बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल...

    05-Nov-2022   
Total Views |

Bolava Vitthal

बोलावा विठ्ठल

नुकतीच कार्तिकी एकादशी झाली. आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी म्हणजे वारकरी तसेच समस्त भक्तांसाठी मोठी आनंदाची पर्वणीच. त्यांच्या लाडक्या विठूमाऊलीच्या दर्शनासाठी मैलोन्मैल चालत भक्तगण पंढरपूरला जातात. विठ्ठलाचे मोहक निळेसावळे रूप आपल्या लोचनी साठवून घेतात. प्रत्येकाला विठ्ठल हा वेगवेगळ्या रुपात भासत असतो. संतसाहित्यात तर विठ्ठलाच्या रुपाचे वर्णन करणार्‍या अनेक रचना आहेत. आज आपण या विविध अभंगांमधून विठूमाऊलीचे सगुण-निर्गुण रूप जाणून घेऊया...

भारतीय संस्कृतीत साधरणत: इ.स. दुसर्‍या-तिसर्‍या शतकापासून भक्तिसंप्रदाय निर्माण झाला, असे मानले जाते. त्याआधीही भक्ती होतीच. परंतु, त्या भक्तीचे स्वरूप हे तत्त्वनिष्ठ होते. नंतरच्या काळात भक्तीचे रूप हे अधिकाधिक सुलभ होत गेले. याचदरम्यान नवविधा भक्ती निर्माण झाली. आराध्य देवतेला मानवी रूप देऊन, आपल्याशी नाते जोडून तिची उपासना केली जाऊ लागली. काही देवतांचे रूप न पाहता तिची आराधना केली जाते. यातीलच एक सर्वश्रुत देवता म्हणजे विठ्ठल. रा. चिं. ढेरे यांनी ‘विठ्ठल’ या देवतेवरती संशोधन करून तिला ’महासमन्वय’ म्हटले आहे. ज्यांनी चर्मचक्षूंनी आणि अंत:चक्षूंनी विठ्ठलाला पाहून त्याचे रूप अभंग-गीत रुपात मांडले, त्या विठ्ठलाचे सगुण-निर्गुण, साकार-निराकार रूप पाहूया...

विठ्ठल हे समस्त महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वारकर्‍यांचा जणू आत्मा, अनेकांची माऊली, आधार आणि श्रद्धेचं स्थान. ही विठूमाऊली पंढरपूरक्षेत्री म्हणजेच ‘पौंडरिकक्षेत्री’, ‘पंडरीपूर’, ‘पांडुरंगपूर’ अशा नामभेद असणार्‍या क्षेत्री आहे. तिच्या उत्त्पती, स्थान यावरून अनेक वाद आहेत. परंतु,

युगे अठ्ठावीस विटेवरी ऊभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी वाहे भीमा उद्धारी जगा ॥



या आरतीच्या ओळींवरून युगानुयुगे विठ्ठल विटेवरती कटीवर हात ठेवून उभा आहे, अशी लोकभावना मानण्यास हरकत नाही.
आता हा विठ्ठल रुपाने कसा आहे? तर निळा-सावळा आहे. सध्या आपल्याकडे गोरा रंग हे सौंदर्याचे प्रतीक मानले जाते. या रंगावरून भेदभावसुद्धा होतो. परंतु, गोरेपणाचे एवढे स्तोम माजलेले असले, तरी भक्तांचा अत्यंत प्रिय असा विठ्ठल मात्र काळा-सावळाच आहे. पंढरपुरातील किंवा माढा या ठिकाणी असणारी विठ्ठल मूर्ती ही काळ्या दगडामधून बनवलेली आहेच. गावोगावी असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरांमध्येही बहुधा काळ्या रंगाच्याच दिसतात. संतांपासून ते आजकालच्या गीतकारांपर्यंत सर्वांनी एकमुखाने ‘या सावळ्या तनूचे’ भरपूर गुणगान केले आहे. संतसाहित्यामध्ये विठ्ठलाचे सावळे सुंदर रूप सदोदित आपल्या हृदयात राहू दे आणि त्याचे गोड नामस्मरण घडत राहू दे, एवढीच एकमेव इच्छा मागितलेली दिसते. पांडुरंगासारखा दयाळू कुठेही शोधून सापडणार नाही. आपण जे चिंतितो, ते तो लगेच देतो, अशी त्याची स्तुती संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगात केलेली आहे.

