मुंबई : 'बदलत्या राजकारणामुळे वरळीत आदित्य ठाकरेंचा पराभव होणार हे निश्चित आहे. अडीच वर्षे प्रश्न सोडवण्यासाठी ठाकरेंनी आम्हाला भेटीची साधी वेळही दिली नाही. मात्र, एकनाथ शिंदे यांच्याकडे आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी अवघ्या आठ दिवसांत या प्रश्नी सकारात्मक भूमिका घेतली आहे. अडीच वर्षे सतत आमच्याकडे दुर्लक्ष आणि अन्याय करणाऱ्या आदित्य ठाकरेंना धडा शिकवण्यासाठी आणि आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही शिंदे गटात प्रवेश केला असून येत्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंचा पराभव होणार हे निश्चित आहे,' असा दावा वरळीतील स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवानी दिला आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर त्यांनी 'मुंबई तरुण भारत'शी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
आम्ही मागील अडीच वर्षे सातत्याने स्थानिक आमदार आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अपेक्षेने पाहत होतो. कोस्टल रोडसह विविध मुद्द्यांवर आम्ही स्थानिक आमदार म्हणून त्यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांनी आमच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष केले, अशी व्यथा वरळीतील कोळी बांधवांनी व्यक्त केली आहे. तसेच स्थानिकांच्या प्रश्नांना सातत्याने पाठ दाखवणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीकरांमध्ये रोष निर्माण झाला असून त्याची प्रचिती ठाकरे गटाला येत्या काही दिवसांत येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री स्वतः वरळीत येणार !
ज्या कोस्टल रोडच्या प्रश्नावर आम्ही आदित्य ठाकरेंना निवेदने देत मागण्या करत होतो, त्यावर मुख्यमंत्र्यांनी आठ दिवसांत कारवाईचे निर्देश देण्याची भूमिका घेतली आहे. आदित्य ठाकरेंनी अडीच वर्षांच्या कार्यकाळात केवळ एक बैठक आणि एक व्हिडीओ माध्यमातून झालेला संवाद वगळता आमच्याशी साधा संपर्कही केला नाही. स्थानिक आमदार म्हणून त्यांनी कोळी बांधवांच्या बंदरावर येऊन प्रत्यक्षात परिस्थितीची पाहणी करावी अशी मागणी आम्ही केली होती. पण, आदित्य ठाकरेंनी त्यावर साफ दुर्लक्ष करत एकदाही बंदरावर येण्याचे कष्ट घेतले नाहीत. उलटपक्षी कालच्या पक्षप्रवेशाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः मी वरळीत येणार असे आम्हाला आश्वस्त केले आहे. त्यामुळे केवळ आणि केवळ आमच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्यामुळेच आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे,' अशी भूमिका स्थानिक मच्छिमार आणि कोळी बांधवांनी मांडली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.