मुंबई ( Sanjay Raut ): वाचाळवीर म्हणून प्रसिद्ध असलेले खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा कोठडीत रवानगी होण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी राऊत यांना बेळगाव कोर्टानं समन्स बजावले आहेत. ३० मार्च २०१८ मध्ये बेळगावात भाषण केल्याप्रकरणी राऊतांना हे समन्स बजावण्यात आले आहे.
गोरेगाव येथील कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात संजय राऊत हे तीन महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात होते. काही दिवसांपूर्वीच राऊत यांची जामिनावर सुटका झाली आहे. मात्र, आता आणखी एका प्रकरणात संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ३० मार्च २०१८ रोजी बेळगावात प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव कोर्टानं राऊतांना समन्स बजावले आहे.
संजय राऊत यांच्या बेलगाम वक्तव्यांमुळेच शिवसेना आणि भाजप यांची तीन दशकांहून अधिक जुनी युती तुटली असे बोलले जाते. इतकेच नव्हे तर राऊतांच्या जहरी टिकेने शिवसेनेची दोन शकले पडली आणि उद्धव ठाकरे यांची दयनीय अवस्था झाली, असा दावा विरोधकांकडून केला जातो. आपल्या जिभेवर ताबा नसणाऱ्या संजय राऊतांमुळे शिवसेनेची वाताहत झाली. आता त्यांचे वक्तव्य त्यांना भोवणार का आणि त्यांनी पुन्हा एकदा तुरुंगाची हवा खावी लागणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.