‘कूर्म’ रुपाचे पुनरागमन ?

    28-Nov-2022   
Total Views |
turtle



महाराष्ट्रात ‘कूर्म’ नावाने प्रसिद्ध असलेली एक प्रजात म्हणजे ‘लेदरबॅक’ कासव (leatherback turtle). महाराष्ट्राच्या सागरी परिक्षेत्रामधील ‘लेदरबॅक’चा (leatherback turtle) वावर हा संशोधनाचा विषय बनला आहे. जगातील सागरी कासवांमधील सर्वात मोठी असलेली ही प्रजात दोन दशकांच्या विरामानंतर राज्याच्या सागरी परिक्षेत्रामध्ये पुन्हा दिसू लागली आहे. अशा परिस्थितीत कोकण किनारपट्टीवरील या प्रजातीचे अस्तित्व, तिचे भविष्य आणि स्थलांतराविषयी आढावा घेणारा हा लेख... (leatherback turtle)

                                                                 
                                                                 नमस्ते कूर्मरुपाय विष्णवे परमात्मने ॥


कासव, सरडे, साप, मगर, सुसर आणि न्यूझीलंडमध्ये सापडणारा तुआतारा हे सरीसृप वर्गात येतात. त्यामध्ये कासवाचा ’चिलोनिया’ असून त्यांची उत्पत्ती साधारण 20 कोटी वर्षांपूर्वी झाल्याचा अंदाज आहे. कासवांचे वर्गीकरण करताना मुख्यत: त्यांची डोके कवचात घेण्याची पद्धत विचारात घेतली जाते. भारतात जमिनीवरील, गोड्या पाण्यातील आणि सागरी कासवांच्या एकंदर पाच कुळ आणि 31 प्रजाती आहेत. सागरी कासवांचा समावेश यामधील ’डर्मोचिलिडी’ आणि ’चिलोनिडी’ या दोन कुळांत होता. ’डर्मोचिलिडी’ कुळामध्ये कातडी कवचांच्या सागरी कासवाचा समावेश होतो. ’चिलोनिडी’ कुळात कठीण कवच असणार्‍या सागरी कासवांचा समावेश असतो.
 
 
महाराष्ट्रातील सागरी कासवे...
जगभरात एकूण सात प्रजातीची सागरी कासवे आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात पाच कासव प्रजातीच्या अस्तित्वाची नोंद झाली आहे. यामध्ये ’ऑलिव्ह रिडले’, ’ग्रीन सी’, ’हॉक्सबिल’, ’लॉगरहेड’ आणि ’लेदरबॅक’ कासवांचा समावेश आहे. ’डर्मोचिलिडी’ कुळामधील भारतात ’लेदरबॅक’ ही एकमेव प्रजात सापडते. तर ’चिलोनिडी’ या कुळामध्ये भारताच्या किनार्‍यावर आढळणार्‍या ’ऑलिव्ह रिडले’, ’ग्रीन सी’, ’हॉक्सबिल’ आणि ’लॉगर हेड’ या कवचधारी कासवांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील सागरी कासवांच्या बाबतीत फार पूर्वीपासून माहिती उपलब्ध नव्हती. परंतु, 2000 मध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये सूंपर्ण किनार्‍यावर सागरी कासवे तुरळक संख्येने विणीसाठी येत असल्याची नोंद करण्यात आली. या पाहणीत प्रामुख्याने ’ऑलिव्ह रिडले’ कासव विणीसाठी येत असल्याचे आढळून आले. त्याचबरोबर ’ग्रीन सी’ कासवाचीदेखील काही ठराविक किनार्‍यावर विण आढळली. ’हॉक्सबिल’ आणि ’लेदरबॅक’ ही प्रजातीची कासवेदेखील विणीसाठी आल्याची नोंद फारच क्वचित होती. मात्र, आता ’ऑलिव्ह रिडले’ आणि ’ग्रीन सी’ कासवाची विणच राज्याच्या किनारपट्टीवर होते.

’लेदरबॅक’ कासवाविषयी
जगात आढळणार्‍या सागरी कासवांमधील सर्वात मोठे कासव म्हणून ’लेदरबॅक’ला ओळखले जाते. हे कासव सहा फुटांपर्यंत वाढू शकते. त्याचे वजन 300 ते 500 किलोदरम्यान असते. त्याचे कातडी कवच हे काळ्या रंगाचे असून त्यावर रेषा असतात. त्याचे पुढील दोन पर हे त्याच्या शरीराच्या आकारमानापेक्षा मोठे असतात. परांची लांबी आठ फुटांपर्यंत वाढू शकते. जगातील उष्णकटिबंधीय आणि उप-उष्णकटिबंधीय सागरी क्षेत्रामध्ये हे कासव आढळते. समुद्रात साधारणपणे 1200 मीटर खोल डुबकी मारु शकते. ’लेदरबॅक’ हे केवळ जेलीफिशवरच अन्नग्रहण करते. त्यामुळे बर्‍याचदा समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाबरोबर पोहणार्‍या प्लास्टिकच्या पिशव्यांना जेलीफिश समजून ’लेदरबॅक’ कासवे त्यांना खातात. खूप मोठ्या सागरी परिक्षेत्रांमध्ये स्थलांतर करण्यासाठी ही प्रजात ओळखली जाते. ’भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यां’तर्गत प्रथम श्रेणीत या कासवाला संरक्षण मिळाले आहे.

