चीन आणि कोरोना हे जणू समानार्थी शब्दच. कोरोनाच्या उगमस्थळापासून ते त्याच्या विविध ‘व्हेरिएंट्स’पर्यंत चीन ही कोरोनाची राजधानी म्हणून आजही ओळखली जाते. 2019 पासून सुरू झालेली कोरोनाची लाट जगभरातून ओसरली असली तरी चीनमध्ये अद्याप या महामारीने जनतेचा पिच्छा सोडलेला नाही. त्यातच चीन सरकारच्या ‘झिरो कोविड’ धोरणामुळे तेथील नागरिक आधीच संतप्त आहेत. कारण, शहरात काही मूठभर कोरोनाचे रुग्ण आढळले तरी अख्खे शहर ‘लॉकडाऊन’ होते. त्यामुळे नाहक शहरवासीयांना ‘लॉकडाऊन’च्या निर्बंधकळा सोसाव्या लागतात. त्यामुळे यापूर्वीही अनेकदा तेथील समाजमाध्यमांतून चीन सरकारविरोधी सूरही उमटले.
एवढेच नाही,तर या निर्बंधांविरोधी घराच्या खिडक्यांमधून ताट-थाळी वाजवण्यापासून ते मोबाईलचे टॉर्च पेटवून निषेधाचे सर्व मार्गही चोखाळले गेले. पण, चीनमध्ये जनमताला काय आणि किती किंमत आहे, हे वेगळे सांगायला नकोच. त्यातच सरकारला विरोध केला की, साहजिकच संबंधित व्यक्ती रातोरात कुठे गायब केले जाईल, त्याचाही नेम नाही. समाजमाध्यमांवरही चिनी सरकारचे तितकेच काटेकोर लक्ष. त्यामुळे तिथेही फार विरोध केला तर तुरुंगात रवानगी ठरलेली. आता जिथे कम्युनिस्ट पार्टीच्या आणि देशाच्या माजी अध्यक्षांना अपमानास्पदरित्या भर सभेतून हाकलले जाते, तिथे सर्वसामान्यांची तर काय गत म्हणा! म्हणूनच चिनी सोशल मीडिया कलाकारांनी आता एक नवीन शक्कल लढवलेली दिसते.
मिथुन चक्रवर्ती यांच्या 1982 साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटातील ‘जिम्मी जिम्मी’ हे गीत सध्या काही चिनी सोशल मीडिया साईट्सवर चांगलेच ‘व्हायरल’ झाले आहे. आता प्रथमदर्शनी हाच प्रश्न पडेल की, या गाण्याचा आणि चीनचा संबंध तरी काय? तर बप्पीदांनी संगीतबद्ध केलेले आणि पार्वती खान यांनी गायलेले हे गीत चिनी सरकार विरोधात अस्त्र म्हणून सध्या वापरले जात आहे. त्याचे कारण म्हणजे या गाण्याचे बोल. ‘जिम्मी जिम्मी’ असे हिंदीत, तर चीनच्या मंडारिन भाषेत ‘जि मी, जि मी’चा अर्थ होतो, ‘मला भात द्या, मला भात द्या.’ त्यामुळे या गाण्यावर अनेक चिनी नागरिकांनी रिकामी भांडी दाखवत, ‘लॉकडाऊन’मुळे त्यांना अन्नधान्य उपलब्ध होत नसल्याचेच सरकारला सांगण्याचा प्रयत्न केला.
म्हणजेच इंग्रजीत त्याचा अर्थ असा की - गिव मी राईस? हू कॅन गिव मी राईस? आय रन आऊट ऑफ इट। नो नीड टू गिव मच राईस, माय फैमिली हैज ओनली ए फ्यू मेंबर्स। त्यामुळे या गाण्याच्या माध्यमातून चिनी नागरिक आपल्याच सरकारला मदतीची याचना करण्याबरोबरच, सरकारला असे कडक निर्बंध मागे घेण्याचे आवाहन करताना दिसतात. चिनी युझर्सचे असे हजारो व्हिडिओ सध्या ‘टिकटॉक’सारखी चिनी सोशल मीडिया अॅप असलेल्या ‘डॉयिन’वर प्रचंड ‘व्हायरल’ झाले असून अद्याप तरी तेथील सरकारने त्यावर बंदी घातलेली दिसत नाही. कारण, हे व्हिडिओ प्रत्यक्ष बघितल्यावर त्यातील शब्द किंवा कृती या थेट सरकारविरोधी निदर्शनांच्या नसल्यामुळे त्यावर अजून तरी चिनी सरकारची वक्रदृष्टी पडलेली दिसत नाही. पण, आता हे किती दिवस चालणार तेही पाहावे लागेल.
यानिमित्ताने का होईना, चीनमधील नागरिक आपल्या असंतोषाला अशा हास्यगीताच्या माध्यमातून वाट मोकळी करून देत आहेत. एवढेच नाही, तर चीनच्या ‘लॉकडाऊन’ घोषित केलेल्या झेंगझोऊ या प्रांतातील ‘आयफोन’ निर्मिती करणार्या फॅक्टरीमधूनही तेथील कामगारांनी पलायन केल्याचे वृत्त आहे. कारण, काय तर या संपूर्ण भागात सरकारने लादलेले ‘लॉकडाऊन’चे अमानुष नियम. कारण, ‘लॉकडाऊन’मुळे ‘अॅपल’च्या फोनचे उत्पादन घेणार्या ‘फॉक्सकॉन’ कंपनीने सगळ्या कर्मचार्यांना कंपनीच्या परिसरातच राहणे बंधनकारक केले. त्यामुळे जवळपास दोन लाखांच्या आसपास कर्मचार्यांना अगदी दाटीवाटीने गुराढोरांप्रमाणे‘डॉर्मेटरीजझ’ शेअर कराव्या लागत होत्या. परिणामी, काही कर्मचार्यांनी कंपनीतून 30-40 किमीची पायपीट करून पळून जाणेच पसंत केले. त्यामुळे एकूणच काय तर कोरोनाचा निर्माता चीनच आज त्यानेच फेकलेल्या या महामारीच्या महाभयंकर जाळ्यात पुरता गुरफटला आहे. त्याचे सामाजिक आणि आर्थिक परिणामही चीनला भोगावे लागत असून चिनी नागरिकांनी भारतीय गीताच्या आधारावर केलेले हे अजब आंदोलनही त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.