मोरबी पूल दुर्घटनेचा धडा...

    08-Nov-2022   
Total Views |
 
मोरबी पूल
 
 
 
 
गुजरातमध्ये मोरबी येथील 143 वर्षांपूर्वी बांधलेला ब्रिटिश काळातला झुलता पूल ऐन दिवाळीत कोसळला. या मोठ्या अपघातात 135 माणसे मृत्यू पावली व 180 हून अधिकजण जखमी झाले आहेत. त्याची काय कारणे असावीत व तेथे काय स्थिती होती, याबद्दल आपण या लेखात माहिती करून घेऊया.
 
 
पुलाची पार्श्वभूमी
 
 
मोरबी येथील कोसळलेला झुलता पूल हा 233 मी. (765 फूट) लांब, 1.25 मी. (4 फूट) रुंद व 15 मी. (50 फूट) होता. मच्छू नदीच्या पाणीपातळीवर बांधलेला पथकरांसाठी तो ’सस्पेन्शन’ पूल होता. 19व्या शतकातील हा पूल ब्रिटिश काळात जुन्या नोंदीप्रमाणे 1977 साली महाराज वाघजी ठाकोर यांनी बांधला होता. त्यावेळच्या मोरबी संस्थानातील दरबारगड राजवाडा व लखधीरजी अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणांना तो पूल जोडला गेला होता. या पुलाचे उद्घाटन बॉम्बे प्रातांचे त्यावेळचे गव्हर्नर रिचार्ड टेंपल यांनी 1879 मध्ये केले. हल्ली या पुलाची मालकी नगरपालिकेकडे आहे व त्यांनी देखभाल व दुरुस्तीकरिता एका ‘ओरेवा कंपनी’बरोबर दि. 7 मार्चपासून प्रशासनाने 15 वर्षांचा करार केला होता. तसेच दुरुस्तीकरिता हा पूल सहा-सात महिने बंद ठेवण्यात आला होता व दुरुस्ती पूर्ण केल्यावर 26 ऑक्टोबरला दिवाळी-नववर्षाच्या मुहूर्तावर तो सुरू करण्यात आला. पुन्हा चालू करण्याच्या समारंभाला ‘ओरेवा’च्या व्यवस्थापकीय संचालकांनी भाषण केले की, “हा पूल आता दुरुस्त झाला आहे. तो आठ-दहा वर्षांकरिता टिकेल व पर्यटकांनी तो निश्चिंत मनाने वापरावा,” असे जाहीर केले होते. कोलकात्यातील हावडा पूल व ऋषिकेशचा लक्ष्मण झुला हे पूलसुद्धा ‘सस्पेन्शन पूल’ नाहीत. त्यामुळे मोरबी झुलता पूल हा एकमेव ’सस्पेन्शन पूल’ आहे व अनेक पर्यटकांच्या तो आवडीचाही बनला होता. पुलावर जाण्याकरिता प्रौढ व्यक्तींना प्रत्येकी 17 रु. व लहाना मुलांसाठी 12 रु. असे तिकीट दर होते.
 
 
‘सस्पेन्शन’ केबल पूल म्हणजे काय?
 
हा एक पुलाचा विशिष्ट प्रकार आहे व त्यात पुलाच्या दोन्ही शेवटकडच्या ‘अ‍ॅन्कर टॉवर’ना जोडलेल्या झुलत्या केबलजोडीवर खालील पूल रस्ता (डेक) उभ्या अनेक ’सस्पेंडर केबल’नी जोडलेले असतो. त्यामुळे टांगत्या ’डेक’चे वजन हे झुलत्या केबलच्या भरवशावर जोडलेले असते. झुलत्या केबल टॉवरच्या ‘अ‍ॅन्कर’वर घट्ट जोडलेले असते. म्हणजेच ‘डेक’चे वजन हे ‘टॉवर’च्या ‘अ‍ॅन्कर’मुळे सांभाळले जाते.
 
 
या पुलाची रचना अशी असते की, ’डेक’चे वजन उभ्या ’सस्पेन्डर’मधून झुकलेल्या केबलमधून ते ’टॉवर’च्या ’अ‍ॅन्कर’पर्यंत पोहोचते व ’डेक’ हे हवेत तरंगते. हे सगळे अभ्यासातून ठरलेल्या एकूण ’डेक’च्या व लोकांच्या हलत्या वजनापर्यंत तरंगते राहू शकते. या ठरलेल्या वजन-क्षमतेबाहेर ते वजन वाढले, तर केबल बकल होऊन केबल वा ’सस्पेन्डर्स’ तुटले जाऊ शकतात. पूल वापरणार्‍यांनी ’ओव्हरलोडिंग’ होता कामा नये, याची मात्र काळजी घ्यावयास हवी.
 
