उद्योजकतेचा ‘समृद्धी’मार्ग महानगरांकडून शहरांकडे...

    15-Dec-2022
Total Views |
Entrepreneurship


महाराष्ट्राच्या संदर्भातच सांगायचे म्हणजे मुंबई-पुणे सोडून एक हजार कोटींहून अधिक उलाढाल असणारे सर्वाधिक उद्योग नागपूर येथे सहा असून त्यानंतर औरंगाबाद येथे चार व नाशिक आणि संगमनेर येथे प्रत्येकी एक अशी क्रमवारी आहे. उद्योजकतेचा महानगरांकडून शहरांकडील हा समृद्धी मार्ग नक्कीच विचारणीय ठरला आहे.


परंपरागत स्वरूपात उद्योग-व्यापार-व्यवसायाचे केंद्रीकरण हे मुंबई-दिल्ली-कोलकाता-चेन्नई व अहमदाबाद या आणि यासारख्या मेट्रो महानगरांमध्ये झाले होते. विविध कारणांमुळे व राजकीय, आर्थिक धोरणात्मक निर्णयामुळे या महानगरांमधील आर्थिक व्यावसायिक दृढीकरण अधिक सुदृढ होत गेले, हा इतिहास आहे. मात्र, गेल्या दशकामध्ये या सार्‍याच परिस्थितीत बदल झालेला दिसून येतो. आर्थिक औद्योगिक विकासाचा व त्याद्वारे होणार्‍या ‘समृद्धी’चा विकासमार्ग महानगरांकडून मोठ्या शहरांकडे असल्याचे दिसून येत असून त्याचाच हा आढावा-

हुर्न या इंग्लंडमधील आर्थिक औद्योगिक क्षेत्रात संशोधन प्रकाशन करणार्‍या संस्थेतर्फे गेली १० वर्षे वार्षिक स्वरुपात आर्थिक, औद्योगिक क्षेत्रातील उल्लेखनीय व यशस्वी कामगिरी करणार्‍या उद्योग आणि उद्योजकांचा व अभ्यासपूर्ण अभ्यासासह तपशील प्रकाशित करण्याचे महनीय काम केले आहे. हुर्नतर्फे २०१२मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या पहिल्या अहवालात मोठ्या शहरांमध्ये एक हजार कोटी अथवा त्याहून अधिक व्यावसायिक उलाढाल असणार्‍या उद्योजकांची संख्या शंभरीमध्ये होती. तर २०२२च्या नव्याने प्रकाशित अहवालानुसार १०० कोटी अथवा त्याहून अधिक उलाढाल करणार्‍या व मोठ्या शहरांमध्ये कार्यरत असणार्‍या यशस्वी उद्योजकांची संख्यासुद्धा एक हजारांहून अधिक झाली आहे.

शहरांमधील या वाढत्या व यशस्वी उद्योगांमध्ये उत्पादन क्षेत्र, सेवा उद्योग, वित्तीय सेवा, अन्न प्रक्रिया उद्योग व हिरे उत्पादन यासारख्या विविध उद्योगांचा प्रामुख्याने समावेश आहे. आधीची आकडेवारी लक्षात घेता विविध शहरांमध्ये १०० कोटींहून अधिक उलाढाल यशस्वीपणे करणार्‍या या निवडक उद्योग आणि उद्योजकांची संख्या आता तीन हजारांपेक्षा अधिक झाली आहे.भारतातील मेट्रो वा महानगरांशिवाय इतर शहरांमध्ये उद्योग-व्यवसायांची वाढ आणि सद्य:स्थिती याची योग्य आणि पुरेशी नोंद होत नसल्याची बाब या निमित्ताने स्पष्ट झाली आहे. या संदर्भातील प्रमुख उदाहरण म्हणजे ‘इकोनॉमिक इंटेलिजन्स युनिट’च्या २०२० मधील दक्षिण भारतात करण्यात आलेल्या सर्वेक्षणाचे देता येईल. या छोटेखानी सर्वेक्षणातसामील शहरांच्या औद्योगिक विकासाचा मागोवा घेता भारताला जागतिक स्तरावर वेगाने विकसित होणार्‍या देशात अग्रणी स्थान मिळाले.


