नाव सार्थ करणाऱ्या ‘प्रतिभा’ताई

    03-Oct-2022   
Total Views |
 
प्रतिभा
 
 
 
 
शारदीय नवरात्रोत्सवात आज सरस्वतीपूजन. सरस्वतीचं एक प्रतिभासंपन्न रूप म्हणजे प्रतिभाताई! ज्यांनी केवळ आध्यात्मिक नव्हे, तर सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे.
 
 
डोंंबिवली ही सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यांसाठी सुपरिचित. या सांस्कृतिकतेचा वारसा जपणार्या प्रतिभावंतांमध्ये प्रतिभाताईंचे नाव आवर्जून घ्यावे लागते. वडील पोस्टात असल्याने सतत होणार्या बदल्यांमुळे प्रतिभाताईंचे शालेय शिक्षण मालवण, राजापूर, फोंडाघाट, कोल्हापूर अशा विविध ठिकाणी झाले. रत्नागिरी येथे त्यांनी कला शाखेतून आपले शिक्षण पूर्ण केले. शाळेपासूनच विविध कला जोपासणार्या प्रतिभाताईंनी लग्नानंतरही त्यात खंड पडू दिला नाही. २०व्या शतकात कोकणासारख्या भागात राहून, शिकून, संसार सांभाळून डोंबिवलीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात ३५ हून अधिक वर्षं प्रतिभा बिवलकर कार्यरत आहेत.
 
 
साधारण ४० वर्षे त्या डोंबिवली येथे वास्तव्य करत आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आणि पेंढारकर महाविद्यालय, डोंबिवली येथे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. या काळात त्यांना अनेक लोकांसमोर आत्मविश्वासाने बोलण्याचा विश्वास निर्माण झाला. डोंबिवलीमधील या वास्तव्यात त्यांना आयुष्याला नवं वळण देणारी अनेक व्यक्तिमत्त्वं भेटली. त्यातील एक श्री श्री भट आणि लक्ष्मीबाई देव, ज्यांनी प्रतिभाताईंना अध्यात्म, ज्योतिष, ज्ञानेश्वरी आणि भगवद्गीता यासंदर्भात दिशा दाखवली.
 
 
प्रतिभाताई श्री श्री भट यांच्याकडे ज्योतिषविद्या शिकल्या. आज २५ वर्षं त्या डोंबिवली येथे ज्योतिषविषयक सल्ला देण्याचे कार्य करत आहेत. लक्ष्मीबाई देव यांच्या मार्गदर्शानामुळे गीता धर्म मंडळ, पुणे यांच्या भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरीच्या त्यांनी परीक्षा दिल्या. त्यांचे या विषयांमधील ज्ञान पाहून गीता धर्म मंडळ, पुणे येथे त्या समीक्षक म्हणूनही कार्यरत आहेत. तसेच दरवर्षी सहा विद्यार्थ्यांना यासंदर्भात मार्गदर्शन करण्याचेही कार्य त्या करतात.
 
 
प्रतिभाताईंचा पुराणसाहित्य, संस्कृत-मराठी साहित्य, संत साहित्य, तसेच लो. टिळक, स्वा. सावरकर यांचा गाढा अभ्यास आहे. या विविध विषयांवर त्यांनी ९०० पेक्षा अधिक लेख विविध मासिके आणि वृत्तपत्रांमध्ये लिहिले आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही १२०० पेक्षा अधिक व्याख्याने त्यांनी दिली आहेत. त्या सांगतात, “१ ऑगस्ट, १९८५ ला मी लो. टिळकांवर प्रथम व्याख्यान दिले. तेव्हापासून ते आतापर्यंत माझा १ ऑगस्ट रोजी व्याख्यानाचा योग कधीही चुकला नाही.”
 
 
प्रतिभाताई केवळ व्याख्यानं आणि लेखनकार्यापर्यंतच थांबल्या नाहीत, तर त्यांनी आपल्या परिसरामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमही राबवले. १९९६ मध्ये स्थापन झालेल्या ‘स्वरुपिणी मंडळा’च्या त्या संस्थापक अध्यक्षा होत्या आणि आता त्या विश्वस्त आहेत. ‘स्वरुपिणी मंडळ’ हे सामाजिक आणि सांस़्कृतिक कार्यक्रमांसाठी सुपरिचित आहे. यामध्ये दरवर्षी कीर्तन महोत्सव, दिवाळी पहाट, व्याख्यानमाला यांचे आयोजन त्या करतातच.
 
