मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीची दारे उघडणार

लातुरात केंद्राचा ६० हजार कोटींचा ‘बम्पर प्रोजेक्ट’ ; ५० हजार रोजगार निर्मिती होणार

    05-Oct-2022   
Total Views |
 
MarathwadaCoachFactoryLatur03
 
 
ओंकार देशमुख
 
 
मुंबई : केंद्र सरकारच्या एका प्रकल्पामुळे मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीची दारे उघडणार हे निश्चित झाले आहे (लातूर कोच फॅक्टरी). देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण भागांच्या विकासाबाबत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी प्रत्यक्षात होताना दिसत आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर निजामशाहीच्या जोखडातून मुक्त झालेल्या आणि नैसर्गिक विषमतेमुळे कायमच आर्थिक-औद्योगिकदृष्ट्या मागास राहिलेल्या मराठवाड्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (लातूर कोच फॅक्टरी)‘बम्पर गिफ्ट’ दिले आहे. भारताची पहिली ’हायस्पीड’ ट्रेन असलेल्या ‘वंदे भारत’च्या निर्मितीचे ठिकाण निश्चित झाले असून त्याचा कारखाना मराठवाड्यातील लातूर येथे असणार आहे.
 
 
भारत सरकारच्या रेल्वे बोगी बनवण्याचा कारखाना लातूर येथे असून आता लातूरमध्ये ‘वंदे भारत’ या ’हायस्पीड ट्रेन’चीदेखील निर्मिती होणार आहे. केंद्र सरकारच्या या मोठ्या प्रकल्पामुळे औद्योगिक स्तरावर बंद असलेले मराठवाड्याचे दार आता उघडले जात असून मराठवाड्याच्या औद्योगिक क्रांतीची ही सुरुवात ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
 
 
६० हजार कोटींचा ‘बम्पर प्रोजेक्ट’
 
केंद्रीय रेल्वे विभागाच्यावतीने लातूर येथे उभारण्यात आलेल्या बोगीनिर्मिती प्रकल्पाची किंमत हजारो कोटींच्या घरात आहे. या प्रकल्पातील कामांसाठीच्या सुरुवातीच्या निविदा काढण्यात आल्या असून पहिल्या निविदेची किंमत 30 हजार कोटींच्या घरात आहे. तसेच याचा पुढील टप्पा येत्या काही काळात सुरु होणे अपेक्षित असून त्याचीही किंमत 30 हजार कोटींच्यावर असू शकते. हा प्रकल्प लातूरला आणण्यासाठी तत्कालीन कार्यकाळात प्रयत्न केल्याची माहिती तत्कालीन पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली आहे. ‘वंदे भारत’या ‘हायस्पीड ट्रेन’च्या बोगी बनवण्याचा हा पहिला कारखाना लातूरला बनवण्यामुळे मराठवाड्यासोबतच इतर अनेक भागांनाही याचा फायदा होऊ शकतो.
 
 
अन् विदेशात होऊ शकते निर्यात
 
भारत सरकार काही रेल्वे बोगींची आयात परदेशातून करत असते. आजही काही प्रमाणात ही प्रक्रिया सुरु आहे. मात्र, परदेशातून रेल्वे बोगी आयात करण्यासाठी येणारा खर्च आणि स्वदेशात बोगी बनवण्यात येणारा खर्च यात मोठा फरक असून त्यातून बराचसा पैसा शिल्लक राहू शकतो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. आतापर्यंत भारत परदेशातून रेल्वे बोगींची आयात करत होता, मात्र आता भारतातच अशाप्रकारच्या प्रकल्पांची निर्मिती करण्यात येत असल्यामुळे निर्मिती खर्चात होणारी घट आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. केवळ भारतात होणारी निर्मितीच नाही तर त्यासोबतच येत्या काळात परदेशातूनही अशा प्रकारच्या बोगींची मागणी भारताकडे होऊ शकते. त्यामुळे भविष्यात विदेशातही भारतीय बनावटीच्या बोगींची निर्यात होऊ शकते.
 
 
संपूर्ण श्रेय मोदी अन् फडणवीसांचेच!
 
वर्ष 2017 च्या अखेरीस बोगी कारखान्याची घोषणा केंद्र सरकारकडून झाल्यानंतर हा प्रकल्प लातूरला व्हावा, असा आग्रह मी पालकमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धरला. त्यांनीही मराठवाड्याचा विकास केंद्रस्थानी ठेवत यावर तत्काळ होकार देत याबाबत केंद्राला शिफारस केली आणि अखेरीस हा प्रकल्प मराठवाड्यात अवतरला. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील जवळपास 50 हजार व्यक्तींना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होणार असून हजारो कोटींची उलाढाल या माध्यमातून होणार आहे. मराठवाड्याचा कायापालट करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प लातूर येथे उभा करण्यात आणि त्यातून मराठवाड्याच्या बदलणार्‍या उज्ज्वल भवितव्याचे संपूर्ण श्रेय हे निर्विवादपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे.
 
- आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी पालकमंत्री, लातूर
 
 
मराठवाड्यासाठी रोजगार निर्मितीचा महाकुंभ!
 
लातूर येथे होत असलेल्या रेल्वे बोगीनिर्मिती प्रकल्पाच्या तीन फेजच्या माध्यमातून प्रत्यक्ष 15 हजार आणि अप्रत्यक्ष स्वरूपात किमान 35 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. अर्थार्जनासाठी महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये जाणार्‍या मराठवाड्यातील सुपुत्रांसाठीदेखील ही एक सुवर्णसंधी असणार आहे. काही काळात हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा असून एक उद्योजक म्हणून अशा प्रकारचा प्रकल्प मराठवाड्यात येण्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो आहे. मराठवाड्याचे औद्योगिक मागासलेपण या प्रकल्पामुळे दूर होणार असून आर्थिक सुबत्तेची कवाडे खुली होणार आहेत. खर्‍या अर्थाने हा प्रकल्प मराठवाड्यासाठी रोजगार निर्मितीचा महाकुंभ ठरेल, यात शंकाच नाही.
 
- शामसुंदर मानधना, उद्योजक तथा पदाधिकारी, लघु उद्योग भारती, लातूर
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.