मुंबई : जेष्ठ इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांना शरद पवार यांनी पदवी प्रदान केली होती. त्यावेळी पवारांनी त्यांचे कौतुकच केले होते. हा व्हिडीओ आमदार अतुल भातखळकर यांनी शेअर केला आहे. पदवी देताना पवारांनी बाबासाहेबांचे कौतुक केल्याचे या व्हिडिओमधून पाहायला मिळते.
या व्हिडीओमध्ये शरद पवार म्हणतायत, "शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कामाचं, त्याच्या इतिहास अभ्यासातील योगदानाचं कौतुक केलंय. पुरंदरेंनी आपल्या व्याखानांमधून महाराष्ट्र आणि छत्रपती यांच्याबाबतही महत्त्वपूर्ण माहिती तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम केलंय. त्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलंय. त्यांच्यासारखा झोकून देऊन काम करणाऱ्या माणसाचा आज गौरव होतोय, याचा मला आनंद आहे."
दरम्यान, अतुल भातखळकर यांनी एक लिंक शेअर करत जेम्स लेन यांनं बाबासाहेब पुरंदरे यांच्याशी कधी बोललोच नव्हतो, असं स्पष्ट केल्याचंही म्हटलंय. पवार खोटं बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करत असल्याचा आरोप अतुल यांनी केला आहे. तसेच समाजात खळबळ पसरवल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई व्हावी असेही ते म्हणाले आहेत.
हा विषय सुरु झाला तो, राज ठाकरेंच्या उत्तरसभेपासूनच. राज ठाकरेंनी पवारांना उद्देशून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास यावरुन भाष्य केलं होतं. राज ठाकरे यांनी म्हटलं होतं, "बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घराघरात पोहोचले. पण आम्हाला इतिहास बघायचा नाही. आम्हाला ते पुस्तक कोणत्या जातीच्या माणसानं लिहिलंय, ते बघायचंय. आम्ही छत्रपतींचा इतिहास सांगणार नाही. आम्ही मराठेशाहीचा इतिहास सांगताना त्यात फोड करणार की पेशव्यांनी केलेली गोष्ट वगैरे. शरद पवार साहेब, काय चाललंय?"
तरीही जेम्स लेननं म्हटलं की, छत्रपती शिवरायांचं पुस्तक लिहिताना पुरंदरेंची मला कोणतीही मदत झाली नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या पुस्तकात मी कोणतेही ऐतिहासिक तथ्य मांडले नाहीत. दुसरं म्हणजे जेम्स लेनच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत पुरंदरेंचं नाव होतं, मग पुरंदरेंनी माहिती दिली नाही, हा दावा जेम्स लेन का करतोय, असे प्रश्न उभे केले जातायत. त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं, यावरुन चर्चांना उधाण आलंय.