राऊत बाहेर आले पण 'या' नेत्याच्या अडचणी वाढल्या!

    10-Nov-2022
Total Views |

राऊत
 
 
 
मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अनिल परब यांना दापोली पोलीस समन्स बजावणार असल्याची माहिती समोर आली आहे. साई रिसाॅर्ट प्रकरणात अनिल परब यांच्यासह 3 जणांना समन्स बजावले जाणार आहे. दापोली पोलिसांनी शिवसेना नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तक्रारदार भाजप प्रदेश उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनाही बोलावले आहे. दापोलीतील अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबतही दापोली पोलीस सोमय्या यांचा जबाब नोंदवणार आहेत. त्यामुळे अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्टवर कारवाई करण्याची किरीट सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरण विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे केंद्रीय पर्यावरण विभागाने दापोली सत्र न्यायालयात खटला दाखल केला आहे. दापोली सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर दापोली पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनिल परब व अन्य दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 
 
याप्रकरणी न्यायालयाने अनिल परब यांना बुधवारी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले होते, मात्र अनिल परब न्यायालयात हजर झाले नाहीत. या कारणास्तव दापोली न्यायालयाने याप्रकरणी अनिल परब यांना 14 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्याने तपास तीव्र केला असून आज अनिल परब यांच्यासह चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.