न्यायविषयक व साहित्यविषयक कामगिरीवरून न्या. नरेंद्र चपळगावकर यांना अनेक पुरस्कारही मिळाले. तसेच ते विभागस्तरावरील अनेक साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष राहिलेले आहेत. आता 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी त्यांची निवड झाली, ते नक्कीच आनंददायक!
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ लेखक, विचारवंत नरेंद्र चपळगावकर यांची येत्या फेब्रुवारीत वर्ध्यामध्ये होणार्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन व स्वागत. तत्पूर्वी, ज्येष्ठ लेखक, पत्रकार व प्राध्यापक सुरेश द्वादशीवार यांचे नाव साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या चर्चेतहोते. मात्र, त्याआधीच्या एका भाषणात, “ललित साहित्याचे बहुतांश लेखक उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधीविरोधी होते,” असे अतार्किक विधान करतानाच सुरेश द्वादशीवारांनी, वि. स. खांडेकरांपासून आचार्य अत्रेंपर्यंत अनेकांची निंदा केली होती. तसेच, “न्यायालयेसुद्धा सध्या स्वच्छ राहिली नाहीत, ती हिंदू मताची झाली आहेत,” असे भारतीय न्यायव्यवस्थेचा अपमान करणारे विधानही सुरेश द्वादशीवारांनी केले होते. म्हणजेच, साहित्यविषयक मतांपेक्षा साहित्यबाह्य टिप्पण्या करण्यातच सुरेश द्वादशीवारांना रस असल्याचे यावरून दिसून आले व त्यामुळेच त्यांचे साहित्य संमेलनाध्यक्षपदही हुकले.
पण, आता साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड झालेले न्या. नरेंद्र चपळगावकर बेजबाबदार विधाने करणार्या सुरेश द्वादशीवारांपेक्षा कैकपटींनी चांगले. कारण, न्यायाधीश म्हणून काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव, तसेच वैचारिक लेखन करणारे संवेदनशील व सत्त्वशील लेखक म्हणूनही त्यांचा मराठी जनतेला परिचय आहे. त्यांनी विविध विषयांवर मराठीत लिखाण करून मराठी साहित्यात बहुमोल योगदान दिले आहे. हैदराबादच्या स्वातंत्र्यसंग्रामाची कहाणी सांगणारे, स्वामी रामानंद तीर्थ यांचे चरित्र सांगणारे, तसेच स्वातंत्र्यसैनिक व थोर पत्रकार अनंत भालेराव यांचे कर्तृत्व सांगणारे, अनेक व्यक्तिचित्रणे, ललित लेख, नामदार गोपाळ कृष्ण गोखलेंचे कार्यकर्तृत्व सांगणारे, अशी अनेक पुस्तके त्यांनी मराठी साहित्याला दिली. त्यांनी भारतीय न्यायसंस्था, त्यातील वेगवेगळ्या गोष्टी, काही न्यायमूर्तींची चरित्रेही लिहिली. एरवी सामान्यतः लेखक जे विषय हाताळत नाहीत, अशा विषयांवरही त्यांनी लेखन केले. त्यांच्या न्यायविषयक व साहित्यविषयक कामगिरीवरून न्या. नरेंद्र चपळगावकर यांना अनेक पुरस्कारही मिळाले.तसेच ते विभागस्तरावरील अनेक साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष राहिलेले आहेत. आता 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी त्यांची निवड झाली, ते नक्कीच आनंददायक!
मराठी भाषेच्या संवर्धनासाठीचे एक व्यासपीठ म्हणून 100 वर्षांपूर्वी साहित्य संमेलनाची संकल्पना उदयास आली. महाराष्ट्रात बोलली जाणारी भाषा म्हणून मराठीला ओळखले जाते. पण, चांद्यापासून बांद्यापर्यंत एकच एक मराठी नाही. त्यात विभागानुसार, समाजानुसार, जातसमुदायानुसार अनेकानेक बदल झाल्याचे पाहायला मिळते. आपल्याकडे कोसाकोसावर भाषा बदलते असे त्यामुळेच म्हणतात. त्यात, विविध लोकभाषा, बोलीभाषा, लेखभाषांचा समावेश होतो. या मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांना मराठी भाषेसाठीच्या साहित्य संमेलनात स्थान मिळायला हवे, ही मराठीभाषिकांची अपेक्षा असते. त्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यापैकीच एक उदाहरण कवी महेश केळुसकर यांच्या एका कवितेतून दिसते,
पांदनीत भेटलंस, अंगाक खेटलंस,
काळोख किनाट
हातात हात, घेतलंस अकस्मात,
झालो झिनझिनाट
तर कवी विठ्ठल वाघ आपल्या एका कवितेत म्हणतात,
काळ्या मातीत मातीत तिफन चालते
वीज थयथय नाचते, ढग ढोल वाजवितो...