 
 
 
 
महाराष्ट्रातील नोंदी
महाराष्ट्रात ’लेदरबॅक’ कासवाला ’कूर्म’ म्हणून ओळखतात. महाराष्ट्रातील सागरी परिक्षेत्रामध्ये ’लेदरबॅक’ कासवाचा वावर असल्याचा पहिला पुरावा 2019 साली रायगड जिल्ह्यात मिळाला. मच्छीमार विष्णूदास वाघे व सदानंद चोघले यांना किनार्‍यापासून 12 किमी अंतरावर ’लेदरबॅक’ आढळून आले. दुर्दैवाने ते मासेमारीच्या जाळ्यात अडकले होते. दोन्ही मच्छीमारांनी त्याची जाळ्यातून सुटका करुन पुन्हा समुद्रात सोडून दिले. हे कासव साधारण चार फूट लांब होते. महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांनी या सर्व घटनेचे छायाचित्रण केले. त्यानंतर मे, 2021 मध्ये डहाणू आणि मे, 2022 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीत मासेमारीदरम्यान जाळ्यात अडकलेल्या ’लेदरबॅक’ कासवाची सुटका करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या आठवड्यात अर्नाळा येथील मच्छीमारांनी जाळ्यात अडकलेल्या ’लेदरबॅक’ची सुटका केली. त्यामुळे ‘लेदरबॅक’च्या एकूण चार छायाचित्रित नोंदी मिळाल्या आहेत.

 
भरपाई योजनेचे फळ
वन विभागाचा ’कांदळवन कक्ष’ आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या संयुक्त विद्यमाने 21 डिसेंबर, 2018 रोजी मच्छीमारांकरिता भरपाई योजना सुरू करण्यात आली. मासेमारीदरम्यान मच्छीमारांच्या जाळ्यात अनावधानाने ’वन्यजीव संरक्षण कायद्या’ने संरक्षित असलेले व्हेल शार्क, डॉल्फिन, समुद्री कासवांसारखे जीव अडकले जातात. अशा वेळी मच्छीमार या जीवांना जाळे कापून पुन्हा समुद्रात सोडतात. त्यामुळे मच्छीमारांना जाळ्याची नुकसानभरपाई देण्याबरोबरच अधिकाधिक सागरी जीवांना जीवदान देण्यास प्रोत्साहित करण्यासाठी ही भरपाई योजना राबविण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून मच्छीमारांना जाळ्याची भरपाई म्हणून कमाल 25 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छीमारांच्या बोटीचे कागदपत्र तपासल्यानंतर ’कांदळवन कक्षा’च्या ’मँग्रोव्ह फाऊंडेशन’कडून हे अनुदान दिले जाते. या योजनेमुळे पालघर, रायगड आणि सिंधुदुर्गमधीलमच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या ’लेदरबॅक’ कासवांची माहिती मिळाली आणि महाराष्ट्रातील सागरी परिक्षेत्रामध्ये त्यांचा वावर असल्याचे निश्चित झाले. आजवर ’लेदरबॅक’च्या चार नोंदी मिळाल्या असून जाळ्यात अडकलेल्या ’लेदरबॅक’ कासवाला सोडल्याप्रकरणी तीन मच्छीमारांना या योजनेंतर्गत भरपाई मिळाली आहे.



turtle

 
’लेदरबॅक’ आले कुठून ?
’दक्षिण फाऊंडेशन’कडून लिटील अंदमान बेटावर ’लेदरबॅक’ कासवांना ’टॅग’ करण्यात आले होते. त्यांचा भ्रमणमार्ग जाणून घेण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात आला होता. यामाध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार लिटील अंदमान बेटावर अंडी घातल्यानंतर ’लेदरबॅक’च्या काही माद्यांनी ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनार्‍यापर्यंत, तर काही माद्यांनी आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यापर्यंत स्थलांतर केले होते. त्यातील एकही मादी भारताच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात आली नव्हती. त्यामुळे महाराष्ट्रात दिसणारी ’लेदरबॅक’ कासवे ही खाद्याच्या शोधात किंवा समुद्रांतर्गत असणार्‍या प्रवाहांसोबत आली असण्याची शक्यता संशोधक व्यक्त करत आहेत. ’लेदरबॅक’ कासवे ही जेलीफिश खातात. गेल्या काही वर्षांमध्ये राज्याच्या सागरी परिक्षेत्रामध्ये जेलीफिशचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जेलीफिशच्या शोधात ही कासवे राज्याच्या सागरी परिक्षेत्रात आल्याचीही दाट शक्यता आहे.


स्थलांतराचा अभ्यास महत्त्वाचा
महाराष्ट्रातील ‘लेदरबॅक’च्या तीन नोंदी या उन्हाळी हंगामात, तर एक नोंद हिवाळी हंगामाच्या तोंडावर झाली आहे. ही एक महत्त्वपूर्ण बाब असून या नोंदी उत्तर महाराष्ट्रापासून ते अगदी महाराष्ट्र-गोव्याच्या सीमावर्ती सागरी परिक्षेत्रामधूनही झालेल्या आहेत. म्हणजेच ’लेदरबॅक’ कासवाचा महाराष्ट्रातील सागरी परिक्षेत्रामधील वावर हा सर्वत्र दिसत आहेत. अशा परिस्थितीत ही कासवे याठिकाणी खाद्याच्या शोधार्थ आली असण्याची शक्यता आहे. शिवाय ही प्रजात मोठ्या प्रदेशातील स्थलांतरासाठी ओळखली जात असल्याने त्या अनुषंगानेदेखील राज्यात अभ्यास होणे गरजेचा आहे. - हर्षल कर्वे, सागरी जीवशास्त्रज्ञ, मँग्रोव्ह फाऊंडेशन




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.