हिंदू समाजाच्या विरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये खंड पडला असल्याचे दिसून येत नाही. बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदू समाजाकडून दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. पण, अशा कार्यक्रमात विघ्न आणण्याचे प्रकार धर्मांध मुस्लिमांकडून सातत्याने केले जात आहेत.
बांगलादेशमध्ये राहणार्या हिंदू समाजास संरक्षण दिले जाईल, असे आश्वासन शेख हसीना सरकारने दिले असले तरी प्रत्यक्ष स्थिती याच्या अगदी उलट असल्याचे गेल्या काही काळातील विविध घडामोडींवरून दिसून येत आहे. हिंदू समाजाच्या विरुद्ध सुरू असलेल्या हिंसाचारामध्ये खंड पडला असल्याचे दिसून येत नाही. बांगलादेशमध्ये असलेल्या हिंदू समाजाकडून दुर्गापूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो. पण, अशा कार्यक्रमात विघ्न आणण्याचे प्रकार धर्मांध मुस्लिमांकडून सातत्याने केले जात आहेत.
दि. 2 ऑक्टोबर या दिवशी बांगलादेशमधील एका दुर्गापूजा मंडपामध्ये कुराणाची प्रत ठेवण्याचा प्रयत्न करणार्या एका व्यक्तीस अटक करण्यात आली. गेल्या वर्षीही अशाच घटना घडल्या होत्या. दुर्गापूजेच्या दरम्यान धर्मांध मुस्लिमांनी अनेक मंडपांवर हल्ले केले होते. त्या मंडपात असलेल्या मूर्तीची विटंबना केली होती. धर्मांधांनी केलेल्या हिंसक घटनांमध्ये गुंडगिरी, हत्या, बलात्कार आणि हिंदूंच्या मंदिरांवर हल्ले अशा घटनांचा समावेश होता.
दि. 13 ऑक्टोबर, 1921 या दिवशी इकबाल हुसेन याच्या नेतृत्वाखाली काही समाजकंटक कोमिला जिल्ह्यातील नानौर दिगीर पार दुर्गा मंदिरात घुसले होते. त्यावेळी या गुंडांनी मंदिरातील हनुमानाच्या मूर्तीच्या पायाशी कुराणाची प्रत ठेवली होती.
समाजमाध्यमांवरून या घटनेची माहिती इतरत्र पसरताच समाजकंटकांनी विविध हिंदू स्थळांकडे आपला मोर्चा वळविला. अनेक धार्मिक स्थळांची विटंबना त्या समाजकंटकांनी केली.
मानवी हक्कांसंदर्भात कार्य करणार्या एका संस्थेच्या माहितीनुसार, गेल्या नऊ वर्षांमध्ये बांगलादेशात 3 हजार, 679 हिंदूंवर हल्ले करण्यात आले. त्यातील 1 हजार, 559 हिंदूंची घरे उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदू मंदिरांमधील 1 हजार, 678 मूर्तीची विटंबना करण्यात आली. 442 हिंदू व्यापार्यांच्या आस्थापनांचे नुकसान करण्यात आले. या सर्व हिंसाचारात 862 हिंदू गंभीर जखमी झाले. अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली. धर्मांधांच्या या हिंसाचारामुळे हजारो हिंदू आपले घरदार सोडून निघून गेले. नऊ हजार हिंदूंना देश सोडून जावे लागले. यंदाच्या वर्षी 11 सप्टेंबर या दिवशी हिंदू देवतांची विटंबना करण्यात आल्याचे वृत्त ‘ढाका ट्रिब्यून’ या वृत्तपत्राने दिले होते.
बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर दि. 1 जानेवारी ते दि. 30 जून या दरम्यान जे हल्ले झाले, त्या हल्ल्यांमध्ये 79 हिंदूंना आपले प्राण गमवावे लागले. ‘बांगलादेश जातीय हिंदू महाज्योत’ या संघटनेने ही माहिती दिली आहे. या संघटनेचे सरचिटणीस गोविंद चंद्र प्रामाणिक यांनी जी माहिती दिली, त्यानुसार, 620 हिंदूंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 145 जणांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला आणि अशा हल्ल्यांमध्ये 173 हिंदू जखमी झाले. 32 हिंदू अद्याप बेपत्ता आहेत. याच कालावधीत हिंदू समाजाच्या 26 कोटी रुपयांच्या मालमत्तेची लूटमार करण्यात आली, अशी माहितीही त्यांनी दिली.
बांगलादेशमधील हिंदू समाज किती दडपणाखाली त्या देशात वास्तव्य करीत आहे, त्याची कल्पना अशा घटनांवरून येईल. धर्मांध मुस्लिमांचे हल्ले सुरू आहेतच. तसेच हिंदूंना धमकावून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्नही होत आहेत. हिंदू समाजावर हल्ले करणार्यांविरुद्ध कठोर कारवाईचे आश्वासन शेख हसीना यांनी दिले असले तरी प्रत्यक्ष स्थिती किती भयानक आहे, याची कल्पना यावरून यावी.
