नवी दिल्ली:भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी युएईचे परराष्ट्रमंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांची दिल्लीत भेट घेतली. यादरम्यान, भारत आणि युएई त्यांच्या सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीला पुढे नेतील, असे जयशंकर यांनी ट्विट केले. युएईचे महामहिम शेख अब्दुल बिन झायेद यांचे भारतात स्वागत करणे, ही नेहमीच आनंदाची बाब आहे.
या वर्षातील आमची ही चौथी संरचित बैठक आहे. आम्ही आमची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पुढे नेऊ, असे जयशंकर यांनी सांगितले. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, युएईचे परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य मंत्री महामहिम शेख अब्दुल्ला भारताला अधिकृत भेट देत आहेत.
झायेद यांच्यासोबत एक उच्चस्तरीय शिष्टमंडळही गेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, त्यांचा हा दौरा दोन्ही देशांमधील द्विपक्षीय आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्द्यांवर नियमित सल्लामसलत करण्याचा एक भाग असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 जून रोजी युएईला भेट दिली. तेव्हाच त्यांची भेट शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी झाली. तसेच जयशंकर यांनी झायेद यांच्यासोबत तिसर्या धोरणात्मक संवादाचे सह-अध्यक्ष म्हणून युएईला भेट दिली होती.