
मुंबई:दहशतवादी गटांच्या आर्थिक स्त्रोतांपर्यंत पोहोचून त्यास आळा घालणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व देशातील सदस्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर यांनी केले. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची बैठक मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे झाली, त्यावेळी ते बोलत होते.
दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी (26/11) मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सदस्य देशांच्या प्रतिनिधींनी श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष तथा गॅबॉन प्रजासत्ताक देशांचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मायकल मौस्सा अडामो प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्ष आणि संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी राजदूत श्रीमती रूचिरा कंबोज यांनी केले.
भारत 2022 साठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीचा अध्यक्ष आहे. या समितीमध्ये सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्रसंघाच्या 15 देशांतील राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीची दोन दिवसीय बैठक भारतात होत आहे. उद्या दिल्ली येथे बैठक आहे. मुंबईमध्ये ताज हॉटेल येथे बैठक झाली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवाद विरोधी समितीने 'दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याशी लढा' या विषयावर अनौपचारिक चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. यात स्थानिक आणि क्षेत्रीय पातळीवरील उपाययोजनांसंदर्भात चर्चा झाली.