 
‘आयआयटी कानपूर’मधील ‘स्ट्रक्चरल अभियांत्रिकी’मधील तज्ज्ञ असोसिएट प्रोफेसर डॉ. सुदीपकुमार मिश्रा यांनी पूल एकदम कोसळल्यानंतर ’सीसीटीव्ही’चे फुटेज तपासले. त्यांचे असे म्हणणे पडले की, हे पुलाचे कोसळणे हे काही विलक्षण घडले आहे. त्यांच्याकडे सर्व माहिती नव्हती, पण प्रसारित केलेल्या ’व्हिडिओज्’मधून त्यांना असे आढळते की, एका झटक्यात सर्व पूल कोसळला.
 
 
सर्वसाधारणपणे नेहमीच्या कोसळण्याच्या घटना हळूहळू एक किंवा दोन ‘सस्पेंडर’ तुटून घटना घडतात. परंतु, कंत्राटदारांनी दुरुस्ती कोणत्या मुद्द्यांवर केली गेली आहे, ते अजून कळले नाही. ’सस्पेंडर्स’ गंजलेले असतील वा कमी ताकदीचे राहिले असतील, तर त्यामुळे पूल एकदम खाली आलेला दिसतो. दुसरी गोष्ट, लोकांचे वजन हे नेमून दिलेल्या क्षमता-वजनाहून भारी झालेले दिसते आहे. ’साईट’वरची दृश्ये बघितल्यावर दोन्हीकडील ’टॉवर’मध्ये काही बिघाड झाला नाही व रस्ता ‘डेक’ला, पण बिघाड दिसला नाही. ‘सस्पेन्डर्स’च्या ‘डेक’ जोडण्यामध्ये फक्त बिघाड झालेला दिसतो आहे. विशेषत: पुलाच्या एका बाजूला जास्त बिघाड दिसतो आहे.
 
 
दुरुस्ती होण्याच्या आधी लाकडी फळ्यांऐवजी ’अ‍ॅल्युमिनीयम’च्या चार पत्र्यांचे थर वापरले गेले आहेत व त्यामुळे ‘सस्पेन्डर’च्या जोडण्यात बदल केले गेले आहेत, हे समजले.
 
 
अमेरिकेत ’गोल्डन गेट ब्रिज’ व ’ब्रुकलिन ब्रिज’ ही ’सस्पेन्शन ब्रिज’ची उत्तम व लोकप्रिय उदाहरणे आहेत. भारतात वाहने नेणारा सर्वात लांब ’सस्पेन्शन’ पूल म्हणजे ’टेहरी लेक’वरील ‘डोब्रा चांती ब्रिज’ व तो 725 मी. लांब आहे. या पुलाचे नोव्हेंबर 2020 मध्ये उद्घाटन झाले.
 
 
पूल कोसळला...
 
पाच दिवस पर्यटकांच्या वाहतुकीनंतर हा पूल दि. 30 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी नदीत कोसळला. काही वार्ताहरांचे म्हणणे पडले की, त्या कोसळण्याच्या वेळी पुलावर सुमारे 250 ते 300 माणसे अनियंत्रितपणे वावरत होती. लोकांची क्षमता ही फक्त 125 इतकी होती. सुरक्षिततेच्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजवरून त्यावेळी पूल पडताना अशी दृश्ये दिसली की, पुलाची रचना-बांधणी जोरजोरात हेलकावे घेत होती व पुलाचा रस्ता मध्यभागी दुभंगित झाला. वाचलेल्या माणसापैकी एकाने सांगितले की, लोकांनी पुलावर फार गर्दी केलेली होती व पुलाच्या काही तुकड्यांमुळे काहीजण त्यात चिरडले पण गेले होते. लोकसभेचे खासदार मोहन कुंदरिया यांच्या घरातील सर्वच्या सर्व 12 कुटुंबीय या अपघातात दुर्दैवाने मृत्यू पावले.
 
 
या पूल अपघातात सापडलेल्यांच्या सुटकेकरिता ’एनडीआरएफ’, ‘आर्मी’, ’नेव्ही’, ’एअरफोर्स’, पोलीस, ’मिलिटरी’ आणि कित्येक आपद्कालविषयक काम करणार्‍या संस्थांची पथके कार्यरत होती. गुजरात सरकारने मृतांच्या जवळच्या नातलगांना प्रत्येकी चार लाख रुपये व जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये ’एक्स ग्रेशिया’ मदत जाहीर केली आहे.
 