त्यावेळच्या सर्वेक्षणातील देशातील ज्या सहा औद्योगिक दृश्य विकसित शहरांचा समावेश झाला, त्यामध्ये दक्षिण भारतातील केरळमधील मल्लपुरम, कोझिकोड, कोल्लम व त्रिसूर या चार शहरांचा समावेश केला गेला. अन्य दोन शहरे होती. गुजरातमधील सुरत व तामिळनाडूमधील त्रिपूर. या अहवालावर जाहीरपणे प्रतिक्रिया देताना विख्यात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी मुंबई, दिल्ली, कोलाकाता या प्रस्थापित व चाकोरीबद्ध महानगरांकडून उद्योगजगतेचा प्रवास इतर शहरांकडे सुरू झाला आहे, ही मोठी समाधानाची बाब आहे, असे म्हटले होते.हे बदल आणि बदलाची प्रक्रिया का आणि कशी सुरू झाली, हे पाहणे मोठे महत्त्वाचे ठरते. सकृतदर्शनी असे दिसून आले की, तंत्रज्ञानासह शैक्षणिक विकासाचे यासंदर्भात मोठे योगदान राहिले. विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात, मोठ्या संख्येत सुरू झालेल्या विज्ञान-तंत्रज्ञान व अभियांत्रिकी संस्थांमध्ये शिक्षण घेणर्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित विषयातील पदवीसह उद्योगजगतेकडे जाण्याची इच्छा मोठ्या प्रमाणात होत गेली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे या शहरांमध्ये आपापले उद्योग प्रस्थापित केलेल्या उद्योजकांच्या परिवारातील नवी पिढी अभियांत्रिकी, उद्योग व्यवस्थापन, उद्योजकता विकास यासारख्या क्षेत्रात शिक्षित-प्रशिक्षित झाल्याने त्यांच्या प्रस्थापित उद्योगांना अधिक सक्षम व कार्यक्षम उद्योजक मिळत गेले. या सार्‍यांचा संयुक्त परिणाम लहान शहरांमधील उद्योगांच्या मोठ्या विकासात होत गेला.

आर्थिक व औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ अश्विन पारेख यांच्या मतानुसार, १९९० नंतर देशात २५० विशेष शैक्षणिक विकास केंद्रे स्थापन होऊन कार्यरत झाली आहेत. याशिवाय देशात आज सुमारे तीन हजार उद्योजक विकास केंद्र कार्यरत असून विविध स्तरावर व विविध प्रकारच्या नव्या उद्योगांची स्थापना व प्रचलित व्यवसाय व व्यावसायिकांना मार्गदर्शनाचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. यातील अधिकांश केंद्रे ही प्रामुख्याने महानगरांव्यतिरिक्त औद्योगिक क्षेत्रातील प्रगत अशा शहरांमध्ये प्रामुख्याने होत आहे. यातून या शहरातील उद्योगांना ज्ञान-तंत्रज्ञान उभय क्षेत्रात होत गेले. परिणामी, तेथील उद्योग व उद्योजकांना व्यवसायच नव्हे, तर व्यवस्थापन विकासापर्यंत सर्वच क्षेत्रात त्याचा फायदा झाला व त्यांच्या विकासाला चालना मिळाली.

अश्विन पारेख यांच्या विश्लेषणानुसार, परंपरागतरित्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रात विशेष विकसित नसणार्‍या या शहरांना प्रगत उद्योग आणि उद्योजकतेची झळाळी मिळण्यामागे मुख्यत: दोन कारणे आहेत. एक म्हणजे मूलभूत शिक्षणाच्या जोडीलाच उद्योजकता आणि औद्योगिक विकासाला पूरक असे व्यवस्थापन शिक्षण घेणारे नव-उद्योजक गेल्या दशकात स्वत:चा उद्योग विविध शहरांमध्ये सुरू राहण्यासाठी पुढे येत आहेत.महानगरांशिवाय विविध शहरांमध्ये प्रस्थापित प्रचलित उद्योगांच्या प्रगती-उन्नतीचे चक्र झपाट्याने फिरू लागले आहे. हे पारेख यांच्यानुसार दुसरे महत्त्वाचे कारण. या उद्योजकांना त्यांची प्रस्थापित व्यावसायिक गुणवत्ता, क्षमता, आर्थिक स्थिरतेचा पिढीजात फायदा तर मिळतोच, त्याशिवाय महानगरांच्या तुलनेत इतर शहरांमध्ये उद्योग-व्यवसायासाठी आवश्यक खर्च कमी येत असल्याने अशा उद्योगांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्याचा मोठा फायदा होतो. विभिन्न शहरांमधील प्रगतिशील व फायदेशीर उद्योगांच्या व्यवसाय-विकास व अर्थिक प्रगतीमागची वरील मुख्य दोन कारणे सर्वदूर अनुभवास येत आहेत.