सावळें सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयीं माझे ॥1॥
आणिक कांही इच्छा,
आम्हां नाहीं चाड ।
तुझें नाम गोड, पांडुरंगा ॥2॥
जन्मोजन्मीं ऐसें, मागितलें तुज ।
आम्हांसी सहज, द्यावें आतां ॥3॥
तुका म्हणे तुज, ऐसे दयाळ ।
धुंडितां सकळ, नाहीं आम्हां ॥4॥
 
 
अभंगाप्रमाणेच भक्तीगीतांमध्येही सावळ्या विठ्ठलाचे अनुपम रूप, त्याचे मोहक दर्शन आणि त्याच्या भक्तांवरील मायेचे वर्णन आलेले आहे. कवी सुधांशु, शांताबाई जोशी आणि रा. ना. पवार यांनी रचलेल्या भक्तीगीतांमधून विठ्ठलाच्या लावण्याचे वर्णन आपल्याला दिसते.
 
 
सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले ।
विसरूनी गेले देहभान ॥ध्रु.॥
गोजिरे हे रूप पाहुनिया डोळां ।
दाटला उमाळा अंतरि माझ्या ।
तुकयाचा भाव पाहुनी निःसंग ।
तारिले अभंग तूच देवा ॥

कवी सुधांशु विठूमाऊलीच्या मूर्तीचे वर्णन करताना त्यांच्यातील अद्वैत व्यक्त करतात. ‘माळ त्याची माझिया गळा’ म्हणताना ‘तो’ आणि ‘मी’ असा भेद राहिला नसल्याचे ते सांगतात.

देव माझा विठू सावळा। माळ त्याची माझिया गळा ॥ध्रु.॥
विठु राहे पंढरपुरी,वैकुंठच हे भूवरी ।
भीमेच्या काठी डुले,
भक्तिचा मळा ॥1॥
साजिरे रुप सुंदर,
कटि वसे पितांबर।
कंठात तुळशीचे हार,
कस्तुरी टीळा ॥2॥
भजनात विठू डोलतो,
किर्तनी विठू नाचतो
रंगूनी जाई पाहूनी
भक्ताचा लळा ॥3॥

पितांबर नेसलेली विठ्ठलाची सावळी मूर्ती असून तिच्या कंठात तुळशीचा हार, ललाटी कस्तुरीचा टीळा आहे. हा विठू सर्व भक्तांमध्ये राहणारा आहे. शांताबाई जोशी विठ्ठलाच्या गुणांचे वर्णन करून रुक्मिणीमातेला म्हणतात की, लाखात लाभले


भाग्य तुला ग बाई । विटेवरच्या विठ्ठलाची झालिस रखुमाई ।
लाखात लाभले भाग्य
तुला ग बाई ।
विटेवरच्या विठ्ठलाची
झालिस रखुमाई ॥ध्रु.॥
मेघासम जो हसरा श्यामल ।
चंद्राहुनि तो अधिकहि शीतल ।
नाम जयाचे मुखात येता ।
रूप दिसे ग ठायी ठायी ॥1॥


मेघासमान शामल वर्णीय असून, चंद्रासमान शीतल आहे. समस्त भक्तवर्गाची माऊली असणारा विठ्ठल तुझा पती आहे, हे तुझे अहोभाग्यच! असे शांताबाई म्हणतात. नवविधा भक्तीमध्ये मधुरा भक्ती ही प्रियतम भक्ती आहे. जिचे आदर्श उदाहरण म्हणजे संत मीराबाई. तसेच राधा-कृष्ण हे युगुल असले, तरी भक्तिसंप्रदायामध्ये त्यांना आध्यात्मिक स्थान आहे. पी. सावळाराम यांनी रचलेल्या एका रचनेत विठ्ठलाच्या रुपाचे वर्णन करून भक्ती आणि अध्यात्म यांचा मेळ घातला आहे.



