सेवानिवृत्त आयबी अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू; खून असल्याची शंका, वाचा सविस्तर!

    07-Nov-2022
Total Views |

आर. एन. कुलकर्णी
 
 
 
 
म्हैसूर: आयबीचे माजी अधिकारी आर. एन. कुलकर्णी यांचा कर्नाटकातील म्हैसूर येथे झालेल्या अपघातात मृत्यू झाला. म्हैसूरच्या मानस गंगोत्री परिसरात शुक्रवारी संध्याकाळी आयबीचे माजी अधिकारी आर के कुलकर्णी नेहमीप्रमाणे फिरायला गेले असता ही घटना घडली आहे. संध्याकाळी ५.३० वाजता मानसा गंगोत्री येथे आर के कुलकर्णी यांना कारने धडक दिली. या अपघाताची सखोल चौकशी केली असता हा अपघात नसून खून असल्याचा निष्कर्ष निघाला आणि त्यानुसार आम्ही आमचा तपास सुरू केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. तपासासाठी सहायक पोलिस आयुक्त नरसिंहराजे यांच्या नेतृत्वाखाली तीन पथके तयार करण्यात आली असल्याचीही माहिती आहे.
 
 
या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज वरून हा खून असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे. एक गाडी त्यांच्या अंगावर मुद्दाम धावत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. पोलिसांनी गाडीचा शोध सुरू केला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, "८३ वर्षीय माजी अधिकारी म्हैसूर विद्यापीठाच्या मनसा गंगोत्री कॅम्पसमध्ये नेहमीप्रमाणे फिरायला जात असताना एका वाहनाने त्यांना धडक दिली. या घटनेनंतर कुलकर्णी यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले."
 
 
यावर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. "आयबीमध्ये दीर्घकाळ सेवा बजावणारे व जिहादवरील पुस्तकाचे लेखक, सेवानिवृत्त अधिकारी कुलकर्णी (८३ वर्षे) यांची मैसूर येथे गाडी अंगावर घालून हत्या करण्यात आली आहे. हे कोण असेल याचा अंदाज आपण बांधू शकतो. या हत्येमागील देशद्रोही षडयंत्रकाऱ्यांचे आव्हान संपूर्ण देशाने स्वीकारले आहे, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.