नोटांवरचा गांधींचा फोटो हटवणे शक्य आहे का? काय आहे कायदा?

    27-Oct-2022   
Total Views | 55

MahaMTB

 
 
दिल्लीतील आप सरकारचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय नोटांवर देवी लक्ष्मी, गणपती यांच्या मुद्रा असायला हव्यात असे वक्तव्य केले आणि देशभर वादंगांचे जोरदार मोहोळ उठले. केजरीवाल यांच्या पाठोपाठ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी देवी- देवतांच्या प्रतिकांऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र लावावे असे म्हणत या वादंगाच्या आगीत तेलाचं ओतण्याचे काम केले. पण खरंच या नोटांवर कोणाचे चित्र छापायचे याचा असा काही कायदा आहे का? फक्त महात्मा गांधींचेच चित्र या नोटांवर छापणे बंधनकारक आहे का ? की या सगळ्यात केजरीवाल फक्त वादंगांच्या आगीत आपली राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेत आहेत याचाच वेध घेणारा हा लेख.....
  

भारतीय चलनांचा इतिहास हा पार हडप्पा संस्कृतीपर्यंत मागे नेता येतो. त्याही काळात वापरात असलेली नाणी उत्खननात सापडली आहेत. त्यानंतर भारतीय इतिहासातील अनेक प्रसिद्ध राजघराण्यांनी राजेपदावर आल्यानंतर आपल्या नावाची नाणी पाडली होती. भारतात जो रुपया आपण सर्वच जण वापरतो त्याची सुरुवात दिल्लीचा अफगाण सुलतान शेरशह या अफगाण सुलतानाने केली. त्यानेच चांदीचे रुपया नावाचे चलन प्रचारात आणले. त्यानंतरही अनेक राजांनी आपली चलने चलनात आणली जशी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील आपल्या राज्याभिषेकाच्यावेळी आपले शिवराई आणि होन हे चलन प्रचारात आणले होते, पण ते फारकाळ चलनात राहिले नाही. पण रुपया हे चलन मात्र वापरात कायम होते. पण ही सर्व चलने नाण्यांच्या स्वरूपात होती. १८व्या शतकापर्यंत भारतात कागदी नोटांचा वापर सुरु झाला नव्हता. १८ शतकात बंगालमध्ये ब्रिटिश सत्ता दृढ झाल्यानंतर बँक ऑफ बंगालने पहिल्यांदा भारतात कागदी नोटा छापल्या.
 
यानंतर १८५७च्या उठावानंतर भारताची सत्ता ही ब्रिटिश राजघराण्याकडे गेली आणि भारतीय नोटांवर ब्रिटिश राजांची चित्रे दिसायला लागली. किंग जॉर्ज सहावे यांचे चित्र पहिल्यांदा भारतीय नोटांवर छापले गेले. १८६२ मध्ये त्यांची जागा राणी व्हिक्टोरियाने घेतली. १९३५च्या कायद्याने भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि किंग जॉर्ज सहावे यांचे चित्र असलेली १० हजाराची नोट चलनात आणली गेली. यानंतर या इतिहासातील मोठा टप्पा येतो तो १९४७नंतर म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर. याकाळात सारनाथच्या अशोक स्तंभाचे चित्र असलेली नोट भारतात प्रचारात आणायचे ठरवले गेले. आणि त्याची सुरुवात १ रुपयाच्या नोटेपासून करण्यात आली. आज आपण ज्या नोटा बघतो आहोत त्यांची सुरवात १९९६ पासून करण्यात आली असून त्यात नोटेच्या पुढल्या बाजूला महात्मा गांधींचा फोटो कायमस्वरूपी ठेवण्यात आला आणि मागच्या बाजूस वेगवेगळी चित्रे आहेत. कधी सारनाथच्या अशोक स्तंभ तर कधी दांडी यात्रा. वेळोवेळी भारत सरकारने आपल्या भारतासाठी अतुलनीय योगदान दिलेल्या व्यक्तींच्या स्मरणार्थ त्यांचे चित्र असलेली नाणी चलनात आणली आहेत. त्यामुळे भारतीय नोटांवर कुठले प्रतीक असावे याबाबत सरकारचा एकच असा कुठला कायदा नाही किंवा तशी कुठली प्रथा नाही.
 
हा सगळा इतिहास बघता यांवरून आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ज्या वादाला तोंड फोडले आहे तो वाद अत्यंत निरर्थक आहे आणि फक्त राजकीय स्वार्थ साधण्यासाठीच केला गेला आहे. कारण अशी हिंदू देवी - देवतांची चित्रे नोटांवर छापावीत का? याबद्दल २०१० मध्येच तात्कालिन युपीए सरकारने विचार करायला सुरुवात केली होती पण त्यावर काहीच निर्णय घेतला नाही सध्या हा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेकडे आहे. मुळात देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याचा प्रश्न आहे, केजरीवाल यांनी याबाबत काही मत किंवा ठोस योजना असण्यास ते सांगणे जास्त महत्वाचे ठरते अन्यथा त्यांच्या धार्मिक भावनांशी खेळून आपला स्वार्थ साधण्याच्या डाव यशस्वी होईल.
 
 

हर्षद वैद्य

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये उपसंपादक (वेब आणि प्रिंट) म्हणून कार्यरत. रुईया महाविद्यालयातून गणित या विषयात पदवीचे शिक्षण घेतले. आर्थिक क्षेत्राशी संबंधित वृत्तांकन आणि लेखन. भारतीय संगीत, इतिहास या विषयांमध्ये विशेष रस. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य. अर्थशास्त्र विषयात महाविद्यालयात संशोधन केले आहे. शैक्षणिक, सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्राचाही अनुभव.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121