 
मच्छू नदी
 
गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यातील मदला हिलवर ही नदी उगम पावते व 141.75 किमी प्रवास करून शेवटी कच्छच्या रणात जाऊन मिळते. पूल कोसळल्यावर माणसे नदीत पडली, पण नदीचे पाणी गढूळ असल्याने कुठे पडले ते सुटकेकरिता स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळे ’गुजरात वॉटर’ संस्थेने दहा किमी नदीमधील सात लाख लीटर पाणी पंपाने बाहेर काढले.
 
 
चौकशी सत्र
 
एका माहितीप्रमाणे कळते की, पूल संपूर्ण दुरुस्त होण्याच्या आधीच चालू करण्यात आला. मोरवी पालिकेच्या मुख्य अधिकारी यांचे म्हणणे आहे की, या अपघाताकरिता नूतनीकरण करणार्‍या संस्थेचीच पूर्ण जबाबदारी आहे. त्यांनी पूल चालू केला, पण आम्हाला खबर दिली नाही व त्यामुळे आम्ही पुलाचे ‘फीटनेस सर्टिफिकेट’ मिळवू शकलो नाही.
 
 
‘फॉरेन्सिक रिपोर्ट’ न्यायालयात सादर केला त्यात ‘सस्पेन्शन’ केबलच्या तारा काही ठिकाणी गंजलेल्या होत्या व त्या कंत्राटदारांनी बदलल्या नाहीत, असे होते. सरकारने या घटनांच्या खोलवर व्यापक चौकशीकरिता पाच अधिकार्‍यांचे पथक स्थापले आहे. काही जणांना पोलिसांनी पकडले आहे. त्यात नऊजण ‘ओलेवा’ संस्थेचे आहेत. पोलिसांनी मोरबी पालिकेचे मुख्य अधिकारी संदीप सिंग झाला यांनासुद्धा अटक केली आहे.
 
 
‘एक्झिक्युशन मॅनेजर’ न्यायालयात म्हणाले की, ”कंत्राटदार कंपनी किंवा सब-कंत्राटदार कंपनी कोणीच या दुरुस्तीच्या कामाकरिता पात्रता असलेले वा ’क्वालिफाईड’ नव्हते. याच कंत्राटदाराला 2007 मध्ये आणि परत मार्च 2022 मध्ये कंत्राट दिले गेले. यात निविदा बोलावणे वगैरे काहीच पद्धत नव्हती. जेव्हा गेल्या महिन्यात पूल खुला झाला, तेव्हा पुलाच्या ’केबल’ वायर्स गंजलेल्या होत्या.
 
 
अ‍ॅड. विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. देशातील कुठल्याही भागातील पूलदुरुस्तीकरिता भविष्यात काळजी घ्यायला हवी व असे दुर्दैवी अपघात टाळण्याकरिता व जोखमीची कामे करताना समिती स्थापन करण्यासाठी हवी. या खटल्याची सुनावणी न्यायालयात दि. 14 नोव्हेंबरला होणार आहे.
 
 
एकाने असे म्हटले आहे की, मोरबीच्या कोसळलेल्या पुलाचे ठेकेदार असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकांनी उघडपणे हा अपघात म्हणजे ही देवाची करणी असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अर्थ हा आहे की, त्यांनी केलेल्या दुरुस्तीचे काम सर्वोत्कृष्ट दर्जाचे होते. पूल कोसळण्याचे कारण त्यांनाही अनाकलनीय होते.
 
 
काही ज्वलंत प्रश्न डोळ्यासमोर येतात ते असे की, पुलावर तिकिटे काढून पर्यटक गेले तेव्हा एकूण किती पर्यटक गेले? या गर्दीची काही चौकशी केली गेली का? कंत्राटदाराला ठेका दिला तेव्हा काही ‘टेंडर प्रोसेस’ अंगीकारली होती का? दुरुस्तीच्या कामाची गुणवत्ता कोणी तपासली? यांसारख्या प्रश्नांची उत्तरे समोर आली पाहिजेत. तसेच या दुर्घटनेतून धडा घेत, यांसारख्या देशभरातील पुलांचे ऑडिट आणि व्यवस्थापन करणेही तितकेच महत्त्वाचे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अच्युत राईलकर

गणित आणि भौतिकशास्त्रात बीएससी करुन त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केले. महानगरपालिकेपासून ते मध्य पूर्व तसेच थायलंडमध्ये बांधकामअभियंता म्हणून कार्याचा व्यापक अनुभव. पायाभूत सोयीसुविधा, शहरीकरण, संशोधनपर विषयात अभ्यासपूर्ण लेखनाचा प्रदीर्घ अनुभव.