उतारवयातही स्वतःबरोबरच इतरांमध्ये ऊर्जा निर्माण करणार्या हरहुन्नरी शरद पुस्तके या ऊर्जस्वी व्यक्तिमत्वाविषयी...
दि. ७ नोव्हेंबर, १९५३ रोजी इंदौरला जन्मलेले शरद पुस्तके यांचे वडील दंत शल्यचिकित्सक, तर आजोबा डॉ. मार्तंड पुस्तके हेही श्रीमंत माधवरावजी सिंधिया यांचे व कुटुंबाचे स्वीय चिकित्सक होते. अशा उच्चविद्याविभूषित कुटुंबाचा वारसा शरद यांना लाभला. लहानपणापासूनच शरद यांना खेळण्या-बागडण्याबरोबरच वाचन आणि विज्ञान विषयात रूची होती. इथल्या विज्ञान मंदिरात ते विज्ञानविषयक चित्रपट पाहत.
१९६४ मध्ये खारूंआ कलां येथे वडिलांची आरोग्य केंद्राचे प्रमुख म्हणून बदली झाली. येथे आठवीपर्यंतच वनवासी मुलांसाठी शाळा असल्याने शरद आपल्या आईसोबत पुन्हा इंदौरला आले. अभ्यासात तल्लख असलेल्या शरद यांनी शालेय वयातच शिवणयंत्र, सायकल तसेच ‘स्टोव्ह रिपेअरिंग’ची कला आत्मसात केली. नाटक, कला, क्रीडा तसेच तबल्याची मध्यमा परीक्षा उत्तीर्ण केल्याचे शरद सांगतात.
१९६९मध्ये ग्वाल्हेरला उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना मोटर वायंडिंग शिकून ’पुस्तके ब्रदर्स’ या नावाने व्यवसाय करीत इंजिनिअरिंग पूर्ण केले. तोपर्यंत शरद यांनी वाहनांची यंत्र, तंत्रदुरुस्ती शिकण्याबरोबरच ऋग्वेद आणि अथर्ववेद याचे तसेच अन्य संत साहित्याचे वाचन केले. एका मारवाडी मित्रासोबत दोन वर्षे होजियरी कारखानादेखील त्यांनी चालवला.इंजिनिअरिंगच्या शेवटच्या दोन वर्षात समुद्राच्या भरती ओहोटीपासून देशातील कोणकोणत्या ठिकाणी वीजनिर्मिती होऊ शकते, या संदर्भातील अहवाल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सादर केला होता. त्याची दखल भारत सरकारच्या ऊर्जा विभाग आणि राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थांनी घेतली.
याच दरम्यान शरद हे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात बुलढाणा अर्बन येथे ज्युनि. इंजिनिअर म्हणून रुजू झाले. इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विषयात इंजिनिअरिंग केलेली असल्याने काही वर्षातच त्यांची वर्णी मुंबईत लागली. महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन यांना ’वॉकीटॉकी’चे ‘चार्जर’ तसेच ‘वायरलेस’साठीचे ‘टॉवर डिझाईन’, पाच प्रकारचे ‘वायरलेस ग्राऊंड प्लेन अँटिना’ बनवून दिले, त्यात ‘राजधानी एक्सप्रेस’ साठीचा ‘अँटिना’देखील आहे. यासाठी श्री संचार उपकरणे ही एक कंपनी सुरु केली. त्यांच्या मूळ संकल्पनेवर आधारित असा प्रकल्प ‘सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथोरिटी’ने संपूर्ण देशात राबविण्यावेळेस सल्लागार नेमणुकीवरून खटके उडाले.
त्यानंतर ऊर्जा क्षेत्रात अभिनव कामगिरी करण्याच्या ध्येयाने या चाकोरीबद्ध कामातून बाहेर पडून शरद यांनी १९९० मध्ये नोकरीला रामराम ठोकला आणि सहचारिणीच्या साथीने कंपनीची सुरुवात केली. त्यानंतर ‘मेलट्रॉन’ कंपनीने मध्य प्रदेशची ‘डिस्ट्रिब्युटरशिप’ दिली, तर महाराष्ट्र सिंचन विभागाचे ‘वायरलेस’ संच लावण्याचे व ‘ट्रेनिंग’चे काम मिळाले. मध्य प्रदेश वन विभागात उत्तम कामे केल्यामुळे शरद यांचे नाव गाजू लागले आणि १९९३ मध्ये ’श्री संचार उपकरणे’ ही ‘श्री-नील टेलिकम्युनिकेशन प्रा. लि.’ झाली. देशभर वेगवेगळ्या प्रकारच्या कार्य करणार्या संस्थांसाठी ‘सोल्यूशन इंजिनिअरिंग’ करण्याची कामे मिळाली.
महाराष्ट्र राज्य परिवहनासाठी ‘वायरलेस’ लावण्याचे तसेच रेल्वेसाठी ‘वायर सिस्टीम’ काढून त्याऐवजी ‘वायरलेस सिस्टीम डिझाईन’ करून देशात पहिल्यांदाच लावण्याचे काम केले. पुढे ‘हिताची’ जपान येथे सल्लागार म्हणून जाण्याचा योग आला. त्यानंतर २००० साली चीन, हाँगकाँग, थायलंड, पाकिस्तान, भारत येथे ‘सर्व्हर सिस्टीम’वर आधारित ‘टेलिकम्युनिकेशन सिस्टीम’ बाबत अभ्यास करण्याचे काम केले. २००२ साली सागरीऊर्जेसाठी आणि छोट्या हायड्रो पॉवर प्लांटसाठी चीन सरकारशी करार केला. याच सुमारास ‘वायफाय सिस्टीम’ आणि ‘व्हाईस ओवर आयपी’ ही टेक्नोलॉजी भारतात वापरायला सुरुवात झाल्याने त्यावर आधारित सिस्टीम्स त्यांनी उभारल्या.
याशिवाय नागपूर मनपा, ठाणे मनपा, तसेच विदर्भ आणि लोटे परशुराम येथील उद्योगांसाठी काम केले. शरद यांना भविष्यात भरती-ओहोटीवर आधारित ऊर्जा प्रकल्प राबवायचा आहे. मितभाषी असलेल्या शरदरावांचे पैसा हे ध्येय नाही, इतरांना शिकवणे हीच समाजसेवा मानत ज्याला गरज आहे, त्याला विनामोबदला शिकवायची त्यांची तयारी आहे. १९८२ पासून ‘शिखर औटवर्ड बाऊंड इन्स्टिट्यूट’ या संस्थेचे संस्थापक सदस्य आणि काही वर्षं एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत.विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी मदतीसाठी २०१६ पासून ‘फाऊंडेशन फॉर इंटरडिसीप्लेनरी रिसर्च’ची स्थापना केली आहे. “शिक्षण कधी संपत नाही, प्रत्येक दिवस आणि प्रत्येक व्यक्ती काही तरी नवीन अनुभव देत असते. त्यामुळे दुसर्याला कमी लेखू नका. असा सल्ला ते नव्या पिढीला देतात,” अशा या उर्जस्वी व्यक्तिमत्त्वाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा !