कमी वयात विवाह, नंतर मुले होऊनही करिअर करण्याचा विचार मनातून न गेलेल्या आणि आज यशस्वी खाद्यपदार्थ उद्योजिका असलेल्या स्वाती आमकर यांच्याविषयी...
अवघ्या विसाव्या वर्षी विवाहबंधनात अडकून चूल अणि मूल सांभाळत संसारात पाय स्थिरावल्यानंतर स्वतःचा काही व्यवसाय सुरू करण्याच्या प्रेरणेने डोंबिवलीतील स्वाती आमकर हिने ‘फूड इंडस्ट्री’चा मार्ग निवडला. आज अस्मी नारगोलकरसोबत तिने ‘मैत्री केटरर्स’ नावाने स्वत:चं एक अस्तित्व निर्माण केले आहे. जाणून घेऊया स्वातीचा हा प्रवास...
स्वातीचे संपूर्ण बालपण डोंबिवलीत गेले. तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण डोंबिवली पूर्वेच्या शांतीनगर शाळेत झाले. येथील एका स्थानिक ‘प्रिंटिंग प्रेस’मध्ये तिने चार वर्षे नोकरी केली. वयाच्या विसाव्या वर्षी संतोष आमकरसोबत तिचा विवाह झाला. श्रुती अणि स्मित ही दोन अपत्ये झाली. घरात चूल आणि मूल सांभाळत तिचा जीवनक्रम सुरू होता. स्वातीच्या हाताला चव होती. दरवर्षी गणपतीला आणि दिवाळीला ती नेहमी खास पदार्थ तयार करायची.
मुले शाळेत जाऊ लागली, तर आपण कोणत्या तरी क्षेत्रात पुन्हा उतरले पाहिजे, असे तिला नेहमी वाटत असे. अनेकदा तिने ही इच्छा आपल्या नवर्याकडे व्यक्त केली. आपण आपला स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल नसल्याचे कारण बर्याच वेळा तिच्या पतीने तिला दिले. पण मला आता काहीतरी करायचे आहे, या ध्यासातून स्वातीने तिच्या एका मैत्रिणीला पोळी-भाजी केंद्रातील व्यवसायात भागीदारीबाबत विचारणा केली. त्यादरम्यान, अस्मी नारगोलकर हिलाही कोणी सहकारी हवी होती, तर तिनेही होकार दिला. अस्मिचे पती अमित यांनीही स्वातीला प्रोत्साहन दिले. डोंबिवली पूर्वेतील ‘कस्तुरी प्लाझा’समोरील ‘नारायण कृपा इमारती’मध्ये ’मैत्री पोळी-भाजी केंद्र’ आहे.
इथूनच स्वातीच्या करिअरला सुरुवात झाली. घरची जबाबदारी सांभाळून रोज पोळी-भाजी केंद्रात जाऊन काम करायला तिने सुरुवात केली. रोज आठ भाज्या, समोसे, बटाटेवडे, अळूवडी, कोथिंबीरवडी, चपाती इत्यादी सर्व पदार्थ स्वाती ‘मैत्री फूड्स’मध्ये तयार करु लागली. पारंपरिक जेवणासोबत स्वाती आणि अस्मीने तरुणाईला आवडेल, असे पदार्थ ‘मैत्री फूड्स’मध्ये तयार करण्यास सुरुवात केली.
दिवाळीला ‘मैत्री फूड्स’मधील फराळाला मोठी मागणी असते. यावर्षी स्वाती अणि अस्मीने बनवलेला फराळ अबुधाबी, ओमान, दिल्ली, सांगली आणि नागपूर येथेसुद्धा पाठविण्यात आला. या पोळी-भाजी केंद्रात फक्त शाकाहारी पदार्थ मिळत असत, पण काही ग्राहकांच्या मांसाहारी ऑर्डर येऊ लागल्या. त्या पूर्ण करण्यासाठी स्वातीने घरी मांसाहारी डीश बनवायला सुरुवात केली. ‘फिश फ्राय’, ’फिश मसाला’, ‘अंडा करी’, ‘चिकन फ्राय’, ‘मटण मसाला’च्या ‘ऑर्डर’ तिने घरी तयार करून द्यायला सुरुवात केली. मांसाहारी जेवण चविष्ट मिळू लागल्याने अनेक ग्राहकांनी तिला बिर्याणीचीमागणी केली.
‘युट्यूब’वर बिर्याणीची रेसिपी पाहून तिने बिर्याणी बनवायचा प्रयत्न केला. सध्या स्वाती चिकन आणि मटनमधील अनेक प्रकारच्या बिर्याणी बनवते. तिला दर रविवारी एवढ्या ऑर्डर असतात की, पहाटे 4 वाजता तिला कामाला लागावे लागते. तिचे पती संतोष आमकर यांनाही त्यामुळे आवड निर्माण झाली. त्यांनीदेखील केक आणि पेस्ट्री बनवायचा कोर्स केला आहे.
दरम्यान, 2020 मध्ये स्वाती अणि तिचे पती संतोष आणि सासूबाईंना ‘कोविड’ झाला. याही परिस्थितीत न डगमगता तिने रुग्णवाहिकेतून सासूबाईंना रुग्णालयात दाखल केले. ‘कोविड’मधून सहीसलामत आल्यानंतर आपल्या पतीकडून केक बनवायची कला तिने आत्मसात केली. सुरुवातीच्या काळात ओळखीतून तिला ‘ऑर्डर’ मिळू लागल्या. पण नंतर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केकच्या भरपूर ऑर्डर येऊ लागल्या. ‘कोविड’ची परिस्थिती निवळल्यानंतर आता तिने पोळी-भाजी केंद्रावर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे.
रोज पहाटे लवकर उठून कामाला लागायचे. पूर्ण दिवस केंद्रात घालवताना मुलांची आणि सासूबाईंची जबाबदारी पार पाडताना स्वाती कुठेही कमी पडू देत नाही. मुलांचे शाळेतील कार्यक्रम असतात तेव्हा ती आवर्जून उपस्थित राहते. त्यांच्या विविध कार्यक्रमांची तयारी ती आवर्जून स्वतः करते.
स्वातीने या सगळ्या प्रवासात स्वतःचेछंद जपले आहेत. काम करताना तिला मराठी अणि हिंदी गाणी ऐकायची आवड आहे. त्याचबरोबर वाचन करणेही तिला आवडते. ‘छावा’, ‘ययाती’, ‘मृत्युंजय’ या तिच्या आवडत्या कादंबरी आहेत. गणेशोत्सव अणि नवरात्रीमध्ये मिरवणुकीत नाच करायला तिला आवडते. कोणत्याही सणाला स्वत:ची आकर्षक वेशभूषा करणे, हा तिचा आवडता विषय आहे. आयुष्यातील अनेक चढ-उतार अनुभवत स्वातीने आज व्यवसायात स्थैर्य प्राप्त केले आहे. गेल्या तीन वर्षांत स्वातीने ‘मैत्री फूड्स’चे ‘केक झोन’, ‘केटरिंग’ अणि ‘इव्हेंट’ अशी मजल मारली आहे. अर्थात, तिला अस्मीची साथ असल्याचे ती आवर्जून सांगते. भविष्यात आपले स्वतःचे एक हॉटेल सुरू करायची, तिची इच्छा आहे. खवय्यांना आवडेल असे पदार्थ बनवायचे, ‘इंडियन’सोबत मोगलाई अणि चायनीज रेसिपी बनवायचे तिचे स्वप्न आहे.
स्वातीला पुढील कारकिर्दीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.