 
तसेच, दिवाळीनिमित्त वनवासी स्त्रियांकरिता साडी आणि फराळाचे संकलनही या मंडळातर्फे केले जाते. आज या मंडळाच्या दोन शाखा असून २०० पेक्षा अधिक सभासद स्त्रिया आहेत. याविषयी प्रतिभाताई म्हणतात की, “या मंडळामध्ये केवळ २०० पेक्षा अधिक महिला सदस्य नाहीत, तर २०० कुटुंबं आम्ही एकत्र आहोत. प्रत्येकाला वैयक्तिकदेखील समस्या असतातच. त्यादेखील सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो.” अगदी कोरोनाच्या काळातही मंडळाच्या भगिनींनी इतरांना औषधं पुरवणे, गरजू कुटुंबांना जेवणाचे डबे देणे, भाजी-फळे आणून देणे या माध्यमातून सहकार्य केले. ब्राह्मणसभा, डोंबिवलीच्या सांस़्कृतिक, क्रीडा विभागात कार्य करून त्या २०१३ ते २०१७ या काळात अध्यक्षाही होत्या.
 
 
आता त्या ब्राह्मणसभेच्या विश्वस्त म्हणून काम पाहत आहेत. या संस्थेला मिळणारा निधी सत्कारणी कसा लागेल, यासाठी प्रतिभाताई कायम दक्ष असतात. श्रीगणेश मंदिर, डोंबिवलीच्या त्या सदस्य असून दरवर्षी सप्ताह आणि प्रवचनांचा त्यांना कायम मान मिळतो. वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी आता ज्येष्ठ नागरिक मंडळ, डोंबिवलीचेही सदस्यत्व स्वीकारलेले आहे. तसेच त्या विविध आध्यात्मिक आणि सामाजिक संस्थांच्या सदस्य आहेत.
 
 
अगदी कोरोनाच्या काळातही विविध समस्या असणार्या लोकांना त्यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमातून मार्गदर्शन केले. विविध विषय लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी त्यांनी ‘सकळिक’ हा स्वत:चा युट्यूब चॅनेल सुरू केला. आजवर त्यांनी १०८ व्हिडिओज्च्या माध्यमांतून विविध विषय लोकांपर्यंत पोहोचवले आहेत. तसेच, ‘ग्रीनव्हिल महाराष्ट्र मंडळ, युएसए’मध्ये त्या ‘ऑनलाईन’ माध्यमातून ज्ञानेश्वरीवरती प्रवचने देत आहेत.
 
 
प्रतिभाताईंची ११ पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यात आध्यात्मिक, मनोरंजनात्मक, कथा पुस्तकांचा समावेश आहे. ‘मंत्रोपचार आणि उपासना’ हे त्यांचे विशेष प्रसिद्ध पुस्तक असून त्यांनी नुकतेच ‘साईबाबांचे गोष्टीरूप चरित्र’ हे पुस्तकही प्रकाशित केलेले आहे.
 
 
प्रतिभाताईंना आजवर अनेक पुरस्कार मिळाले. त्यात ‘गीतागौरव पुरस्कार’, ‘समाजसेवा पुरस्कार’, ‘गोमती पुरस्कार’, ‘चतुरंग पुरस्कार’, ‘नवदुर्गा पुरस्कार’ तसेच, अक्कलकोट स्वामी समर्थ मठाद्वारे त्यांना प्रवचनांतून समाजजागृती केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.
 
 
प्रतिभाताई आयुष्यातील आनंदाच्या क्षणाविषयी म्हणतात, “माझा जन्म तत्कालीन रत्नागिरी जिल्ह्यातील आणि आजोळ पण तेथील. २०१५-१६ हे ‘गीतारहस्य’ या ग्रंथाचे शताब्दी वर्षं होते. त्या वर्षी रत्नागिरी येथे टिळकभूमीत झालेल्या ‘गीतारहस्य’ व्याख्यानमालेत, ज्याचे अध्यक्षीय भाषण सदानंद मोरे यांनी आणि समारोप ‘पद्मश्री’ मधु मंगेश कर्णिक यांनी केला होता, त्या कार्यक्रमात मला व्याख्यान करता आले आणि माझा सत्कार हा टिळकपगडी घालून करण्यात आला, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होता.”
 
 
आजही त्यांच्याकडे समस्या घेऊन गेलेली व्यक्ती कधीही निराश होऊन येत नाही, हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्यं. दासबोधातील ‘आधी प्रपंच करावा नेटका। मग घ्यावे परमार्थ विवेका।’ या उक्तीनुसार प्रतिभाताईंनी स्वत:चा संसार नेटका करून, तो सांभाळून सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात आपले योगदान दिले. नेहमी नाव आणि व्यक्ती यात विरोधाभास आढळतो, पण आई-वडिलांनी ठेवलेले आपले नाव सार्थकी करणार्या प्रतिभाताई या शारदोत्सवातील दुर्गाच आहेत...
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.