ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या मुलीला 'भारत' खूप आवडतो; म्हणाली...

    26-Nov-2022
Total Views |

Anushka Sunak
 
 
मुंबई : भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद स्वीकारल्यावर भारतीयांनी जल्लोष केला. सुनक यांचा जन्म सातासमुद्रापार इंग्लंडमध्ये झालेला असला तरी त्यांची नाळ भारतीय संस्कृतीशी जुळलेली आहे. आपले हिंदुपण त्यांनी कधीही लपवलेले नाही. ब्रिटनमध्ये ते नित्य नियमाने मंदिरात जातात. गायीला चारा खाऊ घालतात. नुकतेच सुनक यांची मुलगी अनुष्का सुनक हिने आपल्याला भारतात यायला आवडते कारण तिथे घर,कुटुंब आणि संस्कृतीचा सहवास लाभतो असे भारताबद्दल गौरवपर शब्द काढले आहेत.
 
वास्तविक, अनुष्का सुनक लंडनमध्ये आयोजित 'कुचिपुडी डान्स फेस्टिव्हल-रंग २०२२'मध्ये परफॉर्म करण्यासाठी आली होती. या महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध कुचीपुडी नृत्यांगना अरुणिमा कुमार यांनी केले आहे. त्यात, ४ ते ८५ वयोगटातील जगभरातील १०० कलाकार एकत्र आले. भारत@७५ या नावाने त्याचे आयोजन करण्यात आले होते.
 
या कार्यक्रमादरम्यान, अनुष्का सुनकने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, “मला कुचीपुडी आणि नृत्य आवडते कारण जेव्हा तुम्ही नृत्य करता तेव्हा तुमच्या सर्व चिंता आणि तणाव दूर होतात आणि तुम्ही तुमच्या मित्रांसोबत मजा करू शकता. मला स्टेजवर यायला आवडते."
 
भारताबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी जिथून आले आहे तो भारत हा देश आहे. हे असे ठिकाण आहे जिथे कुटुंब, घर आणि संस्कृती एकत्र येतात. मला दरवर्षी तिथे जायला आवडते." अनुष्काची आई अक्षता मूर्ती, तिचे आजी-आजोबा आणि शाळेतील शिक्षकही या कार्यक्रमाचे उपस्थित होते. तर, याबद्दल बोलताना अनुष्का म्हणाली, “शाळेतील शिक्षक इथे येण्याने मी खूप घाबरले आहे.”
 
कार्यक्रमात परफॉर्म करणाऱ्या आणि कार्यक्रमाच्या आयोजक अरुणिमा कुमार म्हणाल्या, “रंग २०२२ चा उद्देश विविध वयोगटातील आणि क्षमता असलेल्या कलाकारांना दाखवणे हा आहे. मला वाटते की आपल्यापैकी अनेकांना परफॉर्म करण्याची संधी मिळते, पण अनेक मुले, वृद्ध, विशेष क्षमता असलेले लोक आहेत ज्यांना व्यासपीठ मिळत नाही. त्यामुळे 'रंग २०२२' कुचीपुडीचे रंग आणि भारतीय नृत्याचे रंग साजरे करते.