणि त्यातील कितीतरी कण कर्करोग होण्यास कारणीभूत ठरतात. चाकांच्या एक किमी प्रवासाच्या घर्षणात एक ट्रिलियन (दहा खर्व) अतिसूक्ष्म कण हवेत पसरतात. चाकांचे रस्त्याशी होणारे घर्षण हे विविध गोष्टींवर अवलंबून आहे - वाहनांचे वजन, चाकांची संख्या, आकार, वेग, रस्त्याची गुणवत्ता, नवीन वा जुने टायर अशा अनेक बाबींवर अवलंबून असते. चाके प्रतिकिमी अंतरात ३६ मिलीग्रॅम प्रदूषके हवेत सोडतात. या तुलनेत नळकांडे ०.०२ मिलीग्रॅम प्रदूषके टाकतात. म्हणजे चाकांचे प्रदूषण १ हजार, ८५० पट होते व वेग घेतलेल्या चाकांमुळे ते प्रतिकिमी ५ हजार, ७६० पटीने वाढते.
प्रदूषणामुळे २०२१ मध्ये मुंबईतील ९ हजार, १०० नागरिकांना मृत्यू आला
सर्वेक्षणात जगातील ६ हजार, ४७५ प्रदूषित शहरांमध्ये मुंबई १२४व्या स्थानांवर आहे. नवी मुंबई मुंबईहून अधिक प्रदूषित आहे व तिचे स्थान ७१वे आहे. पुणे १९६, चंद्रपूर ११३, नाशिक २१५ स्थानावर आहे. नवी दिल्लीचे पीएम २.५ चे प्रमाण ८५ मायक्रोग्रॅम घनमीटर आहे. भारत देशात सर्वसाधारण प्रमाण ५८.१ मायक्रोग्रॅम घनमीटर आहे. ही गोष्ट ‘आयक्यूएअर’ या संस्थेने जाहीर केलेल्या २०२१ च्या जागतिक हवा गुणवत्ता अहवालातून समोर आली आहे. मुंबईत २०२० मध्ये हवेत ‘पीएम’ २.५ चे प्रमाण ४१.३ मायक्रोग्रॅम घनमीटर होते, ते २०२१ मध्ये ते ४६.४ मायक्रोग्रॅम घनमीटर झाले. भिवंडी हे शहर सर्वाधिक प्रदूषित आढळले आहे. तेथे ‘पीएम’ २.५ चे प्रमाण १०६.२ मायक्रोग्रॅम घनमीटर आहे. जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या तत्त्वानुसार ‘पीएम’ २.५ चे आदर्श प्रमाण पाच मायक्रोग्रॅम घनमीटर असायला हवे.
हवामान निरीक्षणाकरिता ‘इस्रो’कडून दोन उपग्रहांचे प्रक्षेपण आणि दुसर्या ‘डॉप्लर’चे उभारणे ???
१४ फेब्रुवारीला ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाद्वारे ‘पीएसएलव्हीसी ५२३’, ‘अर्थ ऑब्झर्व्हेशन सॅटेलाईट’ आणि इतर दोन लहान उपग्रहांचे प्रक्षेपण श्रीहरीकोटा येथून यशस्वीरित्या झाले. हा रडारचा समावेश असणारा उपग्रह कोण्त्याही हवामान स्थितीत निरीक्षण करण्याची क्षमता असलेला असा आहे. कृषी, जंगले, मातीतील आर्द्रता, पाणी, तसेच पुराच्या मापनासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. या ‘इओएस-४’ उपग्रहाचा कालावधी दहा वर्षांचा असेल.
मुंबईचा दुसरा डॉप्लर रेडार दि. १४ नोव्हेंबर २०२२ ला उभारला गेला. हा रेडार जास्त अचूक दाखवेल जेव्हा अतिटोकाचे, तीव्र असे हवामान असेल, प्रचंड चक्रीवादळ व विजा असतील, वावटळ वा जोराचा पाऊस असेल, त्यावेळेला हा काम करेल. या दोन रेडारनी हवेतील अनुमान जास्ती अचूक करता येईल. मुंबईतील जुना रेडार हा कुलाब्याला २०१० मध्ये बसविला आहे व तो ‘एस बॅण्ड डॉप्लर रेडार’ आहे. नवीन बसविलेला ‘सी रेडार’ आहे. ‘एस बॅण्ड’ची व ’सी बॅण्ड’ची अनुक्रमे वेव्हलेंथ आठ ते १५ सेंटीमीटर व चार ते आठ सेंटीमीटर आणि फ्रिक्वेन्सी दोन ते चार ‘जीएचझेड’ व चार ते आठ ‘जीएचझेड’ आहे. या दोन रेडारमुळे आसपासच्या परिसरातील हवामानाचे अचूक पूर्वानुमान शक्य होणार आहे.
कुलाब्याच्या रेडारनी ५०० किमी परिघातील हवामानाची अचूकता मिळेल, तर नवीन गोरेगावला बसविलेल्या रेडारनी ४५० किमी क्षेत्रांतील अचूकता राखता येईल. मुंबई महापालिका कार्बनचे उत्सर्जन तपासता येईल व त्यावर नियंत्रण ठेवता येईल, असे ‘एअर प्युरिफायर्स’ रस्त्याच्या सर्व जंक्शनच्या ठिकाणी लावणार आहे. अशा ‘प्युरिफायर’नी केंद्रावर दर्शविलेल्या निर्देशांकाची अचूकता तपासता येईल. या ‘प्युरिफायर’नी २० मीटर परिघातील ‘पीएम’ वा तरंगते पदार्थांवर प्रक्रिया करता येईल. धुळीचे सूक्ष्मकण एकत्र आणले जातील. हे सर्व चिकटलेले तरंगते-कण हवेतून बाहेर पडून वजनांनी जड होऊन जमिनीवर पडतील. मुंबईची हवा बिघडली आहे व तिच्यावर नियंत्रण ठेवणे जरुरी आहे.