याशिवाय आज सर्वदूर उपलब्ध असलेली प्रगत व विकसित संचार व्यवस्था शहरी उद्योजकतेला व त्याच्या विकासाला पूरक ठरली आहे. विकसित दूरसंचार व इंटरनेटसारख्या व्यवस्थेमुळे केवळ महागनगरेच नव्हे, तर इतर शहरांमध्ये व्यवसाय करणे अधिक सुलभ व आर्थिकदृष्ट्या फायद्याचे सिद्ध झाले आहे. ‘बँक ऑफ बडोदा’चे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन हसबनीस यांच्यानुसार एखादा उद्योग ‘मेट्रो’ वा महानगरामध्ये चालविण्यासाठी जमिनीची किंमत, कार्यालयीन भाडे, विविध व्यावसायिक खर्च, कर्मचार्‍यांचे तुलनेने अधिक पगारमान इ. स्वरुपातील खर्च अधिक असतो. परिणामी, वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर व्यवसायाची फायदेशीरता कमी होत जाते. यापैकी बरेचसे खर्च हे शहरामध्ये उद्योग सुरु केल्यास सहजपणे व कायमस्वरुपी कमी होऊ शकतात. ही बाब विविध उद्योगांना शहरांमध्ये येण्यासाठी चालना देत आहे.

कोरोनादरम्यान व त्यानंतरचा कालखंड उद्योग व्यवसायाच्या मेट्रो महानगरांमधून शहरी उद्योगांकडे प्राधान्याचा ठरला आहे. त्यादरम्यानची रोजगारापासून उपचारापर्यंत व वातावरणातील विभिन्न तणाव, बदलती अस्थिर मानसिकता व आर्थिक ओढाताण आणि तशातच कोरोनादरम्यान आंतरराज्य कामगारांचे झालेले महास्थलांतर या बाबीसुद्धा उद्योग आणि उद्योजकांना महानगरांकडून शहरी उद्योग व्यवस्थेकडे स्थलांतरित व प्रोत्साहित करणार्‍या ठरल्या आहेत. त्याचे अपेक्षेनुरुप व फायदेशीर परिणाम आता देशपातळीवर व्यापक व प्रस्थापित स्वरुपात दिसू लागले आहेत.प्रचलित आकडेवाडीनुसार आज देश पातळीवर जिल्हा केंद्र अथवा तत्सम शहरांमध्ये एक हजार कोटींहून अधिक उलढाल असणार्‍या प्रगत उद्योगांची संख्या १६८ आहे. यामध्ये असे सर्वाधिक उद्योग असणार्‍या शहरांमध्ये सुरत-१९ उद्योग व त्यानंतर कोइम्बतूर-१४ उद्योग अशी क्रमवारी राष्ट्रीय स्तरावर आहे.महाराष्ट्राच्या संदर्भातच सांगायचे म्हणजे मुंबई-पुणे सोडून एक हजार कोटींहून अधिक उलाढाल असणारे सर्वाधिक उद्योग नागपूर येथे सहा असून त्यानंतर औरंगाबाद येथे चार व नाशिक आणि संगमनेर येथे प्रत्येकी एक अशी क्रमवारी आहे. उद्योजकतेचा महानगरांकडून शहरांकडील हा समृद्धी मार्ग नक्कीच विचारणीय ठरला आहे.



-दत्तात्रय आंबुलकर