विठ्ठला, समचरण तुझे धरिते ।
रूप सावळे दिव्य आगळे अंतर्यामी भरते ॥ध्रु.॥
नेत्रकमल तव नित फुललेले ।
प्रेममकरंदे किती भरलेले ।
तव गुण-गुंजी घालीत रुंजी ।
मानस-भ्रमरी फिरते ॥1॥
अरुण चंद्र हे जिथे उगवती ।
प्रसन्न तव त्या अधरावरती ।
होऊन राधा माझी प्रीती ।
अमृतमंथन करिते ॥2॥



स्पर्श असो किंवा नेत्र, हे शब्दांवाचून बोलतात. विठ्ठलाचे नेत्र हे सदैव प्रेमाने भरलेले आहे. इथे विठ्ठलाच्या नेत्रांना नेत्रकमल, तर त्यातील भावाला प्रेममकरंद म्हटले आहे. विठ्ठलाच्या मधुरा भक्तीचे माणिक वर्मा यांनीही गायलेले आहे. विठूमाऊली सावळी असली, तरी मदनालासुद्धा लाजवेल, असे सौंदर्य आहे. त्यांच्या रुपामध्ये जीव धुंद झाला आहे, असे वर्णन ते करतात.



विठ्ठला रे, तुझे नामी, रंगले मी रंगले मी ।
विठ्ठला रे, रूप तुझे साठविते अंतर्यामी ॥ध्रु॥
तुझ्या कीर्तनाचा गंध, करितसे जीव धुंद ।
पंढरीचा हा प्रेमानंद, भोगिते मी अंतर्यामी ॥1॥
तुझी सावळीशी कांती, पाडी मदनाची भ्रांती ।
ध्यान तुझे लावियले, सुंदराचा तूच स्वामी ॥2॥
तुझ्या भजनी रंगता, न उरे काम धाम चिंता ।
रुक्मिणीच्या रे सखया कांता, मोहरते मी रोमरोमी ॥3॥


 
विठ्ठलाच्या मोहक रुपाचे वर्णन करणारे अभंग आहेत, विठ्ठलाचे ‘सगुण’ म्हणजे गुणांचे वर्णन करणार्‍या रचनाही केलेल्या आहेत. विठोबाचे नाव उच्चारल्याने आणि त्याचे दर्शन घेतल्याने अतीव आनंद होतो, देहभान हरपून जाते वगैरे सुरस वर्णने संतमंडळींनी केली आहेत. सगुण आणि निर्गुण अशा विठ्ठलाच्या दोन्ही प्रकारच्या रूपांमधून मिळणार्‍या अवर्णनीय आनंदाचे वर्णन ज्ञानदेवांनी केले आहे. संत एकनाथ, संत कान्होपात्रा, संत चोखामेळा आणि त्यांची पत्नी संत सोयराबाई यांनीही अभंगांमधून विठ्ठलाचे गुणगान केलेले आहे. संत नामदेव महाराजांना विठ्ठलाच्या दर्शनाची किती तीव्र ओढ लागलेली होतीच, पण विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर काय करायचे हेसुद्धा नामदेव मनात योजतात.


पाहू द्या रे मज विठोबाचे मुख।
लागलीसे भूक डोळां माझ्या ॥1॥
कस्तुरी कुंकुम भरोनिया ताटी।
अंगी बरवी उटी गोपाळाच्या ॥2॥
जाई-जुई पुष्पे गुंफुनिया माळा।
घालू घननीळा आवडिने ॥3॥
नामा म्हणे विठो पंढरीचा राणा।
डोळिंया पारण होत असे ॥4॥


विठूमाऊलीचे मुखकमल आधीच मनोरम आहेच, त्याला उटी लावून कपाळावर कस्तुरीचा टिळा लावून आणि जाईजुईच्या फुलांच्या माळा त्याच्या गळ्यात घालून त्याला अधिक सुशोभित आणि सुगंधित करायचे, हे झाल्यावर मग तर त्याच्या दर्शनाने डोळ्याचे पारणे फिटल्याशिवाय राहणार नाही, अशी नामदेवांनी विठ्ठलरुपाची योजना केली आहे. एखादे रूप जाणून घ्यायचे असेल, तर आपल्याला इंद्रियांची गरज भासते. जसे चित्रकलेमध्ये ‘अ‍ॅबस्ट्रॅक’ किंवा अमूर्त चित्रशैली असते. आपण काही कल्पना करतो. पण, कधीकधी ती कल्पना व्यक्तही करता येत नाही. यामुळे चराचरामध्ये व्यापलेला निर्गुण-निराकार असा परमेश्वर सामान्य माणसाला समजणे फार कठीण आहे. म्हणून आद्य शंकराचार्यांपासून सर्वांनी सुलभ असा भक्तीमार्ग दाखवला. परंतु, भक्ती करण्यासाठी त्याचे एक सगुण-साकार रूप असले, तर त्याची मूर्ती किंवा चित्र आपण डोळ्यांनी पाहू शकतो, त्याचे वर्णन कानाने ऐकू शकतो किंवा बोलण्यातून व गायनातून करू शकतो. संत तुकारामांनी विठ्ठलाच्या गुणगानाला महत्त्व दिले होते आणि संत नामदेवांनी त्याच्या दर्शनाला प्राधान्य दिले. संत ज्ञानेश्वरांनीसुद्धा विठ्ठलाला भेटण्याची आणि त्याला डोळे भरून पाहण्याची इच्छा काही अभंगांमधून केली.


