
नवी दिल्ली : जागतिक प्रश्नांमध्ये सध्या भारताची भूमिका अतिशय महत्वाची ठरत आहे. त्यासाठी राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबविणाऱ्या मोजक्याच नेत्यांपैकी एक असणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्षम नेतृत्व कारणीभूत आहे, असे गौरवोद्गार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काढले आहेत.
मॉस्कोस्थित थिंक टँक वालदाई डिस्कशन क्लबच्या वार्षिक कार्यक्रमास रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे प्रशंसा करून युरोप आणि अमेरिकेवर टिकास्त्र सोडले. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने खूप काही साध्य केले आहे. ते एक प्रखर देशभक्त आणि राष्ट्रहितास समोर ठेवून स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबविणाऱ्या जगातील मोजक्या सक्षम नेत्यांपैकी एक आहेत. भारतीय जनतेसाठी जे जे आवश्यक, ते ते करून ते देशाला पुढे नेत आहेत. त्यामुळे जागतिक घडामोडींमध्ये भारताची भूमिका आता महत्त्वाची ठरत आहे. त्यांची 'मेक इन इंडिया'ची कल्पना आर्थिकदृष्ट्या आणि नैतिकतेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे भविष्यकाळ हा निश्चितच भारताचा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकेकाळी ब्रिटीश वसाहत असलेल्या भारताने अभुतपूर्व विकास साध्य केल्याचे पुतीन यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जवळपास १.५ अब्ज लोकसंख्या असलेल्या देशाने ज्याप्रकारे विकास केले आहे, त्यामुळे जगाला भारताविषयी आदर आणि कौतुक वाटते. भारत आणि रशिया यांच्यामध्ये अतिशय घनिष्ठ संबंध आहेत. हे संबंध अनेक दशकांपासून कायम आहे, या संबंधांमध्ये कधीही समस्या निर्माण झाल्या नाहीत. दोन्ही देशांनी नेहमीच परस्परांना पाठिंबा दिला आहे, सध्याही तेच घडत आहे आणि भविष्यातही असेच राहिल, असा विश्वासही पुतीन यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, पुतीन यांनी आपल्या भाषणात जागतिक वर्चस्वासाठी "घाणेरडे खेळ" खेळल्याबद्दल पाश्चिमात्य देशांवर टिका केली. बहुध्रवीय जगामध्ये लवकरच नवी शक्तीकेंद्रे उदयास येतील आणि पाश्चिमात्यांना देशांना समान पातळीवर चर्चा सुरू करावी लागेल. अमेरिका आणि त्यांचे मित्र राष्ट्र त्यांच्या स्वत: च्या कृतींच्या परिणामांपासून वेगळे होऊ शकत नाहीत. आपली मूल्ये आणि दृष्टी सार्वत्रिकपणे लागू करू इच्छिणारी पाश्चात्य राष्ट्रे स्वत:सह सर्वांना लुटत आहेत, असाही घणाघात पुतीन यांनी यावेळी केला आहे.