पुणे: टीव्ही 9 वृत्तवाहिनीचे पुण्याचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे 2020 मध्ये निधन झाले होते. रायकर यांच्या निधनानंतर काही दिवसांत केंद्र सरकारने 5 लाखांची मदत रायकर यांच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर भाजपकडूनही 5 लाखाची मदत मिळाली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रायकर यांच्या कुटुंबीयांची सांत्वन भेट घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. परंतु ती मदत अजुनही रायकर कुटुंबाला मिळालेली नाही.
अडीच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पांडुरंग रायकर यांची पत्नी शितल रायकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले असून सुप्रिया सुळे यांनी जाहीर केलेली मदत अद्याप मिळाले नसल्याचे नमूद केले आहे. तसेच यामध्ये या मदतीच्या अजूनही प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी म्हंटले आहे. पतीच्या निधनानंतर मुले आयांश रायकर आणि पृथ्वीजा रायकर यांनाही जाहीर केलेली मदत अद्याप मिळालेली नसून यांनी आपल्या दोन्ही मुलांचे बँक अकाउंट नंबर दिले असून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेली मदत जमा करण्याची विनंती केली आहे. या पत्राच्या प्रती शितल रायकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठविल्या आहेत.
यासंबंधी अतुल भातखळकर यांनी ट्विट करून, वसुली सरकार कोसळल्याच्या दुःखात पैसे द्यायचा बहुदा त्यांना विसर पडला असल्याचे म्हंटले आहे. "कोविड सेंटरच्या भ्रष्ट आणि गलथान कारभारामुळे बळी गेलेल्या पत्रकार पांडुरंग रायकर यांना सुप्रिया सुळे यांनी पाच लाखांची मदत जाहीर केली होती. वसुली सरकार कोसळल्याच्या दुःखात पैसे द्यायचा बहुदा त्यांना विसर पडला. आता रायकर यांच्या पत्नीने थोरल्या पवारांकडे दाद मागितली आहे." असे म्हणत अतुल भातखळकर यांनी निशाणा साधला आहे.