संत ज्ञानेश्वर हे तर अंतर्ज्ञानी होते. निर्गुण परमेश्वराची उपासना करणे, हे ज्ञानवंताचे काम आहे, हे त्यांनी जाणले होते. परंतु, सामान्य लोकांसाठी या निर्गुण-निराकाराचे सगुण-साकार वर्णन त्यांनी केले.

सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण। ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥1॥
पतितपावन मानसमोहन । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥2॥
ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन॥ ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥3॥
ज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान । ब्रह्म सनातन विठ्ठल हा ॥4॥


संत ज्ञानेश्वरांनी सगुण आणि निर्गुण रूपांना एकत्र आणले आहे. विठ्ठलाच्या दिव्य तेजस्वी रूपाची शोभा केवळ अवर्णनीय आहे, असे सांगून झाल्यावर पुढच्या कडव्यातल्या शब्दांवरून ‘कानडा हो विठ्ठलू’ची मूळ भाषा कानडी होती. त्यामुळे पुढे ‘बोलणेच खुंटले’ आणि ‘शब्देविण संवादू’ झाला, असे कोणाला कदाचित वाटेल, पण ते तसे नाही. ‘कानडा’ या शब्दाचा अर्थ या अभंगात ‘आपल्याला न समजण्यासारखा, अगम्य, अद्भुत’ असा आहे. तो नाना तर्‍हेची नाटके रचत असतो, त्याची लीला दाखवीत असतो. ती पाहून मन थक्क होऊन जाते. त्याच्या दिव्य तेजाने डोळे दीपतात, त्याचे अवर्णनीय लावण्य पाहून मन मुग्ध होते. अवाक् झाल्यामुळे बोलायला शब्द सापडत नाहीत, पण मनोमनी संवाद होतो. त्याच्या दर्शनाने दिग्मूढ होऊन काही कळेनासे झाले. नमस्कार करण्यास गेले, तर पाऊल सापडत नाही. त्याचे रूप एवढे अमूर्त आहे की, तो आपल्याकडे बघतोय, का पाठमोरा आहे, तेच कळत नाही. असा हा ‘कानडा हो विठ्ठलू’ आहे. शरीरातील इंद्रियांकरवी तो जाणू शकत नाही, पण हृदयाने त्याचा रसपूर्ण अनुभव घेतला, असे त्याचे अवर्णनीय वर्णन ज्ञानोबारायांनी या अभंगात केले आहे.


पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती ।
रत्नकीळ फांकती प्रभा ।
अगणित लावण्य तेजःपुंजाळले ।
न वर्णवे तेथीची शोभा ॥1॥
कानडा हो विठ्ठलु कर्नाटकु ।
तेणें मज लावियला वेधु ।
खोळ बुंथी घेऊनि खुणाची पालवी ।
आळविल्या नेदी सादु ॥2॥


आता केवळ विठ्ठलाचे दर्शन आनंद देत नाही, तर विठ्ठलाचा सहवासही आनंद देतो, असे संत ज्ञानेश्वर अभंगामध्ये म्हणतात. भक्तीची ही उत्कट अवस्था आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. केवळ विठ्ठलाचे रूप पाहून नव्हे, तर त्याच्या नुसत्या अस्तित्वाच्या भावनेने मन पुलकित होते, असे संत ज्ञानेश्वर अभंगामधून म्हणतात...



