नाशिक : "जसं अमिताभ बच्चननं सिनेमात मेरा बाप चोर है, असं गोंदवून घेतलं होतं. तसं आता आमदारांची मुलं गद्दार म्हणून डोक्यावर आणि हातावर गोंदवून घेतील," असं वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं आहे. शुक्रवार, दि. २ नोव्हेंबर रोजी उबाठा गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली. "मी बाळासाहेबांच्या पुण्याईनं तुरुंगातून सुटून आलोयं. बऱ्याच कालावधीनंतर मी नाशिकला आलो आहे. पण जी जूनी शिवसेना आहे तीच शिवसेना आहे.", असंही ते म्हणाले.
"एखाद दुसरा आमदार गेला म्हणून पक्ष संपत नाही. पक्ष कायम राहतो. ४० आमदार गेले आम्हाला फरक पडलेला नाही. महाराष्ट्रातील सत्ताधारी निवडणूका टाळत आहेत. कारण त्यांना भीती वाटतेयं, खरंतर आम्हाला भीती वाटायला हवी होती. मात्र, शिवसेना पक्षाला नवं चिन्ह मिळालं तरीही आमची लढण्याची तयारी आहे. हा आत्मविश्वास कशातून आलायं जेव्हा आम्ही जनतेत मिसळतो तेव्हा सर्व जनता आमच्या पाठीशी उभी राहते. ती पुन्हा ताकदीने उभी राहते. काही पालापाचोळा उडून जातो. गटारात जातो, पण पक्ष तिथेच राहतो. लोकंचं आता खोकेवाल्यांना गद्दार म्हणतात.", अशी विखारी टीका त्यांनी केली.
सुहास कांदेंबद्दल बोलताना ते म्हणाले, "मी पक्का रिपोर्टर आहे. त्यातही क्राईम रिपोर्टर आहेत. त्यामुळे त्यांच्या गटात काय क्राईम चाललं आहे. याबद्दल मला माहिती आहे." शिंदे गटात लवकरच स्फोट होणार आहे, असा दावाही त्यांनी केला. "अमिताभ बच्चन यांच्या हातावर जसं सिनेमात लिहीलं होतं की, 'मेरा बाप चोर है', तसं आता हे ४० आमदारांच्या कुटूंबातले लोकंही मेरा बाप गद्दार है, असं गोंदवून घेतील, असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं. राऊत म्हणाले, "जे आम्हाला सोडून गेलेत त्यांनी त्यांनी स्वतःची कबर खोदली आहे.", असेही ते म्हणाले. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी राऊत म्हणाले की, "बाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री सरळ तुम्हाला डिवचतोयं. हे महाराष्ट्राचं पाणी सोडलंयं त्याच पाण्यात जलसमाधी घ्यायला हवी. कर्नाटकचा मुख्यमंत्री येऊन रोज तुमच्या तोंडावर थुंकतोयं. तुम्ही काय सांगता की क्रांती केली. आता क्रांती करा ना! आता क्रांतीची वांती झाली का?", असंही ते म्हणाले.