भाजपचा विजयी रथ मुंबईतही कायम राहणार !

महापालिका निवडणुकीत मविआच्या धुव्वा उडवणार - राजेश शिरवडकर

    03-Nov-2022   
Total Views |
 

Rajesh Shirwadkar - My Disctrict My Vision
 
 
माझा जिल्हा माझे व्हिजन
 
 
मुंबई : 'राज्यात झालेल्या सत्तांतरामुळे मुंबईसह महाराष्ट्रात भाजपाची ताकद आणखीन वाढली आहे. पूर्वीपासून भाजपने मुंबईत आपले संघटन सक्षम करण्यावर भर दिला असून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वामुळे त्यात आणखी उत्साह आणि ऊर्जा फुंकली आहे. ठाकरे गट आणि त्यांच्यासोबत क्षीण झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी मुंबई महापालिकेवर भाजपचा विजयी झेंडा रोवला जाणार हे निश्चित आहे. त्यामुळे येत्या काळात होऊ घातलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपचा विजयी रथ कायम राहील,' असा विश्वास दक्षिण मध्य मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी व्यक्त केला आहे.
 
 
काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाराष्ट्रातील काही नेत्यांचे त्यांच्या जिल्हा आणि मतदारसंघासाठीचे नेमके व्हिजन काय ? हे जाणून घेण्याचा प्रयत्न मुंबई तरुण भारतच्या 'माझा जिल्हा माझे व्हिजन' या विशेष मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. या कार्यक्रमात शिरवडकर यांनी नुकताच 'मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
 
 
भाजपच्या बदलत्या राजकीय शक्तीकडे आणि महाविकास आघाडीच्या आव्हानाकडे कसे बघता ?
 
आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्या प्रमाणे महाविकास आघाडी हा तीन चाकांचा रिक्षा आहे आणि तो केव्हाच कोलमडून पडला आहे, त्यामुळे भाजपासाठी महाविकास आघाडी हे कधी आव्हान नव्हते आणि भविष्यातही नसेल. ठाकरे गटाच्या हातून त्यांचे आमदार निघून गेले, खासदार निघून गेले आणि सत्ताही गेली आहे, त्यामुळे ते केवळ बाष्कळ बडबड करत आहेत. येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात होईल आणि लवकरच निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल अशी अपेक्षा आहे. ठाकरे गट असो वा महाविकास आघाडी आपल्या राजकीय अस्तित्वासाठी ते संघर्ष करत असून भाजपचा विजयी रथ थांबवण्यात ते नक्कीच अपयशी ठरणार यात दुमत असण्याचे कारण नाही.
 
 
दक्षिण मध्य मुंबईत भाजपची राजकीय स्थिती कशी आहे ?
 
मुंबईत जरी महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तरी त्याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही हे निश्चित आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा राजकीयदृष्ट्या अभ्यास केला तर या बाबाजी आपल्या लक्षात येतील. या मतदारसंघातील एकूण ३५ प्रभागांपैकी अर्ध्याहून अधिक प्रभागांमध्ये भाजप सक्षम आहे. ३५ प्रभागांपैकी २२ प्रभागांमध्ये भाजप भक्कमपणे उभा आहे. त्या २२ प्रभागांमधील किमान १८ प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून येतील असा आम्हाला विश्वास आहे. त्याची तर्कशुद्ध आणि सुसंगत अभ्यास आणि आखणी आमच्याकडे तयार आहे. त्याप्रमाणे प्रभाग आणि बूथ पातळीवर भाजपने आपली यंत्रणा कार्यान्वित केलेली असून 'पन्नाप्रमुख' योजनेच्या अंतर्गत भाजपाला सक्षम करण्याच्या आमच्या प्रयत्नांची फलश्रुती होईल, हा आम्हाला विश्वास आहे.
 
 
राज्यात विरोधी पक्षाकडून होणाऱ्या टीकेतून सामाजिक सलोखा बिघडण्याचे प्रयत्न सुरु आहेत असं वाटत का ? भाजप त्यासाठी काय करत आहे ?
 
फडणवीस शिंदे सरकार सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राचे राजकीय वातावरण बिघडेल याची पुरेपूर काळजी विरोधी पक्षाकडून घेतली जात आहे. यापूर्वी महाराष्ट्रात जेव्हा महाविकास आघाडी आणि आघाडीची सरकारे होती, तेव्हा कायदा सुव्यवस्था आणि सामाजिक वातावरण कशाप्रकारे कलुषित व्हायव्हचे याचे दाहक अनुभव महाराष्ट्राने घेतलेले आहेत. सर्वाधिक बॉम्बस्फोट, सर्वाधिक सांप्रदायिक दंगली कुणाच्या राजवटीत घडल्या याचा इतिहास सर्वांना माहिती आहे. पालघर येथील निरपराध साधू हत्याकांडाचा तपास अडीच वर्षे का रखडला याचे उत्तर सामाजिक वातावरण आणि सलोखा बिघडवणाऱ्यानी देणे गरजेचे आहे. भाजप हा वैचारिक सिद्धांत आणि राजकीय प्रगल्भतेने वाटचाल करणारा पक्ष असून राज्याचे सामाजिक, सामाजिक आणि सर्वच बाबतीतील वातावरण संतुलित कसे राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि भविष्यातही राहू हीच आमची शिकवण आहे.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.