अवचिता परिमळू,
झुळुकला अळुमाळू ।
मी म्हणु गोपाळू,
आला गे माये ॥1॥
चांचरती चांचरती बाहेरी निघाले।
ठकचि मी ठेलें काय करू ॥2॥
तो सावळा सुंदरू कांसे पितांबरू।
लावण्य मनोहरू देखियेला ॥3॥
बोधुनी ठेलें मन तव जालें आन।
सोकोनी घेतले प्राण माझे गे माये॥4॥
बाप रखुमादेवीवरू विठ्ठल सुखाचा।
तेणें काया मने वाचा वेधियेलें ॥5॥

विठ्ठलाच्या सगुण-निर्गुण वर्णनासोबतच कविवर्य ग. दि. माडगूळकरांनी चित्रपटांसाठी लिहिलेल्या काही गीतांमध्ये संतांच्या रचनांमधला पूर्वापार भाव सुंदररीत्या आणला आहे. सकाळी उठल्यानंतर भूपाळी गाऊन देवाची प्रार्थना करून त्यालाही जागवायचे अशी परंपरा आहे. ‘उठा उठा हो गजमुख’ यासारख्या पारंपरिक रचना आणि ‘घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला’ यासारख्या भूपाळ्या प्रसिद्ध आहेत. विठ्ठलाला जाग आणण्यासाठी गदिमांनी लिहिलेली भूपाळी खाली दिली आहे-


प्रभातसमयो पातला,
आता जाग बा विठ्ठला॥ध्रु.॥
दारी तव नामाचा चालला गजरू।
देव-देवांगना गाती नारद-तुंबरू।
दिंड्या-पताकांचा मेळा,
तुझिया अंगणि थाटला॥1॥


पी. सावळाराम यांची शब्दरचना यांच्या संगमामधून अत्यंत अवीट अशा गोडीची अनेक भावगीते मराठी भाषिक रसिकांना मिळाली आहेत. त्यात काही गीते विठ्ठलरखुमाईंच्या संबंधी आहेत, पण त्यात सामाजिक आशय, मानवता वगैरे विषयांना वाचा फोडली आहे. परंपरागत समजुतीप्रमाणे टाळ कुटून भजन न करता आणि देवदर्शनासाठी पंढरीची वारी न करता, आपले रोजचे जीवन मंगलमय ठेवल्यानेसुद्धा देव प्रसन्न होतो असा भाव त्यांनी आपल्या गाण्यातून व्यक्त केला आहे. हीच संकल्पना आद्य शंकराचार्यांनी मानसपूजेमधून मांडली होती-

विठ्ठल तो आला, आला,
मला भेटण्याला।
मला भेटण्याला आला,
मला भेटण्याला ॥ध्रु.॥
तुळशी-माळ घालुनि गळा,
कधी नाही कुटले टाळ।
पंढरीला नाही गेले,चुकूनिया एक वेळ।
देव्हार्‍यात माझे देव,
ज्यांनी केला प्रतिपाळ।
चरणांची त्यांच्या धूळ,
रोज लावी कपाळाला ॥1॥
सत्य वाच माझी होती,
वाचली न गाथा पोथी।
घाली पाणी तुळशीला,
आगळीच माझी भक्ती।
शिकवण मनाची ती,
बंधुभाव सर्वांभूती।
विसरून धर्म जाती,
देई घास भुकेल्याला॥2॥


वेगवेगळ्या अभंगरचना किंवा गीतांमधून विठ्ठलरूप साकारण्याचा संत-कवींनी प्रयत्न केला आहे. प्रत्येकाला विठ्ठल वेगवेगळा भासतो. आपल्या शेतामध्ये, आपल्या कुंभकामामध्ये, आपल्या संसारामध्ये प्रत्येक जळीस्थळी विठ्ठल दिसतो. ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’। म्हणून आपलं काम हाच आपला विठ्ठल सावतामाळी मानतात. विठ्ठल ही देवता एखाद्या चौकटीत बंदिस्त होणारी, विशिष्ट समाजसंस्थेची नाही. सामान्यातील सामान्य भक्तास, समाजातील प्रत्येक स्तरावरील भक्तास विठ्ठल हा आपलाच वाटतो. तो आपापल्या परीने त्याचे गुणगान गातो. या सर्वांचे सार संत तुकाराम महाराज आपल्या अभंगात मांडतात आणि सर्वांचे विठूमाऊलीशी तादात्म्य साधतात....


बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल
करावा विठ्ठल जीवभाव....!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.