या दोन कवितांतून मराठी माणूसच वेगवेगळ्या बोलीभाषेत व्यक्त झाला आहे. पण, इथून तिथून पसरलेल्या मराठी मुलखातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनातल्या भावनांची अभिव्यक्ती यापेक्षाही वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून झालेली आहे, होत आहे आणि होणारही आहे. ती सामान्य मराठी भाषेव्यतिरिक्त कोकणी, अहिराणी, वर्हाडी आणि इतरही अनेक मराठीच्याच भाषाप्रकारांतून होते. त्या सर्वांशीच मराठी साहित्य संमेलनातून न्यायाने वागले पाहिजे, त्यांचाही न्याय केला पाहिजे, त्यांना आपल्या व्यासपीठावर समाविष्ट केले पाहिजे. न्या. नरेंद्र चपळगावकर त्या दिशेने प्रयास करतील, असे वाटते.
पुढचा मुद्दा म्हणजे, वर्षानुवर्षांपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने होत असतानाच एकेकाळी त्याला समांतर इतरही अनेक साहित्य संमेलने उभी राहिली. मात्र, आज त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. पण, मराठी साहित्य संमेलन अजूनही मोठ्या उत्साहाने भरवले जाते आणि तिथे मराठीजनही मोठ्या आनंदाने येतात. कारण, मराठी साहित्य संमेलनाला परंपरा होती, लोकमान्यता होती. मात्र, गेल्या काही काळापासून साहित्य संमेलनाच्या ठेकेदारांनी मराठीजनांच्या साहित्य संमेलनाविषयीच्या याच भावनेला नख लावण्याचे काम केले. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून साहित्यबाह्य टिप्पण्या करत आपल्या राजकीय मालकांचे ‘नॅरेटिव्ह’ समाजापुढे नेण्याचे काम केले.
देशात अमके वातावरण आहे, जगात तमके वातावरण आहे, असे म्हणत भीती पेरण्याची, द्वेष पसरवण्याची पोपटपंची त्यांनी केली. वस्तुतः मागील आठ-साडेआठ वर्षांपासून हिंदुस्थान सुजलाम्-सुफलाम् होत असल्याचे विविध क्षेत्रातली देशाची प्रगती पाहिल्यास स्पष्ट होते. राजकीय नेतृत्वाला त्याचे जितके श्रेय आहे, तितकेच भारतीयांनादेखील आहे. पण, पेला अर्धा रिकामा आहे की पेला अर्धा भरलेला आहे, हे पाहणार्याच्या दृष्टीवर अवलंबून असून त्यासंबंधीचा तर्कवितर्क पूर्णतः वेगळा असतो. पण, त्यालाही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर आणण्याचे काम याआधी केले गेले. तसे आता होऊ नये, होणार नाही, असे न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या निवडीवरून वाटते.
साहित्य संमेलन मराठी भाषेच्या संवर्धन व विकासासाठी असताना, त्यात साहित्याची चर्चा व्हायला हवी. त्याचबरोबर आताच्या पिढीची मराठी भाषा, त्यांचे अभिव्यक्त होण्याचे मंच, साहित्यातील नवे प्रवाह आणि समाजमाध्यमांतली मराठी, यालाही साहित्य संमेलनात स्थान मिळाले पाहिजे, नव्या जगात मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी काय करता येईल, याचा विचार केला पाहिजे. अर्थात, न्या. नरेंद्र चपळगावकर यांची साहित्यनिष्ठा व मराठीनिष्ठाही वादातीत आहे. नरेंद्र चपळगावकर न्यायमूर्ती होते, या देशाचे सांस्कृतिक वातावरण ज्या खांबांवर पेललेले आहे, ते त्यांना चांगल्याप्रकारे समजते, असे आम्हाला वाटते. त्यानुसार, त्या खांबांच्या बळकटीसाठी अन् त्यातून मराठीच्या वाढीसाठी ते साहित्य संमेलनाच्या व्यासपाठीचा वापर करतील, अशी अपेक्षा...