डाव्यांकडून शंकराचार्यांच्या पुतळ्याचा अवमान
केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ आद्य शंकराचार्यांचे जन्मस्थान असलेल्या कालडी येथे, जे श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठामध्ये असलेल्या आद्य शंकराचार्यांच्या पुतळ्याचा डाव्या विचारसरणीच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांकडून अवमान करण्याचा प्रकार अलीकडेच घडला. या विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी असलेल्या पुतळ्याच्या सभोवती बॅनर्स, पोस्टर्स लावण्यात आली. तसेच, मुख्य प्रवेशद्वारही अडविण्यात आले. आद्य शंकराचार्य यांचा पुतळा या डाव्या विचारसरणीच्या समर्थकांनी ओलीस ठेवल्यासारखी स्थिती होती. राज्यपाल हे विद्यापीठांचे कुलपती असल्याने त्यांच्या निषेधार्थ हे निदर्शन योजण्यात आले होते. डाव्या समर्थकांकडून जी निदर्शने योजण्यात आली होती, त्यास विद्यापीठाच्या रजिस्ट्रारनेही अनुमती दिली होती. या निदर्शनासाठी विद्यापीठ परिसरात झेंडे, फलक, बॅनर्स लावण्यात आली होती. प्रत्यक्षात विद्यापीठ आवारात अशा सर्व गोष्टींना बंदी असतानाही त्यास न जुमानता डाव्या समर्थकांनी ही मनमानी केली होती. केरळमध्ये डाव्यांचेच सरकार असल्याने या निदर्शनांना सरकारची मूकसंमती होती, हे उघडच आहे.
शंकराचार्य संस्कृत विद्यापीठ शिक्षक संघटनेचे सरचिटणीस संगमेश्वरम यांनी रजिस्ट्रारकडे अनुमतीसाठी अर्ज केला होता आणि रजिस्ट्रारने त्याच दिवशी अनुमतीही दिली. आद्य शंकराचार्य यांचा पुतळा डाव्या आंदोलकांनी फलक, बॅनर्स आदींनी झाकून टाकल्याने या प्रकरणी राज्यपालांनी हस्तक्षेप करावा आणि पुतळ्याचा अवमान करणार्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. डाव्या पक्षांच्या समर्थकांनी विद्यापीठात जो काही गोंधळ घातला, त्याबद्दल स्वतःला‘पुरोगामी’ म्हणविणारी मंडळी मूग गिळून गप्प आहेत. एरवी लहानसहान घटनेबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणार्यांनी या घटनेबाबत मौन बाळगणेच पसंत केले आहे. ज्या शंकराचार्यांच्या नावाने कालडी येथे संस्कृत विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठात त्यांच्याच पुतळ्याचा अवमान डाव्या विचारसरणीच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून झाला आहे. मात्र, डाव्या आघाडीचे सरकार डोळ्यांवर पट्टी ओढून गप्प आहे!
दलाई लामा यांची स्तुती केल्याबद्दलपाच जणांना चीनने ताब्यात घेतले
तिबेटी जनतेचे नेते दलाई लामा यांची स्तुती करणारे गीत गायल्याबद्दल स्थानिक चिनी प्रशासनाने पाच तिबेटी नागरिकांना ताब्यात घेतल्याची घटना अलीकडेच घडली. हे पाच तिबेटी तरुण संगीताच्या तालावर दलाई लामा यांची स्तुती करणारे गीत गात होते. गोलोग तिबेटी स्वायत्त परिसरात चिनी प्रशासनाने ही कारवाई केली. संगीताच्या कार्यक्रमात हे गीत सादर केले असता चिनी प्रशासनाच्या सेन्सॉर कर्मचार्यांना त्या गीतामध्ये दलाई लामा यांची प्रशंसा करणार्या ओळी आढळल्याने त्या तरुणांना ताब्यात घेण्यात आले. चिनी प्रशासनाने त्यांची दिवसभर कसून चौकशी केल्यानंतर त्यातील चौघांना सोडून दिले. पण, त्यातील एकास आपल्या ताब्यात ठेवले. ताब्यात ठेवण्यात आलेल्या देराब नावाच्या तरुणांकडून, कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र सक्तीने लिहून घेण्यात आले. यापुढे कोणत्याही कार्यक्रमात देराबला सहभागी व्हायचे असल्यास त्याला प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक ठरणार आहे. या घटनेची माहिती कळताच धर्मशालास्थित मानवी हक्कासंदर्भात कार्य करणार्या एका गटाने चिनी प्रशासनाने केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. तसेच, ज्या तरुणास ताब्यात घेण्यात आले आहे, त्याची त्वरित सुटका करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, तिबेटमधील तिबेटी जनतेवर होणार्या अत्याचारांची माहिती चिनी समाजमाध्यमांवरून दिली जात आहे. ‘वीबो’, ‘वुईचॅट’, ‘टिकटॉक’ आणि अन्य ‘डिजिटल’माध्यमांवरून ही माहिती देण्यात आली आहे. या माध्यमांवरून चिनी पोलिसांच्या आक्षेपार्ह वर्तणुकीबद्दल माहिती दिली गेली आहे. चीनने आपल्या विस्तारवादी धोरणानुसार तिबेट तर गिळंकृत केला आहेच, पण तेथे राहत असलेल्या तिबेटी जनतेवर अत्यंत अत्याचार करणे सुरू ठेवले आहे. पण, दलाई लामा यांच्यावर अपार श्रद्धा असलेली तिबेटी जनता तेथे आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अपार प्रयत्न करीत आहे.